आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Interview : केवळ विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका होणे शक्य नाही; दुर्दैवाने कास्ट प्रभावही तितकाच: गडकरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रस्ते परिवहन मंत्री आणि भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याशी भास्कर दिल्लीचे संपादक आनंद पांडे आणि प्रतिनिधी शरद पांडेय यांनी संवाद साधला. विरोधी पक्षांची एकजूट, सरकारची प्रतिमा, नोटबंदी, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी  यांना संघ मुख्यालयातील आमंत्रण अशा मुद्द्यांवर गडकरींनी त्यांचे म्हणणे मांडले.


प्रश्न- देशात केवळ विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका होऊ शकतात असे तुम्हाला वाटते? 
उत्तर -
निवडणुका पूर्णपणे विकासाच्या मुद्द्यावर होऊ शकत नाहीत, यात तथ्य आहे. देशाचे दुर्दैव आहे की येथील राजकारणात कॅश, कास्ट अँड क्रिमिनलचा प्रभाव आहे. पण नवी पिढी विकासाच्या मुद्द्यावर ठाम आहे. जात, पंथ, धर्म, भाषेच्या वर जाऊन ही पिढी विचार करते.


प्रश्न - तुम्ही दूरदृष्टीबद्दल बोलत आहात, पण मागील चार वर्षांतील वातावरण पाहता धार्मिक कट्टरता वाढल्याचे चित्र आहे?
प्रश्न -
(किंचित आवाज वाढवून) - हे चुकीचे आहे. सत्तेत आल्यापासून विरोधी पक्ष आम्हाला मुस्लिम व दलितविरोधी ठरवत आहेत. आम्ही जात, धर्म, पंथ आणि भाषेत भेदभाव करत नाही. अशी एकही योजना दाखवा ज्यात मुस्लिमांनी अर्ज करू नये, असे म्हटले गेले. रोजगार देतानाही विशिष्ट जातीला डावलण्यात आले का? याउलट आम्ही जातीयवादातून मुक्त आहोत.  


प्रश्न - जाती-धर्म तुम्ही मानत नसाल तर आर्धिक आधारावर आरक्षण असायला हवे? 
उत्तर -
शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक मागासलेपण हे दुर्दैवाने वास्तव आहे. आदिवासी लोकांना ३०० ते ४०० वर्षांपूर्वी शाळेत जाण्यापासून रोखण्यात आले. यातूनच सामाजिक, शैक्षणिक मागासलेपण आले. पण आज स्थिती बदलली आहे. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण गरजेचे आहे. आरक्षण कायम नसल्याचे डॉ. बाबासाहेबांनी म्हटले होते. सामाजिक, आर्थिक आधारावर आरक्षण द्यायला हवे. दुसरीकडे ज्यांना आरक्षण नाही आणि जे मागासलेले आहेत ते उदरनिर्वाह करू शकत नाहीत. उदा. शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यांना आर्थिक आधारावर आरक्षण मिळावे.  


प्रश्न - आरक्षण बंद करायला हवे, असे सर्वसाधारण गटातील लोक म्हणत आहेत?
उत्तर -
सर्वसाधारण गटातील आर्थिकदृष्ट्या मागास लोकांबद्दल विचार करावा लागेल. आरक्षणाचा उपयोग राजकारणासाठी नको. हा संवेदनशील विषय आहे. निवडणूक जिंकण्यासाठी, आरक्षणासाठी जातींचा आधार घेऊन भांडत राहणे योग्य नाही. 


प्रश्न - असे असतानाही निवडणुकीत दलित, शेतकऱ्यांचे मुद्दे उपस्थित केले जातात?
उत्तर -
शेतकऱ्यांचा मुद्दा आर्थिक आणि दलितांचा मुद्दा सामाजिक आहे. शेतकरी आणि दलितांच्या गरिबीचा संबंध जाती-धर्माशी नाही.


प्रश्न - मागील शंभरहून अधिक वर्षांत शेतकऱ्यांची स्थिती जशास तशीच आहे?
उत्तर -
(प्रश्न मध्येच थांबवून) नाही, असे काही नाही. मी अध्यक्ष असताना उत्तर प्रदेशात उसाचे उत्पादन प्रति हेक्टर ५५ क्विंटल होते.  आज ७० ते ७५ क्विंटल आहे. स्थिती बदलत जाते.


