आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनंदा पुष्कर यांनी मृत्यूपूर्वी ई-मेलवर म्हटले होते, मला जगायचे नाही; 5 जूनला सुनावणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात सुनंदा यांच्या मृत्यूसाठी शशि थरुर यांच्यावर ठपका ठेवला आहे. (फाइल) - Divya Marathi
दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात सुनंदा यांच्या मृत्यूसाठी शशि थरुर यांच्यावर ठपका ठेवला आहे. (फाइल)

नवी दिल्ली - मृत्यूच्या नऊ दिवस आधी सुनंदा पुष्करने शशी थरूर यांना लिहिलेल्या ई-मेलवर मला जगण्याची इच्छा नाही. मी मरू इच्छिते, असे लिहिले होते. ही माहिती सुनंदा पुष्कर हत्या प्रकरणात सोमवारी पतियाळा हाऊस न्यायालयात अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी समर विशाल यांच्यासमोर विशेष सरकारी वकील अतुल   श्रीवास्तव यांनी  दिली. न्यायालयात यावर ५ जून रोजी पुढील सुनावणी होणार आहे.  


वकिलांनी न्यायालयात सांगितले, सुनंदाने निधनाच्या काही दिवस आधी एक कविता लिहिली होती. त्यावरून ती नैराश्यग्रस्त असल्याचे मत तज्ज्ञाने दिले होते. वकिलांनी सांगितले, थरूर यांच्याशी सुनंदाने केलेला तिसरा विवाह होता. या विवाहास ३ वर्षे ३ महिने झाले होते. थरूर यांना संशयित आरोपी दर्शवत पोलिसांनी त्यांच्याविरोधात सुनंदास आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे व तिचा छळ केल्याचे आराेपपत्र दाखल केले आहे.

 

सुनावणीच्या वेळी सुनंदाचा मृत्यू कसा झाला, याची विचारणा न्यायालयाने वकिलास केली. यावर पोलिसांच्या वकिलांनी म्हटले, अातापर्यंतच्या तपासानुसार सुनंदाचा मृत्यू विषाने झाल्याचे निष्पन्न झाले आहे. परंतु आम्ही अजूनही तपास करत आहोत.  

 

सुनंदा नैराश्यग्रस्त असताना थरूर यांचे तिच्याकडे दुर्लक्ष  

न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, सुनंदाच्या खोलीत अल्प्रेक्सच्या २७ गोळ्या अाढळल्या. त्यातील किती गोळ्यांचे सेवन तिने केले, याची माहिती नाही. पोलिसांनी म्हटले, सुनंदा नैराश्यग्रस्त असताना, थरूर तिच्याकडे दुर्लक्ष करत होते. मृत्यूच्या काही दिवस आधी थरूर यांनी फोन करणेही सोडून दिले होते.  ते सार्वजनिक व्यासपीठ, सोशल मीडियावर एकमेकांशी चर्चा करत होते. दररोज त्यांच्यात भांडण होत असे. सुनंदाच्या शरीरावर आढळलेल्या खुणांवरून ते स्पष्ट होते. पाकिस्तानी पत्रकाराशी त्यांचे संंबंध असल्यावरून त्यांच्यात भांडण होत होते. थरूर यांनी तिच्याशी बोलणे टाळल्यामुळे सुनंदाने त्यांच्याशी सोशल मीडियावर संपर्क साधला. मृत्यूच्या काही दिवस आधी दोघे विमानातून तिरुवनंतपुरमहून दिल्लीला येत होते. या वेळी विमानातच त्यांचे भांडण झाले. यासंदर्भात सुनंदाच्या मित्रांनी जबाब दिले आहेत. या सर्वांच्या जबाबाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. यामुळे थरूर यांना समन्स पाठवावे. आरोपपत्रात त्यांच्याविरोधात सबळ पुरावे आहेत.

 

५ जूनला थरूर यांना समन्स जाऊ शकते  
पुढील सुनावणीत न्यायालय या प्रकरणातील ३००० पानी आरोपपत्राची दखल घेईल, अशी शक्यता आहे. त्यानंतर शशी थरूर यांना समन्स पाठवले जाऊ शकते. जर शशी थरूर यांच्यावर आरोप सिद्ध झाले तर त्यांना कलम ३०६ नुसार १० वर्षे व ४८९ अ नुसार तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते. तत्पूर्वी पोलिसांनी हत्येचा खटलाही दाखल केला आहे. त्यानंतर नव्याने एसआयटीने तपास केला आणि आरोपपत्र दाखल करण्यात आले.

 

 

बातम्या आणखी आहेत...