आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Run The Government Throughout The Year Under Modi's Rule: Arvind Kejriwal's Challenge

मोदींच्या राजवटीत वर्षभर सरकार चालवून दाखवा: अरविंद केजरीवाल यांचे आव्हान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली -  दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी सरकार चालवण्याचे ‘ज्ञान’ दिल्याने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल चांगलेच संतप्त झाले. मोदी राजवटीत एक वर्षभर सरकार चालवून दाखवा, असे आव्हानच त्यांनी शीला दीक्षित यांना दिले.  


आम आदमी पक्षाच्या (आप) सरकारने गुरुवारी विधानसभेत दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. मात्र, दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळणे शक्य नाही. केंद्रात कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी दिल्लीच्या सरकारला त्या सरकारला सोबत घेऊनच काम करावे लागेल, अशी प्रतिक्रिया शीला दीक्षित यांनी नोंदवली होती. सरकार कसे चालवावे याबाबत दीक्षित यांनी दिलेल्या सल्ल्यामुळे केजरीवाल चांगलेच संतप्त झाले. ते म्हणाले की, ‘शीलाजी, तुमच्या कार्यकाळात जनता पाणी आणि वीज बिलांमुळे रडत होती. 


सरकारी शाळा, रुग्णालयांची स्थिती अत्यंत वाईट होती. खासगी शाळा मनमानी पद्धतीने शुल्क वाढवत होत्या. आम्ही हे सर्व ठीक केले. तुमच्या कार्यकाळात १० वर्षे केंद्रात तुमचेच सरकार, तुमचेच उपराज्यपाल होते. मोदींच्या राजवटीत एक वर्षभर दिल्ली सरकार चालवून दाखवा, असे आव्हान मी तुम्हाला देतो.’ ‘कृपया हे ज्ञान पुडुचेरीच्या मुख्यमंत्र्यांनाही द्या,’ अशी प्रतिक्रिया केजरीवाल यांनी व्यक्त केली. 


पुडुचेरीत व्ही. नारायणसामी यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे सरकार आहे आणि तेथे किरण बेदी उपराज्यपाल आहेत. अनेक प्रसंगांत नारायणसामी आणि बेदी यांच्यातील संघर्ष समोर आला आहे.  

 

‘उपराज्यपालांशी वाद हा बहाणा चालू शकत नाही’  
शीला दीक्षित रविवारी म्हणाल्या की, ‘दिल्ली हे विशेष राज्य आहे आणि केंद्र सरकारची तेथे आंशिक भूमिका आहे. आपण सहकार्य करून काम करायला हवे. माझ्या १५ वर्षांच्या कार्यकाळात कधीही केंद्र अथवा उपराज्यपालांशी वाद झाला नाही. काम न करण्यासाठी उपराज्यपालांशी वाद हा बहाणा चालू शकत नाही. जनतेला शासन हवे, तक्रारी नकोत.’

बातम्या आणखी आहेत...