आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू आणि काश्मीरमध्ये त्वरित विधानसभा निवडणूक घ्यावी; काँग्रेसची मागणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जम्मू आणि काश्मीरमध्ये लवकरात लवकर विधानसभा निवडणूक घ्यावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. राज्यात निर्वाचित सरकारची लवकर स्थापना व्हावी, असे मतही पक्षाने व्यक्त केले आहे. 


माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या जम्मू-काश्मीर समितीची सोमवारी येथे बैठक झाली. तीत राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. बैठकीनंतर समितीच्या सदस्य आणि जम्मू-काश्मीरच्या प्रभारी अंबिका सोनी यांनी पत्रकारांना सांगितले की, राज्यात आघाडी सरकारच्या स्थापनेबाबत बैठकीत कुठलीही चर्चा करण्यात आली नाही. राज्यपाल राजवट समाप्त करून लवकरात लवकर विधानसभा निवडणूक व्हावी आणि निवडून आलेले सरकार स्थापन व्हावे, असे आमच्या पक्षाला वाटते. या बैठकीला गुलाम नबी आझाद, डॉ. करणसिंह, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि जम्मू-काश्मीर काँग्रेसचे अध्यक्ष गुलाम अहमद मीर उपस्थित होते. 


माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षासोबत आघाडी करून सरकार स्थापन करण्याबाबत काँग्रेस पक्ष तयार आहे काय, या प्रश्नाला उत्तर देणे सोनी यांनी टाळले. पीडीपी-भाजप आघाडी सरकारमधून भाजप गेल्या महिन्यात बाहेर पडला होता. त्यानंतर राज्यात राज्यपालांची राजवट जारी करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी यापूर्वीच आघाडी सरकार स्थापन करण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. 


निवडणूक एकमेव पर्याय : तारिगामी 
श्रीनगर |
जम्मू आणि काश्मीरमध्ये लवकरात लवकर नव्याने निवडणूक घ्यावी, अशी मागणी माकपचे एकमेव आमदार मोहम्मद युसूफ तारिगामी यांनी सोमवारी केली. पत्रकारांशी बोलताना तारिगामी म्हणाले की, राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी आपण कुठल्याही पक्षाला किंवा आघाडीला पाठिंबा देणार नाही. राज्यातील एकूण राजकीय परिस्थिती पाहता नव्याने निवडणूक घेण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. जेवढ्या लवकर निवडणूक होईल तेवढ्या लवकर परिस्थिती सुरळीत होईल आणि तेच राज्यातील लोकांच्या हिताचे ठरेल. 


हिजबुलचे दहशतवादी मॉड्युल उघडकीस, दोघांना अटक 
जम्मू |
जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी किश्तवाड जिल्ह्यात हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचे मॉड्युल उघडकीस आणले असून एक दहशतवादी आणि त्याच्या संघटनेसाठी काम करणाऱ्या एका सक्रिय सदस्याला अटक केली आहे. 


किश्तवाडचे विशेष पोलिस अधीक्षक अबरार अहमद यांनी सांगितले की, रविवारी एका दहशतवाद्यासह दोन जणांना अटक करून हिजबुल मुजाहिदीनचे मॉड्यूल उद्ध्वस्त करण्यात आले आहे. या दोघांकडून स्फोटके आणि शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. ठोस माहितीच्या आधारावर पोलिसांनी किश्तवाडमध्ये काही ठिकाणी नाकेबंदी केली. नाकेबंदीदरम्यान हिजबुलच्या दहशतवाद्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याची तपासणी केल्यानंतर त्याच्याकडे चिनी बनावटीचे पिस्तूल, काडतुसे, दोन हातबॉम्बसह काही कागदपत्रे जप्त करण्यात आली. पोलिस अनेक दिवसांपासून हिजबुल मुजाहिदीनचे मॉड्युल उघडकीस आणण्याच्या प्रयत्नात होते. जिल्ह्यातील लोकांना भीती दाखवून हिजबुल मुजाहिदीन ही संघटना पुन्हा आपला जम बसवण्याच्या प्रयत्नात आहे. 

बातम्या आणखी आहेत...