आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली - कास्टिंग काऊचपासून संसदही दूर नाही या काँग्रेसच्या नेत्या रेणुका चौधरी यांच्या अलीकडच्या वक्तव्यानंतर खूप गदारोळ उडाला. त्यामुळे राजकारणात महिलांच्या शोषणाबाबतची वस्तुस्थिती काय आहे, हे ‘भास्कर’ने जाणून घेतले. त्यासाठी लोकसभा आणि राज्यसभेच्या एकूण ८१ महिला खासदारांपैकी ७० जणींशी संपर्क साधण्यात आला. त्यात सोनिया गांधी आणि मोदी सरकारमधील आठ महिला मंत्र्यांचा समावेश नाही. ५७ महिला खासदारांनी म्हणजे ८० टक्क्यांपेक्षा जास्त जणींनी रेणुकांच्या मताशी सहमती दर्शवली नाही.
संसदेत कास्टिंग काऊच होते असे म्हणणे वस्तुस्थितीपासून कोसो दूर आहे, असे त्यांचे म्हणणे होते. आंध्र प्रदेशमधील टीडीपी खासदार आणि वायएसआर काँग्रेसच्या गीता कोतुपल्ली यांनी मात्र, राजकारणात महिलांचे लैंगिक शोषण होते हे मान्य केले. अनेक खासदारांनी असेही सांगितले की, हा रेणुका चौधरींचा पब्लिक स्टंट आहे.
सर्वेक्षणात तृणमूलसह काही पक्षांच्या १३ महिला खासदारांनी टिप्पणी करण्यास नकार दिला. पण त्यांनी रेणुका चौधरी यांच्या वक्तव्याचे समर्थनही केले नाही. रेणुका चौधरी म्हणाल्या की, माझे वक्तव्य पब्लिसिटी स्टंट आहे आणि इतर सगळ्या सीतामाई आहेत, दुधाने धुतलेल्या आहेत अशी विचारसरणी राहिली तर आमचा सगळ्यांचा बळी जाईल. रेणुका चौधरींच्या वक्तव्याबद्दल विचारले असता टीडीपीच्या खासदार सीतारामा लक्ष्मी म्हणाल्या की, रेणुका चौधरी यांचे वक्तव्य हे त्यांचे व्यक्तिगत मत आहे. संसदेत कास्टिंग काउच होत नाही, पण राजकारणात तसे घडते. बांकुराच्या तृणमूलच्या खासदार मुनमुन सेन देववर्मा म्हणाल्या की, अनेक क्षेत्रांत कास्टिंग काउचच्या घटना होतात. पण महिला खासदाराबाबत असे घडल्याचे कधी ऐकले नाही.
लैंगिक शोषणाचा प्रकार तुमच्याबाबत घडला का, या प्रश्नावर रेणुका चौधरी म्हणाल्या की, हो, तेव्हा मी काँग्रेसमध्ये नव्हते. त्याबाबत पंतप्रधान राजीव गांधींची भेटही घेतली होती. या प्रकारात कोण सामील आहे असे त्यांनी विचारले होते. त्यांनी आपल्या शक्तिशाली नेत्याविरुद्ध कारवाई केली होती. या नेत्याने नंतर माफी मागितली. मी पुस्तक लिहीत आहे. त्यात सर्व गोष्टी लिहीन. संसदेत कास्टिंग काऊचच्या घटनेबद्दल विचारले असता त्यांनी गोलमोल उत्तर देत, पुराव्याची काय गरज आहे, असे विचारले. यूपीत अमरमणी त्रिपाठी मंत्री होते. त्याने एका महिलेचा खूनही केला होता. भाजपच्या २१-२२ आमदारांवर छेडछाड-बलात्काराचे आरोप आहेत. भाजपने जम्मू-काश्मीरमध्ये दोन मंत्र्यांचे राजीनामे का घेतले? त्यांची मजबुरी काय होती? त्यामुळे मी जे म्हटले त्यावर एवढी हैराणी का? महिला खासदारांनी तुमचे वक्तव्य म्हणजे पब्लिसिटी स्टंट असल्याचे म्हटले असल्याबद्दल विचारले असता चौधरी म्हणाल्या की, ही लोकशाही आहे, त्यांची मर्जी. असे म्हणणाऱ्यांच्या विचारसरणीची घृणा वाटते. रेणुका चौधरी यांच्या वक्तव्यावर बरसतच्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार डॉ. ककोली घोष म्हणाल्या की, त्यांचे वक्तव्य नीट समजून घेतले नाही, असे मला वाटते. प्रत्येक ठिकाणी लैंगिक शोषण होते, पण संसदेपर्यंत पोहोचणाऱ्या महिलांशी असा प्रकार होत नाही. कारण संसदेत नैतिकतेचा स्तर खूप उच्च आहे.
(भास्कर टीम : राजीवकुमार, अमितकुमार निरंजन, विजयालक्ष्मी, शरद पांडेय, राहुल संपाल)
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.