आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झुंडशाहीला हा देश तुडवू देणे शक्य नाही, संसदेने तातडीने कायदा करावा : सुप्रीम कोर्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जमावाच्या हातून सातत्याने होत असलेल्या हत्या रोखण्यासाठी मंगळवारी सुप्रीम कोर्टाने केंद्र व राज्य सरकारसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. हे थांबवण्यासाठी संसदेत कायदा करण्याचा विचार करण्याचीही सूचना केली. 


सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील न्यायपीठाने स्पष्ट केले की, ‘या झुंडशाहीला देशातील कायदा तुडवू देण्याची परवानगी देता येऊ शकत नाही. खटला आणि न्याय रस्त्यावर केला जाऊ शकत नाही. असे कुणी करत असेल तर त्यांना शिक्षा देण्याची जबाबदारी सरकारी संस्थांवर आहे. आज जमावाच्या हिंसाचाराने देशावर परिणाम होत आहे. सन्मानाने जगण्याच्या अधिकारापेक्षा दुसरा उच्च अधिकार नाही. असहिष्णुता आणि खोट्या बातम्या-अफवा वाढल्या तर जमाव भडकतो. म्हणूनच लोकशाही आणि कायदा-सुव्यवस्था राखणे ही संबंधित राज्यांची जबाबदारी आहे.’ दरम्यान, याबाबत सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार व राज्य सरकारकडून ४ आठवड्यांत सविस्तर अहवाल मागवला आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी २० ऑगस्टला होईल. 


जमावाच्या हिंसाचाराविरुद्ध प्रचार करा
- देशातील सर्व राज्य सरकारांनी प्रत्येक जिल्ह्याच्या एसपीस्तरीय अधिकाऱ्याला नोडल अधिकारी नियुक्त कराव. डीएसपींच्या नेतृत्वाखाली विशेष टास्क फोर्स नेमावा.
- अशा हिंसाचाराच्या घटना घडलेल्या भागांची ओळख पटवून हिंसाचार थांबवण्यासाठी नोडल अधिकारी, गुप्तचर आणि गृहसचिवस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली जावी.
- हिंसाचारापूर्वी पोलिसांनी जमावाला पांगवावे. संवेदनशील भागांत पोलिसांनी गस्त वाढवावी. तत्काळ अंमलबजावणीसाठी पोलिस महासंचालकांनी आदेश काढावेत. 
- केंद्र-राज्यांनी आपसांत समन्वय ठेवावा. रेडिओ, टीव्ही व वृत्तपत्रांतून अशा हिंसाचाराविरुद्ध प्रचार-प्रसार करावा. अफवांमुळे घडणाऱ्या हिंसाचाराविरुद्ध सरकारने कठोर पावले उचलावीत.


पीडित लोकांना दुखापतीनुसार भरपाईची रक्कम मिळावी 
- जमावाकडून हत्येची घटना झाली तर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करावा. ठाणेप्रमुखाच्या नेतृत्वाखाली कारवाई व्हावी. 
- नोडल अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली नि:पक्ष तपास व्हावा. द्रुतगती न्यायालयात खटला चालवावा. कठोर शिक्षा द्यावी. 
- राज्य सरकारने पीडितांना मोबदला देण्यासाठी योजना आखावी. दुखापतीनुसार भरपाई रक्कम ठरवावी. पीडितांच्या वकिलांचा खर्चही सरकारने करावा. 
- अफवा पसरू नयेत म्हणून ठोस पावले उचलणे ही केंद्र-राज्य सरकारची जबाबदारी आहे.


काेर्ट म्हणाले...
झुंडशाहीतून होणाऱ्या हत्यांचे पिशाच्च रूप होऊ शकते. अफवांतून जन्मलेली असहिष्णुता उलथापालथ घडवू शकते.


दंडात्मक...
अशा हत्या प्रकरणात जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी.


‘जय श्रीराम’च्या घोषणा देत ७९ वर्षीय स्वामी अग्निवेशना मारहाण
पाकुड (झारखंड)- भाजयुमो, अभाविपच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांना मारहाण केली. झारखंडच्या पाकुड येथे अग्निवेश पत्रकार परिषद घेऊन हॉटेलच्या बाहेर पडताच जमावाने काळे झेंडे दाखवत ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत त्यांच्यावर हल्ला केला. अग्निवेश यांना लाथा-बुक्क्यांनी, काठ्यांनी मारहाण करण्यात आली. यात अग्निवेश गंभीर जखमी झाले आहेत. स्वामी अग्निवेश डोंगरी भागात राहणाऱ्या लोकांना भडकावत असल्याचा भाजयुमो आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांचा आरोप होता. येथे आयोजित एका कार्यक्रमासाठी मंगळवारी अग्निवेश येथे आले होते.

बातम्या आणखी आहेत...