आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पद‌्मावत: महाराष्ट्रातही हिंसेचे लोण, 8 राज्यांमध्ये जाळपोळ; आज 7 हजार स्क्रीनवर चित्रपट प्रदर्शित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/नवी दिल्ली- राजपूत संघटनांकडून विरोध होत असताना ‘पद‌्मावत’ चित्रपट गुरुवारी देशभरातील सुमारे ७ हजार पडद्यांवर प्रदर्शित होत आहे. चित्रपटाच्या विरोधात हिंसाचाराचे लोण बुधवारी महाराष्ट्रातही पोहोचले. महाराष्ट्रासह राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा, उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर व दिल्ली या ८ राज्यंात हिंसक निदर्शने, जाळपोळ, तोडफोड व चक्का जाम झाला. पुण्यात गाड्यांची ताेडफाेड झाली. खान्देशातील शिरपूरजवळ जमावाने बस पेटवून दिली. नाशकात जलसमाधीचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना पाेलिसांनी ताब्यात घेतले. मुंबईतही पडसाद उमटले. 


सुप्रीम कोर्टाने परवानगी दिल्यानंतरही राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश व गाेव्यात गुरुवारी पद‌्मावत प्रदर्शित होणार नाही. चित्रपटगृह मालकांच्या मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने या राज्यांत चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरातील ७५% चित्रपट गृहमालक या संघटनेशी जुळलेले आहेत.

 

> औरंगाबादेत ७ मल्टिप्लेक्समध्ये ३६ शो, आज करणी सेनेचे धरणे आंदोलन

 

महाराष्ट्रातील ‘चित्र’पट
> औरंगाबाद :  शहरात राजपूत करणी सेना आज धरणे आंदोलन करणार आहे. जालन्यात रात्री रत्नदीप टाॅकीजवर दगडफेक करून टायर जाळण्यात अाले.
> पुणे : बंगळुरू हायवेवर कार्यकर्त्यांनी रास्ता राेकाे करत वाहने फाेडली. करणी सेनेच्या २५ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
> मुंबई : शहरात निदर्शने करणाऱ्या १०० हून जास्त कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. 
>  नाशिक : गंगापूर धरण परिसरात जलसमाधी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. चित्रपटाला पाठिंबा देणाऱ्या भाजप व मनसेचाही निषेध केला. 
> धुळे : आमोदे गावाजवळ जमावाने एसटी बसच्या काचा फोडल्या, आसनांवर पेट्रोलच्या बाटल्या अाेतल्या. पाेलिसांनी ८ संशयितांना ताब्यात घेतले. 
> विदर्भ : अकाेल्यात युवकांनी शहरातून दुचाकी फेरी काढली. चिखलीत पोस्टर्स जाळले तर मोताळ्यात रास्ता रोको झाला.

 

गुरगावात स्कूल बसवर दगडफेक

राजपूत संघटनांनी गुरगावात खासगी स्कूल बसवर दगडफेक व लाठ्यांनी हल्ला केला. बसमधील २०-२५ मुले सीटखाली लपून बसली. भेदरलेली मुले रडत-ओरडत असताना जमाव दगडफेक करतच राहिला.

 

हरियाणा : गुरगाव येथे २ हायवे रोखले. वाहनांवर दगडफेक, बस जाळली. सहा जिल्ह्यांत जमावबंदी लागू झाली आहे.

राजस्थान : करणी सेनेचा चित्तोडगड प्रमुख ताब्यात. चित्तोडगड किल्ला बंद. जयपूरमध्ये रास्ता रोकाे.

 

उत्तर प्रदेश : मीरतेत पीव्हीएस माॅलवर दगडफेक, तोडफोड. मथुरेत रेल्वे रोको.  लखनऊतही अनेक ठिकाणी निदर्शने.

 

 

गुजरातेत २० हजार पोलिस तैनात 

- निमलष्करी दलासह २० हजारांवर पोलिस तैनात.

- मध्य प्रदेशच्या भोपाळ, ग्वाल्हेर, इंदूर, उज्जैन येथे निदर्शने.

- जम्मूत तिकीट खिडकीवर दगडफेक

- दिल्लीत एका मल्टिप्लेससमोर वाहनांची तोडफोड झाली. 

 

करणी सेनेचा भन्साळींवरच आरोप

> करणी सेनेचे प्रमुख लोकेंद्रसिंह कालवी यांनी हिंसाचारात हात असल्याचा इन्कार करत दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनाच जबाबदार ठरवले.

> दुसरीकडे, कानपूरच्या क्षत्रिय महासभेने पद्मावतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका पदुकोणचे नाक छाटणाऱ्याला कोट्यवधींचे बक्षीस देण्याची घोषणा केली.

बातम्या आणखी आहेत...