आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाराज यशवंत सिन्हा यांचा राष्ट्र मंच; भाजपविरोधी कारवायांसाठी व्यासपीठ नसल्याचा दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वृत्तसंस्था | नवी दिल्ली  
भाजपबरोबर बिनसल्यामुळे अनेक महिन्यांपासून नाराज असलेले नेते यशवंत सिन्हा यांनी राष्ट्र मंच नावाने राजकीय संघटना सुरू केली आहे.  भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हादेखील या संघटनेत सहभागी झाले आहेत. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध करण्यासाठी हा मंच कार्य करेल. भाजपच्या विरोधातील कारवायांसाठी हा मंच नाही, असा दावा यशवंत सिन्हा यांनी केला आहे.  


याप्रसंगी शत्रुघ्न म्हणाले, भाजपमध्ये मला माझ्याच पक्षाबद्दल काही सांगायची सोय राहिली नव्हती. माझे काही मत किंवा विचार असल्यास मांडण्यासाठी काहीही व्यासपीठ उरले नव्हते. त्यामुळे मी राष्ट्र मंचमध्ये सहभागी झालो आहे. परंतु माझ्या निर्णयाकडे पक्षविरोधी कारवाया म्हणून पाहिले जाऊ नये. आम्ही राष्ट्रहितासाठी हा निर्णय घेतला आहे, असे शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले. या प्रसंगी तृणमूल काँग्रेसचे खासदार दिनेश त्रिवेदी, काँग्रेस खासदार रेणुका चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार माजिद मेमन, आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह, गुजरातचे माजी मुख्यमंत्री सुरेश मेहता, जनता दल संयुक्तचे नेते पवन वर्मा यांचीदेखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. आरएलडी नेते जयंत चौधरी, माजी मंत्री सोमपाल हे मान्यवरही हजर होते.   


रालोआ सरकारमध्ये अर्थ व परराष्ट्रमंत्री राहिलेले ८० वर्षीय यशवंत सिन्हा मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर आणि सरकारच्या कामकाजावर जाहीरपणे टीकेची झोड उठवत आले आहेत. गेल्या वर्षी त्यांनी एका इंग्लिश वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात सरकारवरील टीका व आपली भूमिका मांडली होती. चुकीच्या आर्थिक धोरणांवर मी काहीही बोललो नाही तर मी माझ्या राष्ट्रीय कर्तव्याला पार पाडू शकलो नाही असे होईल, असे म्हटले होते. नोटबंदीच्या निर्णयाने देशात आर्थिक आपत्ती आणली आहे, असा आरोप त्यांनी केला होता.  

 

 

स्वकीयांवर काय केले आरोप ?

- भाजपमध्ये प्रत्येक जण घाबरून आहे, मात्र आम्ही नाही.   
- देशात चर्चा आता एकतर्फी होत असल्याने धोका वाढला

 

अराजकीय कृती गट : यशवंत सिन्हा  
महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनी हा मंच सुरू झाला आहे. राष्ट्र मंच अराजकीय कृती गट आहे. आम्ही कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही. परंतु या माध्यमातून राष्ट्रहिताच्या मुद्द्यांवर मात्र प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. राष्ट्र मंच ही काही संघटना नाही. ही एक राष्ट्रीय चळवळ आहे. या माध्यमातून केंद्रातील सरकारची चुकीची आर्थिक धोरणे, परराष्ट्र संबंधविषयक धोरणांचा समाचार घेऊ, असे यशवंत सिन्हा यांनी यानिमित्ताने सांगितले. आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचाही प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले.  

