आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DELHI: हॉलमध्ये फासावर लटकले होते १० मृतदेह; सर्वांचे डोळे, तोंड बांधलेले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- दिल्लीतील बुराडी भागात रविवारी सकाळी एकाच कुटुंबातील ११ सदस्य घरातच संशयास्पद स्थितीत मृतावस्थेत सापडले. १० जणांचे मृतदेह हॉलमधील लोखंडी जाळीला लटकलेल्या स्थितीत, तर एका वृद्धेचा मृतदेह आतील खोलीत होता. फासावर लटकलेल्या लोकांचे डोळे व तोंड टेपने बांधलेले होते. मृतांत सात महिला, दोन पुरुष आणि दोन मुलांचा समावेश आहे. पोलिसांनी सामूहिक हत्याकांडाचा गुन्हा नोंदवला आहे. मात्र, प्राथमिक तपासात सापडलेले पुरावे पाहता ही सामूहिक आत्महत्या असल्याचे मानले जात आहे.


घरात सापडलेल्या एका रजिस्टरमध्ये आध्यात्मिक गोष्टी लिहिलेल्या आढळल्या. जवळपास निम्मे भरलेल्या या रजिस्टरमध्ये गेल्या डिसेंबरपासूनच्या नोंदी आहेत. २६ जूनला चार पानी नोंदी आहेत. यात मोक्ष मिळवण्यासाठी आत्महत्येच्या वेळी डोळे, तोंड आणि हात बांधलेले असायला हवेत, अशी नोंद आहे. ३० जूनला देवाच्या भेटीसाठी जाण्याचाही उल्लेख यात आहे. फोन हे त्रासाचे मुख्य कारण अाहे. यापासून दूरच राहायला हवे, अशी नोंद रजिस्टरमध्ये आहे. या कुटुंबीयांचे आठ मोबाइल आणि एक टॅबलेट एका कप्प्यात एकत्र ठेवलेले आढळले. दरम्यान, प्राथमिकदृष्ट्या ही सामूहिक आत्महत्या वाटत असली तरी शवविच्छेदन आणि न्यायवैद्यक अहवालानंतरच पोलिस निष्कर्षावर पोहचू शकणार आहेत. 


शक्यता अशा... 
१. परमेश्वर प्राप्तीसाठी सर्वांनी एकत्रित आत्महत्या केली असावी

हे कुटुंब परमेश्वर प्राप्तीसाठी मार्ग शोधत होते. सर्व व्रत एकत्रित करत. कुणी मौन व्रत घेतले तर सर्वच मौन पाळत. रजिस्टरमध्ये नोंद होती की परमेश्वरप्राप्तीसाठी मोक्षाच्या वेळी घराची दारे उघडी ठेवा. शेजाऱ्यांना या घराचे दार उघडेच असल्याचे आढळले. सीसीटीव्ही फुटेजमध्येही त्रयस्थ व्यक्ती आढळली नाही. घरात सामान व्यवस्थित ठेवलेले होतेे. सातही महिलांच्या अंगावरील दागिने जसेच्या तसे होते. कोणतील मौल्यवान वस्तू जागेवरून हललेली नव्हती. फासात वापरलेल्या दोरखंडात तो तुटू नये म्हणून टेलिफोनच्या तारा वापरल्या होत्या. 


२. एका सदस्याने सर्वांना मारून आत्महत्या केली असावी 
ही पण एक शक्यता आहे. एका सदस्याने अन्नात विषारी पदार्थ मिसळून सर्व सदस्यांना फासावर लटकावले असावे. नंतर स्वत:ही आत्महत्या केली असावी. डोळे व तोंड बंद करने हा प्रकार या शंकेला पुरक ठरतो. मात्र, पोलिसांनुसार, एक व्यक्ती या पद्धतीने सर्वांना मारू शकत नाही. 


पाच भाऊ-बहिणींपैकी दोन इतर शहरांत राहत असल्याने वाचले 
बुराडीस्थित संतनगरमध्ये पहिल्या मजल्यावर नारायणदेवी आणि त्यांची दोन मुले कुटुंबासह राहतात. नारायणदेवी, त्यांची मुले भुवनेश ऊर्फ भूप्पी (४६) आणि ललित (४२), भुवनेशची पत्नी श्वेता (४२) आणि मुले नीतू (२४), मीनू (२२) आणि ध्रुव (१४), ललितची पत्नी टीना (३८) व एकुलता एक मुलगा शिबू ऊर्फ दुष्यंत (१३), नारायणदेवींची विधवा मुलगी ६० वर्षीय प्रतिभा आणि ३० वर्षीय पणती प्रियंका हे मृतावस्थेत सापडले. प्रियंकाचा १७ जूनला साखरपुडा झालेला होता. नारायणदेवींचा एक मुलगा दिनेश भाटिया (५९) कोटा येथे तर मुलगी सुजाता पानिपतमध्ये राहते. सुजाताने हे हत्याकांड असल्याचे म्हटले आहे. 


सकाळी सात वाजता किराणा दुकान उघडे दिसले नाही म्हणून शेजाऱ्यांना कळले...
शेजारी अमरिकसिंग यांनी सांगितले, या कुटुंबीयांचा प्लायवूडचा व्यवसाय होता. भुवनेश घरातच किराणा दुकान चालवत असे. सकाळी ६ वाजता दुकान उघडले जायचे. मात्र, रविवारी सकाळी ७ पर्यंत दुकान उघडले नाही. त्यामुळे शेजाऱ्यांना शंका आली. पाहिले तर दार उघडे होते आणि आत भयंकर दृश्य पाहायला मिळाले. शेजाऱ्यांनीच पोलिसांना कळवले.


डिसेंबरपासून लिहिल्या होत्या रजिस्टरमध्ये नोंदी 
घरात सापडलेल्या रजिस्टरमध्ये डिसेंबरपासूनच्या नोंदी होत्या. यात ३० जून रोजी देवाच्या भेटीला जाण्यापर्यंतची नोंद होती. मात्र, पोलिसांना यातील निम्मे रजिस्टर घरातील एका सदस्यानेच लिहिले असावे, असा संशय आहे.

बातम्या आणखी आहेत...