आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिखर परिषद : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 4 वर्षांत चौथ्यांदा पुतीन यांच्या निमंत्रणावरून रशिया दौरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली -  पंतप्रधान नरेंद्र मोदी  रविवारी रशिया दौऱ्यासाठी रवाना झाले. मोदींचा हा चार वर्षांतील चौथा दौरा आहे. ते सोमवारी सोची शहरात राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत औपचारिक शिखर बैठकीत सहभागी होतील. मोदी पुतीन यांच्या निमंत्रणावरून रशियात गेले आहेत. पुतीन यांची नुकतीच रशियाच्या अध्यक्षपदी तिसऱ्यांदा निवड झाली आहे. मोदी व पुतीन यांच्यात इराण अणुकरारातून अमेरिका बाहेर पडल्याचे परिणाम, आयएस, सिरिया, अफगाणिस्तान व अणुशक्तीच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. 


भारत व रशियातील वार्षिक शिखर परिषद २००० पासून सुरू आहे. या बैठका आळीपाळीने मॉस्को व  नवी दिल्लीत आयोजित केल्या जातात. मोदी यांच्या दौऱ्याबाबत भारताचे राजदूत पंकज शरण म्हणाले,  पुतीन नव्याने राष्ट्राध्यक्ष होऊन दोन आठवडे झाले आहेत. त्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांना रशियात येण्याचे निमंत्रण दिले आहे. भविष्यात रशियाचा प्राधान्यक्रम, भारत-रशिया संबंधांवर चर्चा करावी, अशी पुतीन यांची इच्छा आहे. पुतीन व मोदी एकत्र भोजन घेतील. 

 

नव्या काळात दोन जुने मित्र, मात्र विश्वास कायम  

भारत व रशियात दरवर्षी शिखर परिषद होते. दोघे एकमेकांना महत्त्वाचा व्यूहात्मक भागीदार मानतात हे याचे कारण. शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर गेल्या काही वर्षांत रशिया व अमेरिकेच्या नेतृत्वाखालील पाश्चिमात्य देशांत एका नव्या शीतयुद्धाची सुरुवात झाली आहे. एका पाहणीनुसार ४५% रशियन जनता भारताबाबत अद्यापही सकारात्मक आहे. केवळ ९% लोक नकारात्मक आहेत. असे असले तरी गेल्या काही वर्षांत भारत अमेरिकेच्या जास्त जवळ आला आहे. त्यामुळे रशिया चीन व पाकिस्तानच्या जवळ आला आहे. मात्र, जुने मित्र नव्या मित्रापेक्षा चांगले आहेत, असे भारत व रशियाला वाटते. 

 

> मोदींच्या रशिया दौऱ्याकडून अपेक्षा : कूटनीती, रणनीती, अर्थनीती  

 

* आण्विक शक्ती  रशिया भारतात १८ प्रकल्प स्थापणार  
भारत जगात सर्वात मोठ्या संरक्षण सामग्री आयातदारांपैकी एक आहे. रशिया तेल व नैसर्गिक वायूच्या बाबतीत खूप समृद्ध आहे. अमेरिका व चीननंतर भारत तेल व गॅस सर्वात जास्त आयात करतो. २०३० पर्यंत रशिया, भारतात १६ ते १८ अणुऊर्जा प्रकल्प स्थापणार आहे. यामध्ये एकाची क्षमता १००० मेगावॅट आहे. एका अणुभट्टीची किंमत १७ हजार कोटी रु. आहे.  

 

* संरक्षण करार  रशिया, वायू क्षेपणास्त्रविरोधी प्रणाली देणार  
भारत रशियाकडून आणखी एक पाणबुडी भाडेकरारावर घेऊ इच्छितो.  रशियाकडून ४० हजार कोटी रुपये खर्चातून हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली खरेदीचा करार केला आहे.रशियाने भारताला कमी किमतीत सुखोई टी-५० लढाऊ विमाने देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. भारत रशियाचा सर्वात मोठा शस्त्र खरेदीदार देश आहे. ६८% लष्करी हार्डवेअर भारत रशियाकडून खरेदी करतो.  

 

* आर्थिक सहकार्य  व्यापार २ लाख कोटींवर नेण्याचे उद्दिष्ट  
भारत आणि रशिया यांच्यात व्यापारी संबंध वाढवण्यासाठी सरकारी पातळीवर विशेष प्रयत्न केले जात अाहेत. याचाच भाग म्हणून भारत व रशिया यांच्यात सध्या वार्षिक ८० हजार कोटी रुपयांहून जास्त द्विपक्षीय व्यापार होत आहे. दोघे तो २०२५ पर्यंत २ लाख कोटीपर्यंत नेऊ इच्छितात. यावर भारत व रशियात चर्चा होऊ शकते.  २०१२ मध्ये दोन्ही देशांतील व्यापारात २४% वाढ झाली होती.

 

मोदींची अनौपचारिक कूटनीती; अमेरिका, युरोपीय देशांना देतील मैत्रीचा  संदेश  

पारंपरिक पद्धतीच्या बैठकीचे स्वरूप बाजूला ठेवत पंतप्रधान मोदी यांनी  आता अनौपचारिक बैठकांचा ट्रेंड सुरू केला आहे. त्यांनी चीन दौऱ्यात चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबतच्या बैठकीत याचा प्रत्यय आला. अशा बैठकीनंतर औपचारिक निवेदन दिले जात नाही. दोन्ही नेते विषय आपल्या पद्धतीने निवडतात. मोदी व पुतीन यांच्यातील अनौपचारिक शिखर परिषदेचा हेतू दोन्ही देशांत मैत्री व विश्वासाचा वापर करून जागतिक व प्रादेशिक मुद्द्यांवर भूमिका कायम करणे हा आहे.  दोन्ही देश अमेरिका व अन्य युरोपीय देशांना जुन्या मैत्रीच्या ताकदीची जाणीव करू इच्छितात.  

 

* अमेरिकेच्या रशियाविरुद्धच्या निर्बंधांमुळे भारत-रशियातील संरक्षण करारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. भारताने हा मुद्दा अमेरिकेसमोर उचलला आहे.  

 

 

 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...