आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- राज्यसभेत निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी सरकार आणि विरोधक यांचा प्रयत्न सुरू आहे. या पेचामुळे हिवाळी अधिवेशनात राज्यसभेत पहिल्या आठवड्याचे कामच होऊ शकले नाही. आता या आठवड्यात सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरळीत होईल अशी शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी पाकिस्तानसोबत कट रचला होता, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केले होते. त्यावरून संसदेत विशेषत: राज्यसभेत पेच निर्माण झाला होता. आता सरकार आणि विरोधी पक्ष एकत्रित बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पेचावर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पंतप्रधानांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी किंवा स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांनी केली आहे. मात्र सरकार त्यासाठी तयार नाही. आता दोन्ही बाजूंनी एकत्र बसावे आणि काहीतरी तोडगा काढावा, असे आवाहन राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांनी केले आहे. यासंदर्भात राज्यसभेचे नेते अरुण जेटली आणि विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांच्यात स्वतंत्रपणे तसेच नायडू यांच्या उपस्थितीत काही बैठका झाल्या आहेत.सध्या संसदेला सुटी आहे. बुधवारपासून पुन्हा संसदेचे काम सुरू होणार आहे. तेव्हा राज्यसभेचे कामकाज पुन्हा सुरळीत सुरू व्हावे या उद्देशाने येत्या एक-दोन दिवसांत पुन्हा जेटली आणि आझाद यांची बैठक होण्याची शक्यता आहे. या मुद्द्यावरून पेच निर्माण झाल्याने गेल्या आठवड्यात राज्यसभेत एक दिवस वगळता कुठलेही कामकाज होऊ शकले नव्हते. फक्त एक दिवस कामकाज सुरळीत झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.