आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Buradi Death Mystery: फास घेण्‍यापुर्वी केला जादुटोणा; वाटले होते, पाण्‍याचा रंग बदलेल आणि आपण वाचू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- दिल्‍लीतील बुराडी येथे एकाच कुटुंबातील 11 जणांच्‍या मृत्‍यूप्रकरणी एक धक्‍कादायक खुलासा समोर आला आहे. कुटुंबीतील सर्वांनी आत्‍महत्‍या केली की, यामध्‍ये घातपात होता, असा संशय घटनेच्‍या पहिल्‍या दिवसापासून व्‍यक्‍त केला जात आहे. मात्र ही आत्‍महत्‍याच असल्‍याचे सबळ पुरावे दिल्‍ली पोलिसांच्‍या हाती लागले आहेत. या प्रकरणात घरात सापडलेल्या डायऱ्या आणि त्यावरील मजकूर हे महत्त्वाचे पुरावे मानले जात आहेत. मात्र एका डायरीतील शेवटच्‍या मजकुरावरून धक्‍कादायक बाब समोर आली आहे.


घरात सापडलेल्‍या एका डायरीमध्‍ये शेवटच्‍या लेखात लिहिले आहे की, 'घरचा रस्‍ता, 9 लोक जाळ्यात, बेबी (विधवा बहिण) मंदिराजवळील स्‍टूलवर, 10 वाजता जेवणाची ऑर्डर, आई खाऊ घालेल. एक वाजता विधी, शनिवार-रविवार रात्री होर्इल, तोंडात खुपसलेला असेल एक ओला कपडा, हात असतील बांधलेले.', यातील शेवटची ओळ आहे, 'कपमध्‍ये पाणी तयार ठेवा. त्‍याचा रंग बदलेल. मी प्रकट होईल आणि सर्वांना वाचवेल.'

 

यावरुन पोलिसांनी सांगितले की, या पुराव्‍यांमुळे 11 जणांनी आत्‍महत्‍या केल्‍याच्‍या दाव्‍याला पाठबळ मिळते. डायरीतील शेवटच्‍या वाक्‍यातून असे दिसते की, वास्‍तवात कुटुंबीयांना आत्‍महत्‍या करण्‍याची नव्‍हती. ते सर्वजण आपल्‍या चांगल्‍या भविष्‍यासाठी एक तपस्‍या करत होते. मात्र यामध्‍ये त्‍यांना जीव गमवावा लागला. एका आत्‍म्‍यासाठी ते मागील 7 दिवसांपासून पुजा करत होते. आणि शेवटी आत्‍म्‍याला धन्‍यवाद म्‍हणण्‍यासाठी त्‍यांनी जो विधी केला, त्‍यामध्‍ये त्‍यांना जीव गमवावा लागला.


अपघाती आत्‍महत्‍या?
पोलिसांनी ही अपघाती आत्‍महत्‍या असल्‍याचे म्‍हटले आहे. कारण तसे अनेक पुरावे पोलिसांकडे आता जमा झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनूसार, या विधीनंतर सर्वांना आपले बांधलेले हात सोडायचे होते. रजिस्‍टरमध्‍ये लिहिल्‍याप्रमाणे त्‍यांचा यावर विश्‍वास होता की, 'पाण्‍याचा रंग बदलेल आणि आत्‍मा प्रकट होऊन सर्वांना वाचवेल. विधीनंतर त्‍यांची शक्‍ती वाढेल. आणि सर्व जण बांधलेले हात सोडण्‍यास एकमेकांची मदत करतील.' मात्र वास्‍तवात ना पाण्‍याचा रंग बदलला, ना आत्‍मा प्रकट झाली, ना कोणाची शक्‍ती वाढली. सर्वांना आपल्‍या प्राणाला मात्र मुकावे लागले.

 