प्रश्न - डाटाबद्दल जाऊ द्या, पण शेतकरी आत्महत्या पूर्वीही होत्या आणि आजही आहेत?
उत्तर -
शेतकरी आजही अस्वस्थ असल्याचे मान्यच करावे लागेल. गांधीजी म्हणायचे ९०% लोकसंख्या गावात राहते. पण आज हा आकडा ६५% वर पोहोचला. दिल्ली-मुंबईची लोकसंख्या का वाढली? कारण गावात शाळा, आरोग्य, रस्ते नाहीत. शेतकऱ्यांच्या पिकाला किंमत नाही. पंडित नेहरूंच्या मॉडेलमध्ये गाव-गरीब व शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष झाल्याने ही स्थिती उद््भवली आहे.

प्रश्न : २०१९ ची निवडणूक येत आहे. आता तीन धारणा बनत आहेत. मोदी लाट पहिल्यासारखी राहिली नाही. सर्व विरोधक एकजूट होत आहेत आणि सरकार काही रिझल्ट देऊ शकले नाही. यामुळे निवडणुकीत तुम्हाला काही अडचण येईल का? 
उत्तर :
आम्ही मजबूत झालो. त्यामुळे जे पक्ष एकमेकांकडे पाहतही नव्हते, ते गळ्यात गळे घालत आहेत. विरोधकांत कुठलेही सैद्धांतिक आणि वैचारिक साम्य नाही. ते फक्त आमच्या भीतीमुळे एकत्र होत आहेत. २०१४ मध्ये लोकांना बदल हवा होता, त्यामुळे भाजप आणि मोदींची निवड केली. काँग्रेस जे ५०-६० वर्षांत करू शकली नाही, ४८ वर्षांत गांधी कुटुंब जे करू शकले नाही, ते काम आमच्या सरकारने ४ वर्षांत केले. कुठलेही काम अंतिम नसते, जेवढे काम कराल तेवढ्या अपेक्षा वाढतात. 
 


प्रश्न : अपेक्षा खूप होत्या, त्याचा अर्थ असा की सरकार तेवढे काम करू शकले नाही का? 
उत्तर :
अपेक्षांची निश्चित संकल्पना नसते. एक पूर्ण झाली की दुसरी तयार होते. १० कोटी लोकांच्या घरांत चूल होती. साडेचार कोटींना गॅस जोडणी दिली. एक वर्षात इतरांनाही मिळेल. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लाखोंना घर मिळाले, त्यांच्यासाठी हे अच्छे दिन नाहीत का? 
 

प्रश्न : पण आश्वासनांनुसार रोजगार मिळाले नाहीत, असा विरोधकांचा आरोप आहे. 
उत्तर :
रोजगार आणि नोकरी यात फरक आहे. फक्त माझ्या विभागात १० लाख कोटींची कामे होत आहेत. त्यातही काम करणारे लोक आहेत, मग त्यांच्यासाठी हा रोजगार नाही का? आमच्या उपकरण निर्मिती कंपनीची उलाढाल दुप्पट झाली आहे. ट्रक मॅन्युफॅक्चरिंग दुप्पट झाले आहे. त्यात मशीन चालवणारे लोक आहेत. ऑटोमोबाइल सेक्टरला बूस्ट मिळाला नाही का? हो. हे एक चक्र असते, एका क्षेत्रासाठी चांगले आणि दुसऱ्यासाठी वाईट. उदा. साखर क्षेत्रासाठी वाईट दिवस आहेत. पोलाद क्षेत्रात वाढ आहे. पोलादासाठी वाईट असेल तर सिमेंटसाठी चांगले राहील. देशात ४०% सिमेंट आमचे मंत्रालय खरेदी करते. सिमेंट उद्योगात रात्रंदिवस काम सुरू आहे. मग त्यांना रोजगार मिळाला नाही का? होय, एक गोष्ट खरी आहे की कामही मिळत आहे, रोजगारही वाढत आहेत आणि लोकसंख्याही वाढत आहे. शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त उत्पादन झाले आहे. डाळीचे दर १८० रुपये झाले होते तेव्हा आमच्यावर खूप टीका झाली होती. डाळ ५० रुपये झाली तर शेतकऱ्यांची स्थिती खराब झाली. साखरेचा भाव ३६ रुपये आहे, तो २४ रुपये झाला होता. निष्क्रियता चांगली नाही. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये निष्क्रियता होती, आज ती नाही. 
 

