आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेचा चर्चेत सहभाग, पाठिंब्याचा निर्णय ऐनवेळी; मोदी सरकारविरुद्धच्या अविश्वास ठरावावर आज चर्चा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- मोदी सरकारविरुद्धच्या अविश्वास ठरावावर शुक्रवारी लोकसभेत सात तास चर्चा होईल. सकाळी ११ वाजता चर्चेला प्रारंभ होत असून सात तासांत भाजपला ३ तास ३३ मिनिटे, तर काँग्रेसला ३८ मिनिटे वेळ देण्यात आला आहे. भाजपच्या वतीने पाच बडे नेते व मंत्री बाजू मांडतील. तर काँग्रेसच्या वतीने राहुल गांधी स्वत: बाजू मांडण्याची शक्यता आहे. 


दरम्यान, सरकारमध्ये प्रमुख घटक पक्ष असलेल्या परंतु भाजपवर टीका करून नाराजी व्यक्त करणाऱ्या शिवसेनेची अविश्वास ठरावाबाबतची भूमिका रात्री उशिरापर्यंत स्पष्ट नव्हती. पक्षाची भूमिका शुक्रवारी सकाळी स्पष्ट केली जाईल, असे शिवसेनेच्या संसदीय पक्षाचे नेते आनंद अडसूळ यांनी सांगितले. तर, पक्षाचा व्हीप अद्याप खासदारांना मिळाला नसल्याचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितले. त्यामुळे शिवसेनेची भूमिका अस्पष्टच आहे. 


व्हीप अद्याप बजावला नाही : खैरे 
शिवसेना खासदारांना व्हीप मिळालाच नसल्याचे वृत्त गुरुवारी सायंकाळी प्रसारित झाले. तेव्हा शिवसेनेचे प्रतोद, खासदार चंद्रकांत खैरे यांच्याशी 'दिव्य मराठी' प्रतिनिधीने संपर्क साधला. त्यावर ते म्हणाले की, शुक्रवारी सकाळी सर्व खासदारांना सभागृहात उपस्थित राहून चर्चेत सहभागी होण्याचा व्हीप दिला जाणार आहे. मात्र, मतदान कोणत्या बाजूने करायचे, याचा आदेश उद्धव ठाकरे ऐनवेळी देणार आहेत. 


अमित शहा यांचा उद्धव ठाकरेंना फोन 
तेलुगू देसम पक्षाने मांडलेल्या या अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केल्याची बातमी आली. यानंतर पक्षाच्या वतीने खासदारांसाठी व्हीप जारी करण्यात आला. मात्र, रात्री उशिरा तो मागे घेण्यात आल्याचे स्पष्ट करून खासदार आनंद अडसूळ म्हणाले, आमचे सर्व खासदार संसदेत उपस्थित राहतील. मात्र, पक्षाची भूमिका शुक्रवारी सकाळीच स्पष्ट केली जाईल. शिवसेनेचे लोकसभेत १८ खासदार अाहेत. 

बातम्या आणखी आहेत...