आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचे राजेश जैन यांनी 8 कोटी रुपये वळवले; सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीत झाले उघड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- काँग्रेसचे माजी आमदार राजेश जैन यांनी नोटबंदीनंतर ८ कोटी रुपये एवढा काळा पैसा वळवला, असे सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीत आढळले आहे.  


नोटबंदीनंतर अवैध निधी वळवल्याप्रकरणी राजेश जैन यांना दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने गेल्या महिन्यात अटक केली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. ईडी लवकरच न्यायालयाकडून त्यांची कोठडी मागेल आणि सविस्तर चौकशी करेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.  


ईडीच्या अहवालात म्हटले आहे की, जैन आणि त्यांचा मुलगा प्रतीक हे जय जिनेंद्र सेल्स आणि श्रीनिवास सेल्स या कंपन्यांचे मालक आहेत. दिल्लीतील वकील रोहित टंडन यांनी ज्या कंपन्यांत चलनातून बाद झालेली रोख रक्कम ठेवली होती त्या कंपन्यांतून जैन यांच्या दोन्ही कंपन्यांना ८.७१ कोटी रुपयांची रक्कम मिळाली. त्यापैकी ८.५६ कोटी रुपये आरटीजीएसद्वारे तर १५ लाख रुपये रोख होते. चौकशीत हा प्रकार आढळला आहे.   


रोहित टंडन आणि इतरांच्या विरोधात मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यानुसार (पीएमएलए) गुन्हा दाखल असून त्यांना अटकही झाली आहे. त्या चौकशीचाच एक भाग म्हणून ईडीने गेल्या मे महिन्यात जैन यांच्या दिल्लीतील परिसरांवर छापे टाकले होते. जैन आणि योगेश मित्तल यांनी टंडन यांच्याकडील चलनातून बाद झालेली रक्कम गेल्या वर्षी १४ ते १९ नोव्हेंबर या काळात विविध ठिकाणांहून गोळा केली आणि ती रोख रक्कम बनावट कंपन्यांच्या विविध खात्यांत जमा केली, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.  

पीएमएलअंतर्गत गुन्हा  
बनावट खात्यांत ३४ कोटींची रक्कम जमा केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. त्याची दखल घेऊन ईडीने पीएमएलएअंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

 

बातम्या आणखी आहेत...