आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला आरक्षण विधेयक संमत करावे, काँग्रेसचा पाठिंबा : राहुल गांधींचे मोदींना पत्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- संसदेचे पावसाळी सत्र सुरू होण्यापूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्र लिहिले आहे. या सत्रात महिला आरक्षण विधेयक संमत करून घ्यावे, काँग्रेस यासाठी सत्ताधारी पक्षाला बिनशर्त पाठिंबा देईल, असे राहुल यांनी म्हटले आहे. सोमवारी गांधींनी लिहिलेले पत्र त्यांनी ट्विटरवर पोस्ट केले आहे. महिला सशक्तीकरणाचे आपणच अग्रदूत आहोत, असा दावा मोदी करत आहेत. राजकारण न करता त्यांनी आता आपला शब्द खरा करून दाखवावा. संसदेत त्यांनी महिला आरक्षण विधेयक संमत करून घेण्याची हीच योग्य वेळ असल्याचे ट्विट राहुल यांनी केले. 


राज्यसभेने ९ मार्च २०१० रोजी या विधेयकाला संमत केले होते. मात्र गेल्या ८ वर्षांपासून विविध कारणांस्तव हे विधेयक लोकसभेत अडकून आहे. पंतप्रधान आपल्या विविध सभांमध्ये महिला सशक्तीकरण व त्यांच्या सार्वजनिक जीवनातील वावराला महत्त्व देत आहेत. यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही मोदी म्हणत आहेत. सध्या संसदेत त्यांचे बहुमत असून त्यांनी हे विधेयक पारित करावे. आगामी निवडणुकीपूर्वी हे केल्यास याचा प्रभाव जाणवेल, असे राहुल यांनी म्हटले आहे. 

 

आरक्षणास विरोध करणाऱ्यांशी सख्य का ? 

महिला आरक्षणाचे भाजपने नेहमीच समर्थन केले आहे. मात्र ज्या पक्षांनी या विधेयकाला विरोध केला होता त्याच पक्षांशी आता काँग्रेस युती का करत आहे, असा प्रश्न भाजपने विचारला आहे. भाजपचे वरिष्ठ नेते व केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पार्टी मुख्यालयात पत्रपरिषद घेऊन काँग्रेसला प्रत्युत्तर दिले. १९८४ मधील शीखविरोधी दंगल, शाहबानो प्रकरण, दहशतवादप्रकरणी मुस्लिमांना झुकती बाजू काँग्रेसने दिली, असे अनेक दाखले जावडेकरांनी दिले. 

 

३२ लाख नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या 

महिला अारक्षण विधेयकाला पाठिंबा मिळवण्यासाठी काँग्रेसने ३२ लाख नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या आहेत. या स्वाक्षरी अभियानाची कागदपत्रे गांधींनी पंतप्रधानांकडे पाठवली आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत महिलांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळावे, हा आपला उद्देश असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. २०१४ च्या निवडणुकीत भाजपच्या जाहीरनाम्यातील हा प्रमुख मुद्दा असल्याची आठवण राहुल यांनी करून दिली आहे. 


महिला सुरक्षेसाठी काँग्रेसची आक्रोश रॅली 
मोदी सरकारवर महिला सुरक्षा व महिला आरक्षण विधेयकासाठी दबाव निर्माण केला जात आहे. महिला काँग्रेसच्या वतीने सोमवारी यासाठी आक्रोश रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सरकारने यासाठी वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर देशभरात आक्रोश रॅली काढल्या जातील, असा इशारा देण्यात आला आहे. महिला काँग्रेसच्या अध्यक्ष सुष्मिता देव यांनी रॅलीपूर्वी दिल्लीतील पक्ष मुख्यालयात पत्रपरिषद घेतली. मोदी सरकार महिलांना सुरक्षा देण्यात अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. तिहेरी तलाक विधेयकामध्ये काही दुरुस्त्या आपण सुचवल्या होत्या. मात्र काँग्रेसच्या सूचनांकडे पाठ फिरवून लोकसभेत विधेयक मंजूर करण्यात आल्याने देव यांनी नाराजी व्यक्त केली. दुरुस्त्यांविषयी चर्चा न केल्याने राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयक संमत होऊ शकले नाही. तलाक देणाऱ्या पतीसाठी शिक्षेची तरतूद असल्याने दोन पक्षांत समेटाची शक्यता यामुळे संपुष्टात येते. यामुळे काँग्रेसला यात दुरुस्ती हवी आहे. 

बातम्या आणखी आहेत...