आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेपाळ-भारत यांच्यात 6 करार,दिल्ली ते काठमांडू रेल्वेमार्ग !नेपाळचे पंतप्रधान भारत भेटीवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारत-नेपाळमध्ये संरक्षण, व्यापाराच्या क्षेत्रात सहकार्य वाढीवर सहमती झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे समकक्ष के.पी.शर्मा-आेली यांच्यात शनिवारी यशस्वी द्विपक्षीय बोलणी झाली. त्यात व्यापार, संरक्षण, रेल्वे, पाणी संबंधी सहा करारांवर स्वाक्षरी झाली. कराराअंतर्गत दिल्ली ते काठमांडू रेल्वे मार्गाचाही समावेश आहे. 


मोदी म्हणाले, भारताचा नेपाळला कायम पाठिंबा राहील. भारताने प्राधान्यक्रम ठरवलेला आहे. त्यात नेपाळला अग्रस्थान देण्यात आले आहे. नेपाळच्या लोकशाहीला वृद्धिंगत करण्यासाठी भारत आपले पूर्ण योगदान देईल. त्याअंतर्गत भारत-नेपाळ यांच्यातील नवीन रेल्वेमार्गाच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे भारतातून काठमांडूचा संपर्क सोपा होणार आहे. संरक्षण व सुरक्षेच्या क्षेत्रात भारत-नेपाळ यांच्यातील भागीदारी चांगली आहे. मात्र दोन्ही देशांच्या खुल्या सीमांचा गैरवापर केला जाऊ नये यासाठी दोन्ही देशांनी सतर्क राहणे गरजेचे आहे, असे भारताने स्पष्ट केले. आेली भारताच्या दौऱ्यावर आहेत. उभय देशांतील आगामी वाटचालदेखील तितकीच विश्वासाने सुरू राहिली पाहिजे, अशी अपेक्षा मोदी यांनी द्विपक्षीय चर्चेतून व्यक्त केली. फेब्रुवारीत दुसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर आेलींचा हा पहिलाच भारत दौरा आहे. 

 

संपर्काचा विस्तार
भारत-नेपाळ यांच्यात संपर्क वाढवण्यावर सहमती झाली आहे. त्यात तीन मुद्दे महत्त्वाचे ठरणार आहेत. रक्सोलहून काठमांडू दरम्यान रेल्वे मार्ग, नद्यांच्या माध्यमातून जलमार्ग संपर्क व नेपाळमध्ये कृषी क्षेत्रात सहकार्य व भागीदारी केली जाणार आहे. रक्सोल ते काठमांडू विजेवरील रेल्वे रुळ अंथरण्यात येणार आहे. 

 

संबंध प्रगाढ करणार : आेली

नेपाळचे पंतप्रधान आेली म्हणाले, आम्ही दोन्ही शेजारी देश परस्पर विश्वासाचे नाते निर्माण करून ते वाढवू इच्छितो. संबंध प्रगाढ करण्यासाठीच भारतात आलो आहे. २१ व्या शतकातील वास्तव परिस्थितीला लक्षात घेऊन संबंध नवीन उंचीवर नेण्याचा आमचा संकल्प आहे. दरम्यान चीनच्या वन बेल्ट वन रोड प्रकल्पाविषयी अनेक प्रश्न विचारण्यात आले. चीन व भारताच्या मधे नेपाळ आहे.दोन्ही देशांशी आमचे चांगले संबंध आहेत. चीनच्या प्रकल्पाबाबत आमची भूमिका तटस्थ आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. 

 

‘भारताचे हित नेपाळच्या स्थैर्यावर’

दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रपती भवनात त्यांचे अौपचारिक स्वागत करण्यात आले. आेली यांचे स्वागत केल्यानंतर राष्ट्रपती कोविंद यांनी ट्विट केले. त्यात कोविंद म्हणाले, भारताचे हित नेपाळच्या स्थैर्यावर आणि आर्थिक समृद्धीवर अवलंबून आहे. भारत नेपाळला सहकार्य वाढवण्यास तयार आहे. भारत-नेपाळ यांच्यात मैत्रीपूर्ण व सहकार्याचे संबंध आहेत, असे कोविंद यांनी सांगितले. दरम्यान, तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर आेली यांची भारत भेट महत्त्वाची मानली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...