आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द ग्रेट इंडियन पॉलिटिकल ड्रामा: १२६ विरुद्ध ३२५ मते; अविश्वास प्रस्ताव फेटाळला, सरकार स्थिर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिव्य मराठी नेटवर्क
नवी दिल्ली- मोदी सरकारविरुद्धचा पहिला अविश्वास ठराव शुक्रवारी संसदेत १९९ मतांनी फेटाळला. तत्पूर्वी तेलुगू देसमच्या ठरावावर दिवसभर व रात्री ११ वाजेपर्यंत लोकसभेत चर्चा झाली. विविध पक्षांनी ठरावाच्या बाजूने व विरोधात आपापली मते मांडली. मात्र, यात राहुल गांधी यांचे आक्रमक भाषण आणि भाषणानंतर त्यांनी पंतप्रधान मोदींची त्यांच्या आसनापर्यंत जाऊन घेतलेली गळाभेट लक्षणीय ठरली. 


मोदींनीही सडेतोड उत्तर दिले. सुमारे दीड तासाच्या भाषणात मुद्देसूद उत्तरे दिली. राहुल व काँग्रेसला त्यांनी घेरले. मोदी म्हणाले, विरोधी पक्षांना २०२४ मध्येही असाच ठराव मांडण्याची शक्ती भगवान शंकराने द्यावी, अशी मी प्रार्थना करतो. तत्पूर्वी राहुल यांनी राफेल कराराचा मुद्दा उपस्थित करून संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण देशाशी खोटे बोलल्याचा आरोप केला.


खुर्चीवर येताच राहुलने मारला डाेळा
राहुल यांनी भाषणात  मोदींवर हल्लोबोल केला. राहुल यांनी काँग्रेस, हिंदुस्थानी व धर्माची व्याख्या सांगितल्याबद्दल उपरोधिक शैलीत मोदींचे आभारही मानले. मोदींना उद्देशून ते म्हणाले, ‘तुमच्यासाठी मी पप्पू असेन, तरीही तुमच्याबद्दल माझ्या मनात द्वेष नाही.’ एवढे बोलून राहुल यांनी पंतप्रधानांजवळ जात मोदींना उठण्यासाठी खुणावले. मोदींनी हस्तांदोलनासाठी हात पुढे केले. एवढ्यात राहुल यांनी झुकत मोदींची गळाभेट घेतली. राहुल परत निघाले तेव्हा मोदींनी त्यांना पुन्हा हाक मारून बोलावले आणि डाव्या हाताने त्यांची पाठ थोपटली.

 

मी चौकीदार आणि भागीदारही
- राहुल गांधी यांनी आपल्या आक्रमक भाषणात मोदी चौकीदार नव्हे, भागीदार आहेत, अशी टीका केली. यावर मोदी म्हणाले, होय मी विकासाचा, गरिबांच्या दु:खाचा भागीदार आहे. काँग्रेससारखा सौदागर आणि ठेकेदार नाही. 
- भारतीय जवान डोकलाममध्ये चिनी सैनिकांशी दोन हात करण्यासाठी सरसावले असताना मोदींनी मात्र चिनी राष्ट्रपतींची कोणत्याही अजिंड्याविना भेट घेतल्याची टीका राहुल यांनी केली. यावर मोदी म्हणाले, संपूर्ण देश डोकलामचा तिढा सोडवण्याच्या प्रयत्नात असताना तुम्ही (काँग्रेस) चिनी राजदूताशी हितगुज करत बसला होतात. हे देशहिताचे नाही.
- राहुल म्हणाले, शेतकऱ्यांनी हात जोडून कर्जमाफीची याचना केली. मात्र, मोदींनी अब्जाधीशांचे कर्ज माफ केले. याचा समाचार घेताना मोदींनी काँग्रेसच्या काळातील अनेक व्यवहारांचे दाखले दिले. 
- सर्जिकल स्ट्राइकवर राहुल यांनी टीका केली होती. यावर मोदी यांनी भारतीय जवानांनी धाडसाने केलेल्या या कारवाईची खिल्ली उडवणे म्हणजे देशाचा आणि लष्कराचा अपमान असल्याचे सांगितले. 
- जीएसटीवरून राहुल यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना मोदींनी गुजरातचा मुख्यमंत्री असताना केलेल्या सूचनांचे दाखले दिले. 

 

बातम्या आणखी आहेत...