आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कच्चे तेल महागल्याने आयात खर्चात 3.4 लाख कोटींची वाढ; पेट्रोल-डिझेलवरील शुल्क कमी करण्यास दिला नकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली -  चालू वर्षात कच्च्या तेलाच्या आयातीवर ५० अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे ३.४ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च होण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने ही वाढ होऊ शकते. कच्च्या तेलाच्या किमती सध्या ८० डॉलरच्या जवळपास असून नोव्हेंबर २०१४ नंतरचा हा सर्वाधिक दर आहे. त्यामुळे आयात खर्च वाढून चालू खाते तोट्यात वाढ होण्याची शक्यता आहे. अर्थ मंत्रालयातील आर्थिक प्रकरणाचे सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी ही माहिती दिली. पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क (एक्साइज ड्यूटी) कमी करण्याच्या प्रश्नावर उत्तर देण्यास मात्र त्यांनी नकार दिला.  


गर्ग यांनी सांगितले की, “तेलाचे दर वाढल्याने आर्थिक विकासावर परिणाम होणार नाही. स्थितीवर सरकारचे लक्ष असून योग्य निर्णय घेण्यात येणार आहे.’ असे असले तरी सरकार कोणता निर्णय घेणार, याबाबतची माहिती त्यांनी दिलेली नाही. सरकार पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करणार आहे काय, या प्रश्नावर ते म्हणाले की, “मला यासंबंधी काहीही बोलायचे नाही.’  


दरम्यान, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सौदी अरेबियाला कच्च्या तेलाच्या किमती कमी करण्याची विनंती केली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीतील तेजीमुळे सामान्यांसह देशाच्या अर्थव्यवस्थेवरही नकारात्मक परिणाम होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. प्रधान यांनी सौदी अरेबियाचे ऊर्जा, उद्योग आणि नैसर्गिक खनिज संसाधन मंत्री खालिद अल-फलीह यांच्याशी गुरुवारी सायंकाळी फोनवर चर्चा करून त्यांना भारताच्या चिंतांची माहिती दिली. सौदी अरेबिया तेल उत्पादक देशांची संघटना असलेल्या ओपेकचा प्रमुख सदस्य देश आहे.

 

> विक्रमी ९ लाख कोटींपर्यंत कच्चे तेल आयात बिल जाण्याची शक्यता 

मागील वर्षी ५.६६ लाख कोटी रुपयांची आयात 
२०१७-१८ मध्ये भारताने ५.६६ लाख कोटी रुपयांचे कच्चे तेल आयात केले होते. जर या वर्षी यात ३.४ लाख कोटींची वाढ झाल्यास बिल ९ लाख कोटी रुपयांपर्यंत जाईल. आतापर्यंतचा हा विक्रम असेल. याआधी २०१३-१४ मध्ये सर्वाधिक ८.६४ लाख कोटी रुपये बिल झाले होते. 

 

रुपयातील घसरणीची सध्या चिंता नाही 
रुपयामध्ये घसरण होत असल्याची चिंता नसल्याचे ते म्हणाले. विदेशी गुंतवणूकदार बाँड आणि शेअरमधील पैसे काढून घेत आले. मात्र, सध्या २०१३ सारखी गंभीर स्थिती नसल्याचे ते म्हणाले. दीड महिन्यात ३० ते ३५ हजार कोटी रुपये काढणे मोठी बाब नसल्याचे ते म्हणाले. 

 

 वास्तव : विक्रमी नीचांकाच्या केवळ ८० पैसे दूर रुपया 
 एका डॉलरची किंमत ६८ रुपयांपर्यंत पोहोचली आहे. ऑगस्ट २०१३ मध्ये रुपया सर्वात नीचांकी पातळीवर गेला होता. त्या वेळी डॉलरच्या तुलनेत रुपया ६८.८० पर्यंत घसरला होता. या वर्षी भारतीय चलन ५ टक्क्यांपर्यंत घसरले आहे. नीचांकी पातळीच्या तुलनेत रुपया केवळ ८० पैसे दूर आहे.

 

 

बातम्या आणखी आहेत...