प्रश्न : जर यूपीत सपा-बसप एकत्र आले तर तेथे ५०-६० जागांचे नुकसान होऊ शकते. त्याची भरपाई कुठून कराल? 
उत्तर :
मायावती आणि अखिलेश एकत्र आले आहेत. त्यांचे संबंध आधी कसे होते, हे सर्वांना माहीत आहे. दोघांत काही वैचारिक साम्य आहे का? हे आम्ही मजबूत होण्याचे संकेत आहेत. लढत तुल्यबळ असली तरी आमची ताकदही वाढली आहे. सध्या तर एकजूट चांगली वाटत आहे. लोकसभा निवडणुकीत जेथे बसपचा उमेदवार दुसऱ्या स्थानी होता तेथे सपाचा तिसऱ्या स्थानी. मग बसपला तिकीट मिळाले तर सपाचे लोक त्याला मत देतील का? 
 

प्रश्न : प्रणव मुखर्जी हे संघ मुख्यालयात गेले होते. त्यात तुमची भूमिका प्रमुख मानली जात आहे ना? 
उत्तर :
माझी प्रमुख भूमिका नाही. प्रणवजी राष्ट्रपती होते तेव्हा त्यांना अनेकदा भेटलो होतो. संघाशी तुमचा काही संवाद झाला आहे का, अशी विचारणा मी केली असता त्यांनी नकारार्थी उत्तर दिले होते. मी म्हटले की, ते काय म्हणतात हे एकदा समजून घ्या. ते विचार चुकीचे आहेत असे वाटले तर तेही तुम्ही सांगा. तुमची परवानगी असेल तर तुम्हाला भेटा असे मोहनजी भागवत यांना सांगेन. मी भेट घालून दिली. त्यानंतर दोन-तीनदा भेट झाली. संबंध चांगले झाले. त्यांनी नागपूरच्या कार्यक्रमासाठी प्रणवजींना विनंती केली. ते आले. त्यांच्या जाण्यामागे रणनीती, योजना नव्हती. 
 

प्रश्न : पक्षात काही ऐकले जात नाही, आपले म्हणणे मांडता येईल असा मंच नाही, असे शत्रुघ्न सिन्हांचे म्हणणे आहे. 
उत्तर :
ते माध्यमांकडे जातात. त्यांनी पक्षात बोलावे. ते मंचाची गोष्ट करतात. जो मिळायला हवा तो मान मिळत आहे. हे प्रत्येक पक्षात होते. काही खुश होतात, काही नाराज होतात. पक्षात असे थोडेफार चालतेच. 
 

प्रश्न : भाजपला स्वबळावर बहुमत मिळाले नाही तर पंतप्रधानपदासाठी तुमचे नाव पुढे येत आहे का? 
उत्तर :
(प्रश्न संपण्याआधीच) बिलकुल नाही. मी खरी न होणारी स्वप्नं पाहत नाही. मी कोणताही दावा करत नाही. मी नागपूरमध्ये पक्षाचे पोस्टर लावत होतो. भिंतींना चुना लावत होतो. त्यानंतर मी भाजप अध्यक्ष झालो, मंत्री झालो, विरोधी नेता झालो, महाराष्ट्रात मंत्री होतो. पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहत नाही. शक्यताही नाही, इच्छुकही नाही. मी या स्पर्धेत नाही. 


प्रश्न : सरकारने नोटबंदीचा खूप प्रचार केला होता, पण सरकार गेल्या चार महिन्यांत त्यावर जास्त बोलत नाही. हा निर्णय... 
उत्तर :
(मध्येच रोखत) बोललो तर म्हणता का बोलला, नाही बोललो तर म्हणता का बोलत नाही. कांदा स्वस्त झाला तर शेतकरी संकटात आणि महाग झाला तर ग्राहक संकटात. ही लोकशाही आहे. असेच चालत आले आहे, देशही असाच चालतो. 

 

बातम्या आणखी आहेत...