आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाऊ आनंदकुमारची हकालपट्टी करत मायावती म्हणाल्या, अध्यक्ष होण्याचं स्वप्न कोणीही पाहू नये!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनौ- बसपा प्रमुख मायावती यांनी त्यांचे भाऊ आनंदकुमार यांना बसपाच्या उपाध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली आहे. तसेच आर. एस. कुशवाहा यांची उत्तर प्रदेश बसपाच्या अध्यक्षपदी तर राम अचल राजभर यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे. दरम्यान, पुढील 20 वर्षे मीच पक्षाची अध्यक्ष राहीन. त्यामुळे यापुढे पक्षाचा   अध्यक्ष होण्याचे किंवा माझा उत्तराधिकारी होण्याचे स्वप्न कोणी पाहू   नये, असे सांगत बसपाप्रमुख यांनी आपल्या बंधूला लक्ष्य केल्याचे मानले जात आहे. तसेच माझ्या माघारी पक्षाचा जो राष्ट्रीय अध्यक्ष होईल त्याच्या कुटुंबातील सदस्याला पक्ष संघटनेत कोणतेही स्थान देऊ नये, असेही मायावती यांनी म्हटले आहे.

 

मायावती यांनी आज राजधानी लखनौत पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक घेतली. याचदरम्यान मायवतींनी पक्ष संघटनेत केलेल्या बदलाची माहिती दिली.

 

मायावती म्हणाल्या, पक्षाच्या प्रमुखपदी मी आणखी 20-22 वर्षे अध्यक्ष राहू इच्छिते. त्यामुळे पुढील काळात कोणीही अध्यक्ष बनण्याचे किंवा माझा उत्तराधिकारी बनण्याचे स्वप्न पाहू नये. आपला भाऊ आनंदकुमार यांची पक्षाच्या उपाध्यक्षपदावरून हकालपट्टी केल्यानंतर मायावती म्हणाल्या, मी स्वत: किंवा माझ्यानंतर जो पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष होईल, त्यांच्या तहहयात व मृत्यूपश्चातही त्याच्या कुटुंबातील निकटच्या सदस्यांना पक्षाच्या संघटनेत कोणत्याही पदावर नियुक्त केले जाणार नाही. मात्र, त्यांच्या कुटुंबातील सदस्य पक्षात कोणत्याही पदाव्यतिरिक्त एक सामान्य कार्यकर्ता म्हणून राहू शकतात व निस्वार्थ भावनेने पक्षाचे काम करू शकतात, असेही मायावती यांनी स्पष्ट केले.

 

पक्षाच्या आगामी वाटचालीबाबत बोलताना मायावती म्हणाल्या, समविचारी पक्षासोबत पक्ष आघाडी करू शकतो. मात्र, ही आघाडी केवळ सन्मानजनक जागा  मिळाल्यासच होऊ शकते. कर्नाटकमध्ये भाजपला अपयश आल्याने भाजप लोकसभा निवडणूका डिसेंबर महिन्यात घेऊ शकते त्यामुळे कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीबरोबरच इतर राज्यातील विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करावे असेही त्या म्हणाल्या.

 

मायावतींचे बंधू आनंदकुमार यांच्याशी मतभेद-

 

मायवती यांनी आपले बंधू आनंदकुमार यांची एप्रिल 2017 मध्ये बहुजन समाज पक्षाच्या उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली होती. खुद्द मायवती यांनीच याबाबतची घोषणा केली होती. मात्र, त्यावेळी आनंदकुमार यांच्यासमोर काही अटी ठेवण्यात आल्या होत्या. उपाध्यक्षपदाच्या कार्यकाळात आनंदकुमार हे आमदार, खासदार, मंत्री किंवा मुख्यमंत्री बनू शकणार नाहीत, अशी अट घातली होती. बसपाचे संस्थापक कांशीराम यांच्या आजारपणाच्या काळामध्ये आनंदकुमार यांच्या कुटुंबाने त्यांची काळजीपूर्वक देखभाल केली होती. मात्र, वर्षभराच्या अनुभवानंतर पक्षात गटतट होण्याची भीती व्यक्त होऊ लागली होती. मायावती यांच्यावर घराणेशाहीचा आरोप होऊ लागला होता. तसेच आनंदकुमार यांनी पक्षाच्या काही नेत्यांना आपल्या बाजूने वळवायला सुरूवात केली होती. याची कुणकुण लागताच मायावती यांनी बंधू आनंदकुमार यांची पक्षाच्या उपाध्यक्षपदावरून हकालपट्टी केली तसेच बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या तहहयात व मृत्यूपश्चातही त्याच्या कुटुंबातील सदस्य पक्षसंघटनेत कोणत्याही पदावर विराजमान होणार नाही याची पक्षाच्या घटनेत बदल करून घेतला आहे. 

बातम्या आणखी आहेत...