आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Nirbhaya Case Verdict Live Today Supreme Court To Decide On Death Penalty Of Three Rapist

Nirbhaya Case: गुन्हेगारांची फाशीची शिक्षा कायम; सुप्रीम कोर्टाने तिन्ही आरोपींच्या याचिका फेटाळल्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ रोजी रात्री धावत्या बसमध्ये निर्भयावर सामूहिक बलात्कार करणाऱ्या नराधमांची फाशीची शिक्षा कायम असेल. सुप्रीम कोर्टाने सोमवारी मुकेश सिंह (२९), पवन गुप्ता (२२) आणि विनय शर्मा (२३) या गुन्हेगारांची फेरविचार याचिका फेटाळून लावली आहे. 


आरोपींना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेच्या निर्णयावर फेरविचार करण्याचा काहीही आधार नसल्याचे कोर्टाने म्हटले. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. आर. भानुमती व न्या. अशोक भूषण यांच्या पीठाने हा निर्णय देताना म्हटले की, हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात दाखल याचिकेवर सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने आरोपींना त्यांची बाजू मांडण्याची पूर्ण संधी दिली होती. आरोपींनी डिसेंबर २०१७ मध्ये फेरविचार याचिका दाखल केली होती. एक आरोपी अक्षयकुमार ठाकूर याने (३१) फेरविचार याचिका दाखल केली नव्हती. 


सुप्रीम कोर्टाने ४ मे रोजी तिन्ही फेरविचार याचिकांवरील निर्णय सुरक्षित ठेवला होता. याआधी ५ मे २०१७ रोजी सुप्रीम कोर्टाने बलात्कार व हत्येप्रकरणी चारही आरोपींना दिल्ली हायकोर्टाने सुनावलेली फाशीची शिक्षा कायम ठेवली होती.

 
एका आरोपीची आत्महत्या 
अत्याचार आणि निर्घृणपणे जखमी केल्यानंतर दोषींनी दक्षिण दिल्लीच्या एका परिसरात पीडितेला रस्त्यावर फेकले होते. सिंगापूरमध्ये उपचारादरम्यान पीडितेचा 29 डिसेंबर 2012 रोजी मृत्यू झाला होता. तिहार जेलमध्ये कैदेत असलेला एक आरोपी राम सिंहने आत्महत्या केली होती. आरोपींमध्ये एक अल्पवयीनदेखिल होता. त्याला जुवेनाइल जस्टीस बोर्डाने दोषी ठरवले होते. 3 वर्षांची शिक्षा उपभोगून तो बाहेर आला आहे. सुप्रीम कोर्टाने आधी दिलेल्या निर्णयात घटना अत्यंत क्रूर आणि निर्घृण असल्याचे म्हटले होते. अशा घटनांनी अशी सुनामी येऊ शकते ती सभ्य समाजाचा विनाश करू शकते, असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले होते. 

 

बातम्या आणखी आहेत...