आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थसंकल्पीय अधिवेशनातच ‘ट्रिपल तलाक’ मंजूर करून घेण्याचा प्रयत्न; आजपासून अधिवेशन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सोमवारपासून सुरू हाेत असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मोदी सरकारने रविवारी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेससह जवळपास सर्वच पक्ष या बैठकीत सहभागी झाले. या बैठकीनंतर बोलताना संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार यांनी सांगितले की, या अधिवेशनात ट्रिपल तलाक विधेयक मंजूर करून घेण्याचा सरकार शक्यताे सर्व प्रयत्न करेल. या मुद्द्यावर एकमत व्हावे म्हणून सर्वच पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली जाईल, असेही ते म्हणाले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन यशस्वी करण्याच्या दृष्टीने सहकार्य करावे, असे आवाहन सर्वपक्षीय नेत्यांना केले. राज्यघटना व घटनात्मक संस्थांवर होत असलेले हल्ले, बलात्कार आणि महिलांवर वाढत चाललेले अत्याचार या मुद्द्यांवर संसदेत सखोल चर्चा व्हावी, असा विरोधी पक्षांचा आग्रह आहे.


या बैठकीनंतर लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनीही सर्वपक्षीय बैठक बोलावली. सोमवारपासून हे अधिवेशन सुरू झाल्यानंतर १ फेब्रुवारी रोजी सरकार अर्थसंकल्प सादर करणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होईल. या अधिवेशनात राजकीयदृष्ट्या ट्रिपल तलाक विधेयक महत्त्वाचे ठरणार आहे. 


राज्यसभेत ट्रिपल तलाक विधेयक मंजूर होईल
संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार यांनी ट्रिपल तलाक विधेयक राज्यसभेत मंजूर होईल, अशी आशा व्यक्त केली. या संवेदनशील मुद्द्यावर सर्व पक्षांमध्ये एकमत व्हावे म्हणून सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचेही कुमार यांनी म्हटले आहे. ज्या पद्धतीने जीएसटी विधेयक एकमताने मंजूर झाले तसेच ट्रिपल तलाक विधेयकही सहज मंजूर व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.


ओबीसी आयोग विधेयक
ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यासंबंधीचे संसदेत मांडले जाणारे विधेयकही यंदा अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या ट्रिपल तलाक व ओबीसी आयोग विधेयकावर सर्व पक्षांचे एकमत घडवण्यावर सरकारचा भर आहे.


हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत मोदी यांनी हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगून सर्व पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. विरोधी पक्षांकडून अालेल्या सर्व सूचनांवर सरकार सकारात्मक विचार करेल, अशी ग्वाही पंतप्रधानांनी या बैठकीत बोलताना दिली. 


या नेत्यांची उपस्थिती
सर्वपक्षीय बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार, गृहमंत्री राजनाथसिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खारगे, समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव व इतर पक्षांचे नेते उपस्थित होते. 


दोन टप्प्यांत संसदेचे अधिवेशन
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन यंदा दोन टप्प्यांत होत आहे. ९ फेब्रुवारीपर्यंत पहिला टप्पा असेल. त्यानंतर सुमारे एक महिन्याच्या सुटीनंतर दुसरा टप्पा ५ मार्चपासून सुरू होईल. तो ६ एप्रिलपर्यंत चालेल. या अधिवेशनात यंदा फार वादाचे विषय नसले तरी ट्रिपल तलाक विधेयकावर दोन्ही सभागृहांत जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे. 

बातम्या आणखी आहेत...