तिन्‍ही पिढ्यांनी ललितच्या बोलण्यावर कसा ठेवला विश्‍वास?
ललितच्‍या सांगण्‍यानूसारच सर्वांनी हा धोकादायक विधी करण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र कुटुंबातील इतर सर्वांनी ललितच्‍या बोलण्‍यावर एवढा विश्‍वास कसा ठेवला, हा प्रश्‍न उपस्थित होत आहे. मात्र डायरीतील मजकुरावरुनच या रहस्‍यावरुनही पडदा उठतो. यातील सर्वात महत्‍त्‍वाचे कारण म्‍हणजे प्रियंकाचे लग्‍न. प्रियंका ही मांगलिक असल्‍याने तिचे लग्‍न जमत नव्‍हते. यावर ललितने घरच्‍यांना काही विधी करायला लावल्‍या. त्‍या केल्‍यानंतर काही दिवसांतच प्रियंकाचे लग्‍न जमले. यामुळे घरातील तिन्‍ही पिढ्या ललितच्‍या बोलण्‍यावर विश्‍वास ठेवू लागल्‍या. दुसरे कारण म्‍हणजे, आपले ऐकल्‍यावर कुटुंबीयाचा व्यवसाय कसा वाढला, एकाची तीन दुकाने कशी झाली, भावाची मुलगी शाळेत पहिली कशी आली, याचे पुरावे घरातील इतर सदस्‍यांना ललित देत असे. याशिवाय ललितने सर्वांना धमकावले होते की, मृत वडिलांच्या आदेशावर कोणीही प्रश्नचिन्हं उपस्थित करायचे नाही. तसे केल्यास सर्व होत्याचे नव्हते होईल. त्‍यामुळे कोणीही ललितचे म्‍हणणे टाळत नसे.


आत्‍महत्‍या असल्‍याचे पुरावे
पोलिसांनी सांगितले आहे की, डायरीत ज्‍याप्रमाणे लिहिलेले आहे त्‍याच प्रकारे ही घटना घडली. डायरीत लिहिल्‍यानूसार ही क्रिया शनिवारी आणि रविवार रात्रीच घडली. डायरीत लिहिले आहे की, ललितची पत्‍नी टीना आणि सविता यांनी 5 स्‍टूल आणावे. त्‍याप्रमाणे रात्री सव्‍वा दहा वाजता स्‍टूल आणल्‍याचे सीसीटीव्‍ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. त्‍यामध्‍ये दोन मुले नंतर तार आणतानाही दिसतात. विशेष म्‍हणजे कोणाच्‍याही चेह-यावर यावेळी तणाव दिसत नाही.  

नंतर डायरीत लिहिण्‍यात आले आहे की, आई सर्वांना खाऊ घालेल. त्‍याप्रमाणे साडेदहा वाजेच्‍या सुमारास एक डिलिव्‍हरी बॉय या कुटुंबीयांना खाण्‍याचे पार्सल देताना सीसीटीव्‍ही फुटेजमध्‍ये दिसतो. डिलिव्‍हरी बॉयला देण्‍यात आलेले बिलही पोलिसांना मिळाले आहे. तसेच फासावर लटकण्‍याची जी पद्धत डायरीत लिहिण्‍यात आली आहे त्‍याचप्रमाणे सर्वजण लटकलेल्‍या अवस्‍थेत आढळले. म्‍हणजेच सर्वांच्‍या तोंडात ओले कापड होते व सर्वांचे चेहरे झाकलेले होते. डायरीतील मजकूर दुसरा कुणी लिहू शकतो असे मानले तरी सीसीटीव्‍ही फुटेजमध्‍ये घरातील सदस्‍य ज्‍याप्रमाणे स्‍टूल्‍स, तार आणि खाण्‍याचे पार्सल मागवतात त्‍यानूसार डायरीत लिहिल्‍याप्रमाणे ते विधीची तयारी करत होते, याचीच शक्‍यता जास्‍त असून त्‍याप्रमाणे आम्‍ही अहवाल सादर करणार असल्‍याचे पोलिसांनी सांगितले आहे.  

 

'11' चा खेळ
पोलिसांनी घरातून आतापर्यंत 11 रजिस्‍टर ताब्‍यात घेतले आहेत. त्‍यानूसार, मागील 11 वर्षांपासून ललितच्‍या स्‍वप्‍नामध्‍ये त्‍याचे मृत वडील येत होते. एवढेच नव्‍हे तर 2007 पासून ललित आपल्‍या वडीलांच्‍या आवाजात बोलायचा. घरच्‍यांशिवाय ही गोष्‍ट कुणालाही माहित नव्‍हती. पोलिसांनी सांगितले की, घरात कोणताही धार्मिक ग्रंथ किंवा अध्‍यात्मिक साहित्‍य मिळाले नाही. केवळ हनुमान चालीसा आणि गायत्री मंत्राचे पुस्‍तक मिळाले. 2007 मध्‍ये वडिलांच्‍या निधनानंतर ललितने डायरी लिहिण्‍यास सुरूवात केली. मागील 11 वर्षात 11 डाय-यातील बहुतांश मजकूर त्‍यानेच लिहिले आहेत. मात्र काहीवेळेस जेव्‍हा ललितच्‍या शरीरात वडीलांचा आत्‍मा येत असे तेव्‍हा ललित जे बोलायचे ते प्रियंकाही डायरीत लिहून घेत असे.     

 

 

 

बातम्या आणखी आहेत...