आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षातून दोनदा होणार JEE Mains, NEET; एनटीए घेणार देशभर परीक्षा, ज्‍यात अधिक गुण तेच ग्राह्य धरले जाणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - वैद्यकीय प्रवेश परीक्षा “नीट’ आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा “जेईई मेन्स’ आता वर्षातून दोन वेळा घेतली जाईल. जेईईची परीक्षा दरवर्षी जानेवारी आणि एप्रिलमध्ये तर नीट परीक्षा फेब्रुवारी व मेमध्ये घेतली जाईल. यामुळे विद्यार्थी या दोन्ही परीक्षा देऊ शकतील. शिवाय प्रवेशासाठी दोन्ही परीक्षांपैकी ज्यात अधिक गुण आहेत ते ग्राह्य धरले जातील. नीट, जेईई मेन्ससोबत यूजीसी-नेट परीक्षा घेण्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) स्थापन करण्यात येणार आहे.


मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. आतापर्यंत या परीक्षा घेण्याची जबाबदारी सीबीएसईवर होती. यूजीसी नेट परीक्षा आता वर्षातून एकदा डिसेंबरमध्ये घेतली जाणार असल्याचे जावडेकर यांनी सांगितले. येत्या शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी होत आहे. एनटीएच्या माध्यमातून पहिली परीक्षा नेटचीच होईल. याशिवाय सी-मॅट आणि जी-पॅटही एनटीएच घेणार आहे. जेईई-अॅडव्हान्स परीक्षा पूर्वीप्रमाणेच घेता येईल, असेही जावडेकर यांनी स्पष्ट केले. एनटीच्या वतीन घेतल्या जाणाऱ्या या परीक्षांचे वेळापत्रक व इतर माहिती मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वेबसाइटवर दिली जाईल.


एनटीए कशासाठी?
सीबीएसईवर सध्या प्रचंड ताण आहे. त्यामुळे शैक्षणिक पात्रता परीक्षा घेणे या बोर्डाला शक्य होत नाही. त्यासाठी एसएससीसारख्या वेगळ्या शैक्षणिक पात्रता परीक्षा घेण्याची जबाबदारी एनटीएकडे सोपवण्यात आली आहे. यामुळे परीक्षेचा दर्जा सुधारले आणि चांगले उमेदवारी मिळतील.

 

जेईई, नीट वर्षातून दोनदा का? पॅटर्न बदलणार का?

यामुळे विद्यार्थ्यांचा ताण कमी होईल. वर्षभर तारखेची वाट पाहण्याची गरज नाही. १२वीनंतर विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून हा बदल करण्यात आला. सध्या बारावीचे विद्यार्थी बोर्ड परीक्षेसोबत नीट व जेईई देत आहेत. आता या परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना १२ वी बोर्डासोबत एका वर्षात दोन संधी मिळतील. पॅटर्नमध्ये कोणताही बदल होणार नाही. दोन्ही वेळा परीक्षा दिली तर ज्यात अधिक गुण मिळतील ते ग्राह्य धरले जातील.

 

किती दिवसांत होईल परीक्षा?
- बोर्डाच्या परीक्षेपूर्वी जानेवारीमध्ये आणि बोर्डाच्या परीक्षेनंतर म्हणजे एप्रिलमध्ये अशी परीक्षांची वेळ ठेवण्यात आली आहे.


इच्छुक विद्यार्थी स्वत: परीक्षेची तारीख निवडू शकतील?
- विद्यार्थी स्वत: परीक्षेची तारीख निवडू शकतील. दोन्ही परीक्षा देण्याची गरज नाही.


ऑनलाइन मोडमध्ये परीक्षा घेण्याचा फायदा काय?
- यामुळे पेपर फुटण्याची आणि गोंधळ होण्याची शक्यता कमी असते. संधी हुकली तर दुसऱ्यांदा परीक्षा देता येईल असे सांगण्यात येते... समजा एखादा विद्यार्थी जानेवारीत होणारी परीक्षा काही कारणामुळे देऊ शकला नाही तो विद्यार्थी एप्रिलमध्ये होत असलेली हीच परीक्षा पुन्हा देऊ शकणार आहे.


निकाल कधी, कसा मिळणार?
प्रत्येक परीक्षेनंतर गुण जाहीर केले जातील. मात्र, गुणवत्ता यादी दोन्ही परीक्षांचे निकाल लागल्यावरच एकत्रितपणे जाहीर होईल. प्रवेश याच आधारे होतील.


ऑनलाइनमुळे पेपर फुटत नाहीत? मग एसएससीमध्ये कसे फुटले?
एसएससी ऑनलाइन परीक्षा घेण्याच्या प्रक्रियेमध्ये अनेक उणिवा राहिल्या होत्या. याशिवाय ही परीक्षा घेणारी एजन्सी आणि सेंटरच्या प्रक्रियेत ज्यांच्यावर जबाबदारी होती त्यांचा निष्काळजीपणा होता.


किती सेंटर्स असतील?
संबंधित शहरांत असलेली केंद्रीय विद्यालये किंवा प्रमुख अभियांत्रिकी महाविद्यालयांत परीक्षेच्या सेंटरची सुविधा दिली जाणार आहे.

 

परीक्षा ऑनलाइन होणार की ऑफलाइन?

ही परीक्षा पूर्णपणे ऑनलाइन असेल. परीक्षेचा सराव घरी किंवा एखाद्या कॉम्प्युटर सेंटरवर करता येईल. सरावासाठी ऑनलाइन पेपर एनटीएच्या पोर्टलवर अपलोड केले जातील. ज्यांच्याकडे संगणक नाहीत अशांना जवळच्या कॉम्प्युटर सेंटरवर जाऊन सराव करता येईल.

 

बातम्या आणखी आहेत...