 

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर करणार आंदोलन 

पत्रकार परिषदेत सिन्हा म्हणाले, 'राष्ट्रीय मंचचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा शेतकरी असणार आहे. जीएसटीमुळे छोटे उद्योजकांचे धाबे दणाणले आहे. बेरोजगारीचा मुद्दा अजून सुटू शकलेला नाही. कुपोषणाचा प्रश्न अद्याप सोडवता आलेला नाही. देशांतर्गत सुरक्षेबद्दल बोलायचे तर असे वाटते की जमावच न्याय करणार आहे. जात, धर्म यांच्यावर जेव्हा जमाव वरचढ होतो तेव्हा त्याला रोखणे अवघड होऊन जाते. सरकारकडून सांगितले जाते की आमचे सर्वात मोठे यश विदेश धोरण आहे. त्यासाठी तुम्ही डोकलाम पाहू शकता. आता कोणी 56 इंच छातीबद्दल विचारत नाही.'

 

सिन्हा यांच्या राष्ट्रीय मंचमध्ये कोण-कोण 
यशवंत सिन्हा गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर आक्रमक झाले आहेत. त्यांच्या राष्ट्रीय मंचमध्ये शत्रुघ्न सिन्हा, दिनेश त्रिवेदी(टीएमसी), माजिद मेमन, संजय सिंह(आप), सुरेश मेहता (गुजरातचे माजी मुख्यमंत्री), हरमोहन धवन(माजी केंद्रीय मंत्री), सोमपाल शास्त्री(कृषि अर्थशास्त्रज्ञ), पवन वर्मा(जेडीयू), शाहिद सिद्दीक़ी, मोहम्मद अदीब, जयंत चैधरी(आरएलडी), उदय नारायण चौधरी(बिहार), नरेंद्र सिंह(बिहार), प्रवीण सिंह (गुजरातचे माजी मंत्री), आशुतोष (आप) आणि घनश्याम तिवारी (सपा) यांचा समावेश आहे. 

दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत सिन्हा म्हणाले, आम्ही अचानक एकत्र आलेलो नाही. बऱ्याच महिन्यांपासून आम्ही संपर्कात होतो. देशातील वर्तमान स्थितीची चिंता वाटते असेही सिन्हा म्हणाले. आम्हाला वाटते की देशातली जनतेसाठी आंदोलन करण्याची गरज आहे. आम्ही सर्व वैचारिक दृष्ट्या एकमेकांशी जोडलेले आहोत. 

 

बापूंचे सरकारीकरण केले... 
- यशवंत सिन्हा म्हणाले, आम्ही महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहाण्यासाठी राजघाटवर गेलो होतो. परंतू वाटते की बापूंचे सरकारीकरण झाले आहे. आम्हाला आत जाऊ दिले नाही. बराच वेळ विनंती केल्यानंतर आम्हाला व मीडियाला आत सोडले. 
- सिन्हा म्हणाले, 70 वर्षांपूर्वी त्या महामानवाने देशासाठी बलिदान दिले. वर्तमानातही देश अजून त्याच समस्यांनी ग्रस्त आहे. आज आम्ही उभे राहिलो नाही तर बापूंचे बलिदान व्यर्थ जाईल.

 

यशवंत सिन्हांनी सरकारच्या धोरणावर उपस्थित केले प्रश्नचिन्ह 
- अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळात अर्थमंत्री राहिलेले यशवंत सिन्हा यांनी मोदी सरकारवर जीएसटी, नोटबंदीवरुन टीका केली आहे. ते म्हणाले होते, यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे. त्यांनी काश्मीरच्या मुद्यावर सरकारने स्विकारलेल्या धोरणावरही टीका केली आहे. 
- एका लेखात सिन्हा म्हणाले होते, 'देशाची अर्थव्यवस्था सध्या वाईट स्थितीत आहे. गेल्या दोन दशकांमध्ये खासगी क्षेत्रात गुंतवणूक सर्वात कमी झाली आहे. जीएसटी अतिशय चुकीच्या पद्धतीने लागू झाले आहे. यामुळे लाखो लोकांचा रोजगार गेला आहे. अर्थव्यवस्था आधीच ढासळत चालली होती त्यात नोटबंदीने आगीत तेल ओतण्याचे काम केले.'
- एका मुलाखती सिन्हा म्हणाले होते, की पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटीसाठी वेळ मागितला होता, मात्र त्यांनी वेळ दिला नाही. 

बातम्या आणखी आहेत...