आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयसीआयसीआयच्या सीईओ कोचर यांनी नोंदणी नियमांचे केले उल्लंघन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आयसीआयसीआय बँक आणि बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी (एमडी आणि सीईओ) चंदा कोचर यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. बाजार नियामक सेबीने व्हिडिओकॉन समूहाला दिलेल्या कर्ज प्रकरणाची प्राथमिक तपास पूर्ण केला आहे. 


या तपास अहवलामध्ये व्हिडिआेकॉनला कर्ज देण्यात गडबडी झाल्याचे दिसून येत आहे. व्हिडिओकॉन आणि कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या दरम्यान असलेल्या आर्थिक व्यवहाराची माहिती सार्वजनिक करताना चंदा कोचर यांनी बाजार नियमांचे उल्लंघन केले आहे. बँकेच्या संचालकांनी लिस्टिंगच्या नियमांचे पालन केले की नाही, ते सुनिश्चित करण्यात बँकदेखील अयशस्वी ठरली आहे. त्यामुळे आयसीआयसीआय बँक आणि चंदा कोचर या दोघांच्या विरोधात "अॅडज्युडिकेशन प्रोसिडिंग'ची शिफारस करण्यात आली आहे. आयसीआयसीआय बँकेने २०१२ मध्ये व्हिडिओकॉन समूहाला ३,२५० कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. कर्जाचे रिस्ट्रक्चरिंग करण्याच्या प्रकरणात कोचर कुटुंबीयांचा समावेश होता. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी यात आयसीआयसीआय बँकेवर २५ कोटी रुपये तर चंदा कोचर यांच्यावर एक कोटी रुपयांचा दंड लावण्याची शक्यता असल्याचे सेबीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. याव्यतिरिक्त कारवाई होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. 


दीपक कोचर यांच्या कंपनीत मॉरिशसच्या मार्गे ही झाली गुंतवणूक 
दीपक कोचर यांच्या कंपनीमध्ये काही गुंतवणूक मॉरिशसच्या मार्गाने ही झाली असल्याचा आरोप अाहे. त्यामुळे भारतीय तपास संस्था तेथून माहिती जमा करत आहे. या आरोपांनुसार मॉरिशसची कंपनी फर्स्ट लँड होल्डिंग्सने न्यू पॉवरमध्ये ३२५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. फर्स्ट लँड एस्सार समूहाचे सह-संस्थापक रवी रुईया यांचे जावई निशांत कनोडिया यांची कंपनी आहे. व्हिसलब्लोअर अरविंद गुप्ता यांचा आरोप आहे की, त्या बदल्यात बँकेने एस्सारला कर्ज दिले. एस्सार समूहाने या आरोपाचे खंडन केले आहे. फर्स्ट लँड होल्डिंग्जशी याचा काहीही संबंध नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. 


दीपक कोचर आणि धूत न्यू पाॅवर रिन्युएबल्सचे संस्थापक होते 
सेबीच्या तपासात चंदा कोचर यांनी मान्य केले की, पती दीपक कोचर यांची कंपनी न्यू पॉवर रिन्युएबल्स व व्हिडिओकॉन समूहात काही वर्षांत अनेक व्यवहार झाले. दीपक कोचर व व्हिडिओकॉनचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत न्यू-पॉवर रिन्युएबल्सचे संस्थापक होते. जून २००९ मध्ये धूत व पॅसिफिक कॅपिटलचे शेअर सुप्रीम एनर्जीला विक्री करण्यात आले. पॅसिफिक कॅपिटल कंपनी दीपक कोचर यांच्या वडिलांच्या नावावर आहे. वेणुगोपाल धूत यांनी पुन्हा न्यू पॉवरमध्ये डिबेंचर्सच्या माध्यमातून ६४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. 


बँक न्या. बी.एन.श्रीकृष्ण यांच्यामार्फत करत आहे तपास 
सेबीचा तपास सुरू झाल्यानंतर बँकेच्या संचालक मंडळानेही स्वतंत्र तपास करण्याची घोषणा केली होती. त्यासाठी बँकेने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी.एन.श्रीकृष्ण यांच्यावर जबाबदारी दिली आहे. मागील आठवड्यात बँकेच्या वतीने शेअर बाजारात जमा करण्यात आलेल्या फायलिंगनुसार चंदा कोचर एमडी तसेच सीईओ पदावर कायम राहतील. मात्र, तपास पूर्ण होईपर्यंत त्या सुटीवर राहतील. बँकेचे कामकाज पाहण्यासाठी संदीप बक्षी यांची मुख्य ऑपरेटिंग अधिकारी (सीओओ) पदी नियुक्ती केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...