आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली- देशभरात एटीएममधील खडखडाट अद्यापही संपलेला नाही. बँकेत गेल्यानंतरही सहजपणे नव्या नाेटा मिळत नाहीत. मात्र आता नोटांचा चक्क बाजार मांडला जात आहे. जुन्या नोटांसह आता नव्या नोटाही ऑनलाइन विकल्या जात आहेत. सर्व नियम कायदे धुडकावून त्यांची अवैधरीत्या जास्त किमतीवर विक्री केली जात आहे. १ रुपया, १० रुपये, ५० रुपये, २०० रुपयांच्या नोटांची ऑनलाइन विक्री होत आहे.
‘ईबे.इन’ या वेबसाइटवर १० रुपयांच्या १०० नव्या नोटांचे बंडल १६२० रुपयांत विकले जात आहे. २०० रुपयांच्या नव्या नोटांच्या बंडलसाठी २६ हजार रुपये मोजावे लागत आहेत. एक रुपयाच्या नोटांचे बंडल ५२५ रुपयांमध्ये विकले जात आहे. नोटा घरपोच मागवण्यासाठी ५० ते १०० रुपयांपर्यंतचा शिपिंग चार्जही द्यावा लागतो. विशेष म्हणजे या नोटांची गॅरंटी देण्यासाठी साइटवर लिहिले आहे की, या नोटा आरबीआयचे नवीन गव्हर्नर ऊर्जित पटेल यांची स्वाक्षरी असलेल्या आहेत. रुपयाच्या नोटेसाठी लिहिले आहे की, या नोटांवर माजी वित्त सचिव शक्तिकांत दास यांची स्वाक्षरी आहे.
सर्वसामान्यांना मिळत नाहीत नव्या नोटा : १०, ५० व २०० रुपयांच्या नव्या नोटा सध्या सर्वसामान्यांच्या नशिबात नाहीत. घरात लग्नकार्य असल्यास या नोटांसाठी बँकेतील मित्रांची मनधरणी करावी लागते. एका बँक कर्मचाऱ्याने सांगितले की, दिल्ली वाहतूक पोलिसांच्या एका हवालदाराने १० रुपयांच्या नव्या नोटांचे बंडल मिळवून देण्याच्या अटीवर दंडाची पावती फाडली नाही. बँक कर्मचाऱ्यांनुसार १०, ५० व २०० च्या नव्या नोटा शाखांत कमी प्रमाणात पाठवल्या जातात. आधीच त्यांची बुकिंग झालेली असते.
नोटा विकणे हा कायद्याने गुन्हा
ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशनचे अध्यक्ष एस.एस. शिसोदिया म्हणाले, नाेटा या कायदेशीर चलन आहेत. जास्त किमतींवर त्यांची विक्री हा सरळसरळ गुन्हा आहे. वैध चलनाची विक्री तर दूरच, सरकारच्या परवानगीशिवाय ते नष्टही करत येत नाही. याबाबत ईबे कंपनीच्या अधिकृत प्रवक्त्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही तो होऊ शकला नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.