आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाफिज, हुरियतच्या नेत्यांसह 12 जणांवर आरोपपत्र दाखल; दहशतवाद्यांना निधीचे प्रकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांना निधी पुरवल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दहशतवाद्यांचा मास्टरमाइंड हाफिज सईद आणि सय्यद सलाहउद्दीन तसेच १० काश्मिरी फुटीरवादी नेत्यांच्या विरोधात गुरुवारी शहर न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. न्यायालय याप्रकरणी ३० जानेवारीला निर्णय देणार आहे.  


एनआयएने अतिरिक्त सत्र न्यायाधीशांच्या न्यायालयात १२ हजार ७९४ पानांचे आरोपपत्र दाखल केले. आरोपपत्रावरील युक्तिवाद ऐकल्यानंतर या प्रकरणाची दखल घेण्याच्या मुद्द्यावर ३० जानेवारीला निर्णय घेण्यात येईल, असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश तरुण शेरावत यांनी सांगितले.  


एनआयएने लष्कर-ए-तोयबा या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद तसेच हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाहउद्दीन यांच्यावर जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी आणि फुटीरवादी कारवाया करून सरकारच्या विरोधात युद्ध पुकारण्याचा कट रचल्याचा आरोप ठेवला आहे.  त्यांच्यावर भादंवि कलम १२० ब (गुन्हेगारी कट) आणि बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंधक) कायदा १९६७ च्या विविध कलमांनुसार आरोप ठेवण्यात आला आहे. हाफिज आणि सलाहउद्दीन यांच्याव्यतिरिक्त ज्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत त्यात हुरियत कॉन्फरन्सचे नेते सय्यद शहा गिलानीचा जावई अल्ताफ अहमद शहा, गिलानीचा वैयक्तिक सचिव बशीर अहमद भट, हुरियत कॉन्फरन्सचा माध्यम सल्लागार आणि रणनीतीकार आफताब अहमद शहा, नॅशनल फ्रंट या फुटीरवादी संघटनेचा प्रमुख नईम अहमद खान, जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा अध्यक्ष फारूक अहमद दार, हुरियतच्या गिलानी गटाचा माध्यम सल्लागार मोहंमद अकबर खांडे, तेहरीक-ए-हुरियतचा अधिकारी राजा मेहराजउद्दीन कालवाल, हवाला ऑपरेटर झहूर अहमद शहा वताल तसेच कामरान युसूफ आणि जावेद अहमद भट या दगडफेक करणाऱ्या दोघांचा समावेश आहे.  


एनआयएने आरोपपत्रात म्हटले आहे की, छाप्यांत जप्त करण्यात आलेली कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे यांची छाननी आणि विश्लेषण करण्यात आले. हुरियतचे नेते, दहशतवादी आणि दगडफेक करणारे लोक हे सुनियोजित कट रचून जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करत असल्याचे तसेच हिंसाचाराला फूस लावत असल्याचे या तपासात आढळले. पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांचा पाठिंबा, सहभाग आणि निधी यांच्या मदतीने भारत सरकारच्या विरोधात कट रचण्यात आला.  

 

६० ठिकाणी छापे; ९५० आक्षेपार्ह कागदपत्रे, उपकरणे जप्त  
एनआयएने दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी ३० मे २०१७ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आणि पहिली अटक २४ जुलै २०१७ रोजी करण्यात आली. या प्रकरणाचा तपास करताना जम्मू आणि काश्मीर, हरियाणा तसेच दिल्लीत ६० ठिकाणी छापे टाकण्यात आले. या छाप्यांत ९५० आक्षेपार्ह कागदपत्रे आणि ६०० पेक्षा जास्त इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली. ३०० साक्षीदारांची चौकशी करण्यात आली.