आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उड्डाण नियम बदलण्यासाठी लाच दिल्याचा एअर एशियावर आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोनी फर्नांडिस - Divya Marathi
टोनी फर्नांडिस

नवी दिल्ली -   सीबीआयने मलेशियाचे अब्जाधीश आणि एअर एशिया समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) टोनी फर्नांडिस यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. फर्नांडिस यांनी आंतरराष्ट्रीय उड्डाणांसंदर्भात ५/२० नियम बदलण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांसोबत लाॅबिंग केली आणि परवाना मिळवण्यासाठी लाच दिल्याचा आरोप आहे. कंपनी आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांवर तत्कालीन विदेशी गुंतवणूक संवर्धन मंडळाच्या (एफआयपीबी) नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. तपास संस्थेने मंगळवारी दिल्ली, मुंबई आणि बंगळुरूमध्ये एअर एशिया आणि फर्नांडिस यांच्या सहा कार्यालयावर छापे मारले. एअर एशियाचे भारतातील संचालक शुभ मंडल यांनी या सर्व आरोपाचे खंडन केले आहे.

  
एफआयआर टोनी फर्नांडिस यांच्या व्यतिरिक्त माजी डेप्युटी सीईओ बो लिंगम, एअर एशिया इंडिया कंपनी, या कंपनीचे संचालक आर. वेंकटरमणन, ट्रॅव्हल फूड सर्व्हिसेस कंपनीचे अध्यक्ष सुनील कपूर, एव्हिएशन कन्सल्टंट दीपक तलवार,  सिंगापूरमधील कंपनी एसएनआर ट्रेडिंगचे संचालक राजेंद्र दुबे यांचीही नावे  आहेत. ट्रॅव्हल फूड एअर एशियाला अन्न पुरवठा करते. नियमांच्या उल्लंघनात  सरकारी अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचा संशय आहे. त्यामुळे एफआयआरमध्ये निनावी सरकारी कर्मचाऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे.  एअर एशिया इंडिया मलेशियाई एअरलाइन्स, एअर एशिया बरहाद, एअर एशिया इन्व्हेस्टमेंट आणि टाटा सन्स यांची संयुक्त कंपनी आहे. 

 

सुब्रमण्यम स्वामी यांची उच्च न्यायालयात याचिका  
सीबीआयच्या वतीने या प्रकरणाची माहिती जाहीर करण्यात आली आहे. ही माहिती देण्यात आल्यानंतर भाजपचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट केले -
“अखेर सीबीआयने एअर एशिया आणि कंपनीच्या सीईओंच्या कार्यालयावर छापे मारलेच. दिल्ली उच्च न्यायालयात मी दाखल केलेल्या याचिकेच्या आधारावर ही कारवाई होत आहे.’  

 

नव्या विमान कंपन्यांसाठी रतन टाटांचाही प्रयत्न 
इंडिगो आणि जेट एअरवेजसह जुन्या विमान कंपन्या ५/२० या नियमात बदल करण्याच्या विरोधात होत्या. नियम बदलल्यास नवीन कंपन्यांना जास्त फायदा होणार असल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र, या नियमामुळे या क्षेत्राचा विकास थांबला असल्याचा दावा विस्तारा आणि एअर एशिया यांनी केला होता. टाटा समूहाचे तत्कालीन मानद अध्यक्ष रतन टाटा यांनीही जुन्या कंपन्या नियमांच्या आडून दबाव टाकत असल्याचे म्हटले होते.

 

असा होता आधीचा ५/२० नियम 
याचा अर्थ विदेशी उड्डाणासाठी विमान कंपनीकडे कमीत कमी पाच वर्षांचा अनुभव आणि २० विमान अनिवार्य असायला हवे होते.  


जून २०१६ मध्ये झाला बदल  
१५ जून २०१६ रोजी मंत्रिमंडळाने ५/२० नियमात दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला. देशात पाच वर्षांच्या अनुभवाची अट रद्द करण्यात आली. आता केवळ २० विमानांची अट कायम आहे.

 

टोनी यांनी माेदींचे आभार मानले  
नियमात बदल केल्यानंतर टोनी फर्नांडिस यांनी ट्विट केले होते - “निहित स्वार्थ संपला आणि पॉवर लोकांच्या हातात आली आहे. वेल डन नरेंद्र मोदी. तुम्ही तुमचे आश्वासन पूर्ण केले.’    

 

 पुढील स्लाईडवर पहा, काय आहेत आरोप.....  

बातम्या आणखी आहेत...