आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी जागतिक नेते आहेत, इस्रायलशी आमचा वाद मिटवू शकतात : पॅलेस्टाइनचे पीएम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पॅलेस्टाइनचे पंतप्रधान डॉ. रामी हमदल्लाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जागतिक नेते असल्याचे म्हटले आहे. मोदी १० फेब्रुवारीला पॅलेस्टाइनला जात आहेत. भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच पॅलेस्टाइन दौरा आहे. तत्पूर्वी दैनिक भास्करसोबतच्या संवादात डॉ. हमदल्लाह म्हणाले की, ‘मोदी हे पश्चिम आशियातील नेत्यांवर आपल्या प्रभावाद्वारे इस्रायलसोबत आमचा वाद सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. दावोसमध्ये मोदींनी हवामान बदल व जागतिक आर्थिक सहकार्याबाबत संयुक्त वैश्विक उपाययोजनांचे आवाहन केले होते. अाम्ही त्याला पाठिंबा देतो.’ पुढे ते म्हणाले, भारत आर्थिक व राजकीय शक्ती म्हणून उदयास येणे ही आमच्यासारख्या देशांसाठी चांगली बाब आहे. भारत-पॅलेस्टाइनदरम्यान त्यांचा हा दौरा नव्या संधींचे सृजन करेल. पाकिस्तानातील सभेत आमच्या राजदूताने मुंबई हल्ल्याचा म्होरक्या हाफिज सईदसोबत एकाच व्यासपीठावर येणे ही आमची अजाणतेपणी झालेली चूक होती, असेही त्यांनी मान्य केले. तिचे समर्थन केले जाऊ शकत नाही.

 

 > हाफिजसोबत व्यासपीठावर येणे ही आमच्या राजदूताकडून अजाणतेपणी झालेली चूक होती. त्याचे समर्थन करता येत नाही. या घटनेमुळे अनेक दशके जुन्या भारत-पॅलेस्टाइन संबंधांवर परिणाम होणार नाही, अशी आशा आहे. 
- डाॅ. हमदल्लाह, पॅलेस्टाइनचे पंतप्रधान

 

> पॅलेस्टाइनच्या पंतप्रधानांनी भारतातील वृत्तपत्राला प्रथमच दिली मुलाखत

पॅलेस्टाइनच्या पंतप्रधानांनी भारतातील वृत्तपत्राला दिलेल्या पहिल्याच मुलाखतीत दहशतवादाबाबतची आपल्या देशाची भूमिका, आंतरराष्ट्रीय मंचावर पॅलेस्टाइनला मिळालेला भारताचा भक्कम पाठिंबा आणि दोन्ही देशांदरम्यानचे संबंध मजबूत करण्याच्या उपायांवर चर्चा केली. मुलाखतीचा मुख्य अंश...

 

भारताने इस्रायल-पॅलेस्टाइन यांच्यात शांतता चर्चा पुन्हा सुरू करण्याची इच्छा दाखवली आहे. तुमचे मत काय?
पॅलेस्टाइन लोकांच्या आत्मनिर्णयाचा अधिकार आणि स्वातंत्र्याचा आदर करत शांतता प्रक्रिया सुरू करण्यासाठी त्वरित आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळवण्याची गरज आहे. भारत त्यात भूमिका बजावू शकतो. ताबा कायम राहीपर्यंत शांतता स्थापन होऊ शकत नाही, असा आमचा विश्वास आहे.

 

 

कोणत्याही भारतीय पीएमचा हा पहिलाच पॅलेस्टाइन दौरा आहे. या संदर्भाने तुमच्यासाठी त्याचे महत्त्व का? 

हा दौरा भारत-पॅलेस्टाइनमधील मजबूत संबंधांचा निर्देशक आहे. १५ नोव्हेंबर १९८८ ला स्वातंत्र्याच्या घोषणेनंतर पॅलेस्टाइनला मान्यता देणाऱ्या पहिल्या देशांत भारतही होता. भारत आणि पॅलेस्टाइन मुक्ती संघटनेदरम्यान (पीएलओ) १९७४ मध्ये संबंध जुळले होते. पीएलओने  १९७५ मध्ये कार्यालय उघडले व उभय देशांत १९८० मध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. भारताने १९९६ मध्ये पॅलेस्टाइन नॅशनल अॅथॉरिटीमध्ये कार्यालय सुरू केले. मोदींच्या दौऱ्यामुळे व्यापार, सांस्कृतिक, तंत्रज्ञान व माहिती क्षेत्रात सहकार्य वाढेल, अशी आशा आहे. 
भारताने जेरुसलेम शहराला इस्रायलची राजधानी करण्याच्या प्रस्तावावर अमेरिकेविरुद्ध जात यूएनमध्ये मत दिले. यानंतर मोदींनी खुल्यादिलाने इस्रायलच्या पीएमचे स्वागत केले. या घटनाक्रमाबद्दल काय वाटते?
प्रत्येक पॅलेस्टिनी महात्मा गांधींचा प्रशंसक आहे. मला त्यांचे विद््वत्तापूर्ण व शाश्वत शब्द स्मरतात  ‘डोळ्याच्या बदल्यात डोळा काढल्यास जग अंध होईल.’ त्यांचे विचार वैश्विक आणि प्रेरक आहेत. आमच्या भूभागावरून इस्रायली कब्जा संपुष्टात आणून लोकशाही राष्ट्र उभारण्यासाठी आम्ही संघर्षरत आहोत. पॅलेस्टाइन २०१२ मध्ये संयुक्त राष्ट्राचा ‘नॉन मेंबर स्टेट’ बनला. भारतानेही मत दिले. यूएन मुख्यालयावर पॅलेस्टिनी ध्वजालाही पाठिंबा दिला. या समर्थनासाठी भारताचे अाभार...

