आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसभेतील गदारोळामुळे अविश्वास प्रस्ताव नाही स्वीकारला गेला, राजनाथ म्हणाले- आम्ही चर्चेसाठी तयार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोकसभेत बहुमतासाठी 271 सदस्य आवश्यक आहे. भाजपकडे 274 सदस्य आहेत. - Divya Marathi
लोकसभेत बहुमतासाठी 271 सदस्य आवश्यक आहे. भाजपकडे 274 सदस्य आहेत.

नवी दिल्ली - तेलगु देसम पक्ष (टीडीपी) आणि एआयएडीएमके खासदारांनी सोमवारी लोकसभेत गदारोळ केला. यामुळे सभागृहाचे कामकाज आधी दुपारी 12 आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. त्याआधी टीडीपी आणि वायएसआर काँग्रेस यांनी केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी तीन नोटीस दिल्या होत्या. मात्र सभागृहातील गदारोळामुळे सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव लोकसभाध्यक्षांनी स्वीकारला नाही. त्यावर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह म्हणाले, सरकार अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यास तयार आहे. केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री अनंत कुमार म्हणाले, की आमच्याकडे बहुमत आहे. अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाण्याची आमची तयारी आहे. 

 

शुक्रवारीही गदारोळ

- वायएसआर काँग्रेसच्या वाय.व्ही. सुब्बा रेड्डी यांनी अविश्वास प्रस्तावासाठीची नोटीस दिली आहे. त्यांनी लोकसभा सचिवालयाला लिहिले होते की सोमवारच्या कामकाजात प्रस्ताव घेतला जावा. दुसरीकडे टीडीपीनेही अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली. शुक्रवारी सभागृहातील गदारोळामुळे दोन्ही पक्षांनी दिलेला अविश्वास प्रस्ताव सादर होऊ शकला नाही. त्या दिवशी तेलंगणा राष्ट्र समिती, अण्णाद्रमुकसह अनेक पक्षांनी लोकसभाध्यक्षांच्या आसनासमोरील हौद्यात उतरुन गदारोळ केला होता. 

 

- टीडीपीने आपल्या खासदारांना व्हिप जारी करुन अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत सभागृहात उपस्थित राहाण्याचे सांगितले आहे. पक्षाचे खासदार आर.एम. नायडू म्हणाले, अविश्वास प्रस्तावाला सर्व विरोधीपक्षांनी पाठिंबा द्यावा असे आवाहन आम्ही करतो. आता सर्व पक्षांची जबाबदारी आहे की त्यांनी  पाठिंबा द्यावा. सरकार पाडणे हा आमचा प्रयत्न नाही, मात्र सभागृहात चर्चा झाली पाहिजे. 

 

- दुसरीकडे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले, 'आम्ही अजून निर्णय केलेला नाही. आम्ही वेट अँड वॉच करत आहोत. आम्ही पाहाणार आहोत की लोकसभाध्यक्ष अविश्वास प्रस्ताव स्वीकारतात की नामंजूर करतात. टीडीपीचे त्यांच्या राज्याचे प्रश्न आहेत. त्यांना आमचा पाठिंबा आहे. अविश्वास प्रस्तावावर काय भूमिका घ्यायची हा निर्णय उद्धव ठाकरे घेतील.'

 

5 पॉइंट्समध्ये समजून घ्या अविश्वास प्रस्ताव

 

1) कोणी आणला अविश्वास प्रस्ताव?
2014 मध्ये मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर प्रथमच एखाद्या पक्षाने सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. अविश्वास प्रस्तावाची नोटीस टीडीपीचे के.टी. नरसिम्हन आणि वायएसआर काँग्रेसचे वाय.व्ही.सुब्बा रेड्डी यांनी दिली होती. शुक्रवारी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी तो स्वीकार केला नाही आणि सभागृह दिवसभरासाठी तहकूब केले होते. सुमित्रा महाजन म्हणाल्या होत्या, 'प्रस्ताव सभागृहासमोर ठेवण्यास मी बांधील आहे. मात्र त्यासाठी सभागृहाचे कामकाज व्यवस्थित चालले पाहिजे.' 


2) का आणला जात आहे प्रस्ताव? 
आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची तेलगु देसम पक्षाची (टीडीपी) मागणी आहे. केंद्र सरकारचे म्हणणे आहे की ते राज्यासाठी विशेष पॅकेज देण्यास तयार आहे. मात्र विशेष राज्याच्या दर्जा दिला जात नसल्यामुळे टीडीपीने मोदी सरकारमधून आणि नंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. 
- दुसरीकडे, राज्यात आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी वायएसआर काँग्रेस धडपडत आहे. त्यांनीही अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली आहे. 

 

3) कसा आणला जातो अविश्वास प्रस्ताव? 
- संसदेत सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी कमीत कमी 50 सदस्यांचा पाठिंबा आवश्यक असतो. टीडीपी नेते सीएम रमेश म्हणाले की 'सोमवारी आम्ही वेगवेगळ्या पक्षांच्या 54 सदस्यांचे स्वाक्षरी असलेले पत्र मिळवू आणि अधिक जोरकसपणे अविश्वास प्रस्ताव सादर करु.'
- टीडीपी आणि वायएसआर काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्र आले तरी त्यांची संख्या 50 होत नाही. कारण टीडीपीकडे 16 खासदार आहेत तर वायएसआर काँग्रेसकडे 9 खासदार आहेत. दोन्ही मिळून 25 सदस्य होतात. 

 


4) काँग्रेसची भूमिका स्पष्ट नाही 
- काँग्रेसने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नाही. मात्र ते अविश्वास प्रस्तावाचे समर्थन करु शकतात. त्यासोबतच एमआयएम, डावे पक्षही समर्थन करतील. काँग्रेसकडे 48 खासदार आहेत, सीपीआयकडे 9 आणि एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी हे एकमेव सदस्य लोकसभेत आहेत. 
 
5) सरकारचे होणार नुकसान 
एनडीएममध्ये 56 पक्ष आहेत. त्यांचे मिळून एकूण 314 खासदार आहेत. लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्यासह भाजपची सदस्यसंख्या 275 आहे. बहुमतासाठी 271 सदस्यांची आवश्यकता आहे. लोकसभेत एकूण 540 सदस्य आहेत. 
- संसदीय कार्यमंत्री अनंतकुमार म्हणाले होते, 'आम्ही प्रत्येक गोष्टीचा सामना करण्यासाठी तयार आहोत. बँकिंग घोटाळ्यावर चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत. सभागृह चालू राहावे यासाठी सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की अविश्वास प्रस्तावात आम्ही विजयी होऊ.'

बातम्या आणखी आहेत...