आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अविश्वास प्रस्ताव: 9 राज्यांत 340 मतदारसंघ, 17 प्रादेशिक पक्ष; 10 काँग्रेसच्या, 7 भाजपच्या बाजूने

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- एकजूट झालेले विरोधक मोदी सरकारच्या विरोधात शुक्रवारी अविश्वास प्रस्तावावर मतदान करतील. सभागृहात रालोआकडे ३१५ खासदार (अध्यक्षांसह) आहेत. त्यामुळे रालोआचा पराभव होण्याची शक्यता नाहीच. मात्र, अविश्वास ठरावाच्या बहाण्याने २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीआधी काँग्रेस एकजूट विरोधकांमार्फत रालोआची घेराबंदी करण्यास सज्ज झाली आहे.  


आतापर्यंत एकजूट विरोधकांचा आकार समोर आलेला नाही. अनेक पक्ष एकजूट विरोधकांच्या नावावर मोठ्या मंचांवर एकत्र दिसले तर आहेत, पण जागावाटपाच्या नावावर त्यांच्यात सहमती दिसत नाही. त्यामुळे आता अविश्वास प्रस्तावाच्या नावावर लोकसभा निवडणुकीच्या १० महिने आधी अनेक प्रादेशिक पक्षांनी आपले पत्ते उघड केले आहेत. त्यामुळे देशात रालोआ विरुद्ध एकजूट विरोधक असे चित्र स्पष्ट होत आहे. जागांच्या हिशेबाने देशातील ९ मोठ्या राज्यांत भाजपला प्रादेशिक पक्षांकडून सर्वाधिक आव्हान मिळण्याची शक्यता आहे. तेथे हे पक्ष राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावतात. या ९ राज्यांत लोकसभेच्या ३४० जागा आहेत. तेथे १० प्रमुख प्रादेशिक पक्ष अविश्वास प्रस्तावाच्या आधी काँग्रेसच्या, तर ७ रालोआच्या बाजूने दिसत आहेत. त्यात अनेकांनी मतदानापासून दूर राहून भविष्यातील शक्यता कायम राखल्या आहेत.  


महाराष्ट्र- ४८ जागा : शिवसेना पुन्हा भाजपसोबत? 
शिवसेना केंद्रात व महाराष्ट्रात रालोआचा घटकपक्ष आहे. २०१९ ची निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे शिवसेना म्हणत असली तरी गुरुवारी पुन्हा एकदा त्यांनी मोदी सरकारच्या बाजूने मतदान करण्याचे संकेत दिले आहेत. महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागा आहेत. त्यात १२२ भाजप व ६३ शिवसेनेकडे आहेत. दोन्ही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले आहेत.  
> भाजप २४ जागांवर लढला, २३ जागा जिंकल्या. शिवसेनेला २० पैकी १८ जागा.


तामिळनाडू - ३९ जागा : अण्णाद्रमुक पुन्हा चर्चेत
तामिळनाडूच्या सत्तारूढ अण्णाद्रमुकने अविश्वास प्रस्तावापासून दूर होण्याचा निर्णय घेतला आहे. सीएम पलानीसामी म्हणाले, कावेरी मुद्द्यावर कोणीही साथ दिली नाही, त्यामुळे हा निर्णय घेतला आहे. अशा स्थितीत अण्णाद्रमुक २०१९ आधी रालोआत सहभागी होऊ शकतो, असा अंदाज बांधला जात आहे. याआधीही अण्णाद्रमुक व भाजपच्या जवळीकतेची चर्चा झाली आहे.  
> अद्रमुकचे ३७ व भाजपचा १ खासदार आहे. द्रमुक संपुआचा घटक आहे.  


आंध्र + तेलंगणा- ४२ जागा : टीडीपी, टीआरएस भाजपपासून दूर
आंध्र प्रदेशचा सत्तारूढ पक्ष टीडीपीने २०१४ ची लोकसभा निवडणूक भाजपसोबत मिळून लढली होती. मात्र, आता तो रालोआपासून लांब आहे. अविश्वास प्रस्ताव टीडीपीनेच आणला आहे. तेलंगणाची सत्तारूढ टीआरएस कायम भाजपविरोधी राहिली आहे. असे असले तीर जगन रेड्डी यांचा वायएसआरसीपीची भूमिका स्पष्ट नाही. भाजप व जगन रेड्डी लवकरच एकत्र येतील, असे वृत्त आहे. 
> टीडीपीचे १६, वायएसआरसीपीचे ९ व टीआरएसचे ११ खासदार आहेत. 


प. बंगाल- ४२ जागा : टीएमसी, काँग्रेससोबत  
ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील टीएमसी अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने आहे. टीएमसीने आपल्या खासदारांसाठी व्हिपही जारी केला आहे. 
> राज्यात टीएमसीचे ३४ काँग्रेसचे ४ व भाजपचे २ खासदार आहेत.  


ओडिशा- २१ जागा : बीजद, विरोधकांसोबत 
बीजद रालोआविरुद्ध मतदान करेल. पक्षाने खासदारांना पक्षादेश जारी केला आहे. खासदारांना शुक्रवारी उपस्थित राहण्यास सांगितले आहे.  
> बीजदचे २०, भाजपचा १ खासदार आहे. भाजपला २१.५०% मते.


कर्नाटक- २८ जागा : काँग्रेस व जेडीएस 
राज्यात आघाडी सरकार आहे. जेडीएस प्रस्तावाच्या बाजूने राहिले हे निश्चित मानले जाते. दोघे आगामी निवडणूक एकत्र लढवू शकतात.  
> भाजपचे १७, काँग्रेसचे ९ व जेडीएसचे २ खासदार आहेत. 


उत्तर प्रदेश- ८० जागा : सपा, बसप, काँग्रेस  
सपा प्रस्तावाच्या बाजूने मतदान करेल असे निश्चित मानले जात आहे. बसपचे लोकसभेत खासदार नाहीत. ते आघाडीही करू शकतात. 
> भाजपचे ६९, सपाचे ७, काँग्रेस व अपना दलचे २-२ खासदार.  


बिहार- ४० जागा  : राजद प्रस्तावाच्या बाजूने  
लालूंचा राजद विरोधकांच्या बाजूने राहिला आहे. पक्ष अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने मतदान करेल. 
> राज्यात रालोआचे ३३ खासदार अाहेत. राजदचे ४, काँग्रेसचे २ खासदार आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...