आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाेस अाधार नसल्याने तीन नराधमांची फेरविचार याचिका काेर्टाने फेटाळली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- १६ डिसेंबर २०१२ रोजी रात्रीच्या सुमारास राजधानी दिल्लीत धावत्या बसमध्ये निर्भयावर अमानुष सामूहिक बलात्कार झाला होता. या प्रकरणातील दोषींना आता फासावर लटकवले जाणार असल्याचे निश्चित झाले. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी मुकेशसिंह (२९), पवन गुप्ता (२२) व विनय शर्मा (२३) यांची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली. दोषींकडून फाशीच्या शिक्षेवर पुनर्विचार करण्यासाठी ठोस आधार सादर करण्यात आला नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश आर. भानुमती व न्यायाधीश अशोक भूषण यांच्या पीठाने म्हटले, दिल्ली उच्च न्यायालयाच्या विरोधात दाखल याचिकांवर सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने पूर्ण संधी दिली होती. या प्रकरणात चौथा अाराेपी अक्षय ठाकूर याने पुनर्विचार याचिका दाखल केलेली नव्हती. 


या दोषींनी डिसेंबर २०१७ मध्ये पुनर्विचार याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने ४ मे रोजी तिन्ही याचिकांवरील निर्णय राखून ठेवला होता. तत्पूर्वी ५ मे २०१७ रोजी सर्वोच्च न्यायालयाने चारही दोषींना दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला होता.  


मृत्युदंडाचे वॉरंट जारी करण्याची प्रक्रिया
सर्वोच्च न्यायालयाचे वकील सुमीत वर्मा यांनी सांगितले, पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर सर्व आरोपींना बचावासाठी कोणकोणते मार्ग शिल्लक आहेत, याची माहिती  तुरुंग प्रशासन देईल.   कायदेशीर पर्यायाचा वापर आपल्या बचावासाठी करणार की नाही, याची माहिती अारोपींना लेखी द्यावी लागते. त्यानंतर ती सरकारी पक्षाकडे पाठवली जाते. सरकारी पक्ष अर्ज दाखल करून जिल्हा न्यायालयाकडून प्रतिवादींच्या नावे मृत्युदंडाचे वॉरंट जारी करण्याचे अपील करते. जिल्हा न्यायालय आरोपींना फाशी देण्यासाठी कमीत कमी १५ दिवसांचा अवधी देते.   निर्भयाची आई म्हणाली, निर्णयाने समाधान वाटले : निर्भयाच्या आईने म्हटले, सकाळी घरातून बाहेर निघत असताना मुलीच्या फोटोसमोर उदबत्ती लावली आणि म्हणाले, आज आणखी एक कायदेशीर लढाईचा निर्णय येणार आहे. प्रकरण वाढत गेले असले तरी आम्ही प्रत्येक कायदेशीर लढाई लढण्यास तयार आहोत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे मनाला खूप समाधान मिळाले आहे.  


पुनर्विचार याचिकेत गुन्हेगारांचा असा हाेता युक्तिवाद
दोषींची पार्श्वभूमी व सामाजिक -आर्थिक परिस्थिती पाहता त्यांची शिक्षा कमी करण्यात यावी. ११५ देशांत मृत्यूची शिक्षा समाप्त करण्यात आली आहे. सभ्य समाजात याला काही स्थान नाही. फाशीची शिक्षा फक्त गुन्हेगारांना संपवते, गुन्हा नव्हे. मृत्युदंड जगण्याचा अधिकार हिरावून घेते. हे प्रकरण दुर्मिळात दुर्मिळ श्रेणीत येत नाही.  निर्भया बलात्कार प्रकरणात किशोरासह एकूण सहा जण दोषी होते.या प्रकरणात एका किशोरासह एकूण सहा जण अारोपी होते. दोषींपैकी रामसिंह याने तिहार तुरुंगात आत्महत्या केली होती. 


किशोरवयीनास जुवेनाइल जस्टिस बोर्डाने दोषी मानले होते. त्याला तीन वर्षे सुधारगृहात ठेवल्यानंतर त्याची सुटका केली होती. उर्वरित चौघांना फाशीची शिक्षा देण्यात आली आहे.  


धावत्या बसमध्ये अमानुष बलात्कार
२३ वर्षीय पॅरामेडिकलच्या विद्यार्थिनीवर १६ डिसेंबर २०१२ रोजी रात्री दिल्ली येथे धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. बेशुद्ध पडलेली पीडिता व तिच्या मित्रास गुन्हेगारांनी धावत्या बसमधून रस्त्याच्या कडेला फेकून दिले होेते.

 

आरोपींकडे आता दोनच मार्ग शिल्लक
१. क्युरेटिव्ह पिटिशन 

वकील सुमीत पुष्करणा यांनी सांगितले, दोषींना आता सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करता येते. ही याचिका एका वरिष्ठ विधिज्ञांच्या सल्ल्यानंतर दाखल करता येते. यावर कमीत कमी पाच न्यायाधीश सुनावणी करतील. कारण मूळ निर्णय तीन न्यायाधीशांच्या पीठाने दिला आहे.  
२. दयेचा अर्ज 
क्युरेटिव्ह याचिका फेटाळली गेल्यास आरोपींना राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज सादर करण्याचा मार्ग असेल. दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळल्यास सरकार पक्षाकडून जिल्हा न्यायालयामार्फत आरोपीवर मृत्युदंडाचे वॉरंट जारी करण्याचा अर्ज करण्यात येईल.  


बलात्काऱ्यांना कठोर संदेश देण्याची गरज : निर्भयाचे वडील 
निर्भयाच्या वडिलांनी म्हटले, आजकाल देशात मुलींवर बलात्कार करण्याचे गुन्हे वाढले आहेत. सरकारने दोषींना लवकरात लवकर अारोपींना फासावर देऊन बलात्काऱ्यांना मोकाट सोडले जाणार नाही, असा कठोर संदेश देण्याची गरज आहे.  


आरोपींच्या वकिलांनी म्हटले : अखेरीस न्याय मिळालेला नाही  
तीन आरोपींचे वकील ए. पी. सिंह म्हणाले, प्रत्येकाला न्याय मिळायला हवा. हा निर्णय राजकीय, जनता व माध्यमाच्या दबावाखाली आला आहे. आरोपींना फाशीच्या शिक्षेत दिलासा मिळायला हवा होता. सर्व आरोपी गरीब कुटुंबातील आहेत. दोषींना सुधारण्याची एक संधी द्यायला हवी. 

 

बातम्या आणखी आहेत...