आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्बंधामधून चाबहारला बाहेर ठेवण्याचे अमेरिकेचे संकेत; २०१९ पासून बंदरावरील व्यवहार सुरू करण्याची भारताची इच्छा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- इराणने अण्वस्त्र कार्यक्रम पूर्णपणे बंद करावा म्हणून अमेरिकेने भारतासह इतर देशांवर आयात बंद करण्यासाठी दबाव वाढवला आहे. त्यामुळेच लवकरच इराणमधून तेल आयातीवर निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे. परंतु भारताची चिंता लक्षात घेऊन अमेरिकेने चाबहार बंदराला या निर्बंधातून वगळण्याचे संकेत दिले आहेत. भारताच्या महत्त्वाकांक्षी योजनेला म्हणूनच धक्का बसण्याची चिन्हे तूर्त तरी नाहीत. 


इराणवर निर्बंध नेमके कधी लादले जातील याचा अंदाज बांधता येणार नाही. परंतु आगामी काही महिन्यांत अमेरिका अशा प्रकारचे पाऊल उचलू शकते. परंतु ते करण्यापूर्वी अमेरिकेने भारताच्या संपर्कात राहिले पाहिजे. एवढी अपेक्षा आहे. तसे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना कळवण्यात आले आहे. भारत इराणकडून मोठ्या प्रमाणात इंधनाची आयात करतो. या खरेदीचे चलनाची समस्या निर्माण होऊ नये यासाठी भारताने खबरदारी घेतली आहे. कारण अमेरिकेने निर्बंध लादल्यास या निर्णयाचा आर्थिक फटका भारताला सोसावा लागू शकतो. तो टाळण्यासाठी भारताने अमेरिकेला याबाबतची चिंता कळवली आहे. 


तिसरा मोठा पुरवठादार
भारताला तेल पुरवठा करणाऱ्या तीन मोठ्या पुरवठादार देशांपैकी इराण आहे. इराणने एप्रिल २०१७ व जानेवारी २०१८ या दहा महिन्यांच्या कार्यकाळात भारताला सुमारे १ कोटी ८० लाख टन कच्च्या तेलाची निर्यात केली होती. भारत-इराणदरम्यान तीन वर्षांपासून रुपये-रिआल असा विनिमय होत आहे. त्याला धक्का बसेल. 


अद्याप निर्णय नाही 
अमेरिकेने भारतावर दबाव वाढवला आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रातील प्रतिनिधी निकी हॅले भारताच्या दौऱ्यावर आल्या होत्या. भारताने इराणमधून तेल आयात बंद करून टाकावी, असे सूचवले होते. दुसरीकडे मे मध्ये इराणचे परराष्ट्र मंत्री मोहंमद जावेद झरीफ भारत भेटीवर असता परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी तेल आयातीबाबत काहीही ठोसपणे सांगितले नाही. 


लाभाची खात्री दिली तरच अणुकराराचे पालन : रुहानी 
२०१५ च्या अणुकरारामध्ये राहण्यास तयार आहे. परंतु करारातून इराणला निश्चितपणे लाभ मिळायला हवा. हीच एक अट आहे, असे इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी बुधवारी स्पष्ट केले. अमेरिकेने कराराचा भंग करून त्यातून बाहेर पडणे केवळ बेकायदा अशी कृती आहे. अशा प्रकारच्या निर्णयामुळे अमेरिकेलाच नव्हे, तर कोणत्याही देशाला लाभ मिळणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. 


तडजोडीकडे 
अमेरिकेने इराणसोबत 'शून्य' व्यवहार करावा, असा पवित्रा घेतला असला तरी इराणकडून टप्प्याने तेल आयात कमी करण्याची तयारी दर्शवणाऱ्या देशांसोबत तडजोडीची तयारी अमेरिकेने दाखवली आहे. त्यासाठी चर्चा करण्यास अमेरिका तयार असल्याचे सांगण्यात आले. भारत तेल आयातीवर अवलंबून असलेला देश आहे. 


अफगाणिस्तानचा विषय संवेदनशील 
अमेरिकेसाठी अफगाणिस्तानातील दहशतवादी कारवायांना रोखणे महत्त्वाचे आहे. अमेरिकेने पाकसोबत संयुक्त कारवाई करण्याची देखील योजना आखली आहे. भारताने चाबहार बंदराच्या माध्यमातून अफगाणिस्तानला व्यापारी पातळीवर मदत व भागीदारी दिली आहे. या सागरी प्रकल्पामुळे अफगाणिस्तानला व्यापार तसेच रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील. त्याकडे अमेरिकेला कानाडोळा करता येणार नाही. त्यामुळेच अमेरिकेने बंदराला निर्बंधातून वगळण्याचे अनौपचारिक तयारी दर्शवली आहे. चाबहार बंद आग्नेय इराणमध्ये आहे. 

बातम्या आणखी आहेत...