 इस्लामबादमध्ये पॅलेस्टाइनच्या राजदूताने एका सभेत भाग घेतला होता. त्यात मुंबई हल्ल्याच्या मास्टरमाइंडलाही बोलावले होते. ते टाळायला नको होते का?
या दुर्दैवी घटनेनंतर परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी केले होते. आम्ही म्हटले होते की, दहशतवादाविरोधातील लढाईत आम्ही भारतासोबत आहोत. आमच्या राजदूताने या सभेत भाग घेणे ही चूक होती. ती योग्य नव्हती. ते आम्ही स्पष्टही केले होते. आमच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अध्यक्ष अब्बास यांच्या निर्देशावरून राजदूताला त्वरित माघारी बोलावले होते. या घटनेने आमच्या जुन्या संबंधांना धक्का पोहोचणार नाही याची खात्री आहे.
भारताला सतत दहशतवादाला तोंड द्यावे लागत आहे. त्याला तोंड देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सामूहिक प्रयत्नांची गरज आहे, असे वाटत नाही का?
आम्ही दहशतवादाच्या विरोधात आहोत. आमचे ८४ देशांशी सुरक्षा करार आहेत. ते दहशतवादाच्या विरोधातील लढाईतील सहकारी आहेत. संयुक्त कारवाई आणि सहकार्याने सर्व देश दहशतवादाचा धोका आणि त्याच्या प्रभावातून मुक्त होतील, याची खात्री आहे. आम्हा सर्वांना शांततेने जगण्याचा अधिकार आहे. तो भीतीपासून मुक्त असावा.
 इस्रायलशी संबंध मजबूत होऊनही भारताचे पॅलेस्टाइन आणि अरब जगताशी चांगले संबंध आहेत. भारताच्या या परिस्थितीचा फायदा या भागाच्या स्थायी शांततेसाठी घेतला जाऊ शकतो का?
भारत प्रमुख जागतिक आणि राजकीय शक्ती आहे. आमच्या भागातील देशांशी त्याचे चांगले संबंध आहेत. भारत पश्चिम आशियात शांतता प्रक्रियेच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. थांबलेली शांतता प्रक्रिया पनरुज्जीवित करण्यासाठी भारताच्या भूमिकेचे आम्ही स्वागत करू.
 दोन्ही देशांतील ऐतिहासिक संबंध पुढे नेण्यासाठी कोणती पावले उचलण्याची गरज आहे?
गुंतवणूक, लहान-नोठे उपक्रम, ऊर्जा, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, पर्यटन आणि संस्कृती या क्षेत्रात सहकार्याची गरज आहे. संयुक्त मंत्रीस्तरीय समितीची नियमित बैठक फायदेशीर ठरू शकते. मी भारतीय व्यावसायिकांशी वेस्ट बँकमध्ये इस्रायली सेटलमेंट्सच्या मुद्द्यावर विचार करण्याचा आग्रह धरेन. तेथील वस्त्या आंतरराष्ट्रीय कायद्याच्या दृष्टीने बेकायदेशीर आहेत. इस्रायलमध्ये गुंतवणूक करणे आणि या वस्त्यांत गुंतवणूक यात फरक आहे.
 दोन्ही पक्षांतील पहिली चर्चा मे २०१५ मध्ये झाली होती. त्यात दोन्ही पक्षांच्या संबंधांच्या आव्हानावर विचार केला होता. त्यानंतर काय प्रगती झाली?
अध्यक्ष अब्बास यांच्या मे २०१७ च्या भारत दौऱ्यात आरोग्य, माहिती तंत्रज्ञान आणि वृत्तसंस्थांमध्ये सहकार्य, युवक, क्रीडा आणि कृषीविषयक ५ करारांवर स्वाक्षरी झाली होती. भारताने पॅलेस्टाइनमध्ये शाळा बनवल्या. प्रशिक्षण केंद्रांना साहित्य दिले. दिएर अल-बालाहमध्ये गांधी वाचनालत आणि विद्यार्थी उपक्रम केंद्र बनवले. भारताने ऑक्टोबर २०१५ मध्ये पॅलेस्टाइनसाठी अनेक योजनांची घोषणा केली. त्यात रामल्लात इंडिया टेक्नो पार्क, गाझात आयसीटी सेंटर याचा समावेश आहे. आम्ही त्यासाठी भारताचे आभारी आहोत.

बातम्या आणखी आहेत...