आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकिंग घोटाळा: आयसीआयसीआयसह 31 बँकांच्या प्रमुखांना ईडीने चौकशीला बोलावले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/मुंबई- पीएनबीमधील १२,७१७ कोटींच्या देशातील सर्वात मोठ्या बँकिंग घोटाळ्याची धग आता ३१ बँकांपर्यंत पोहोचली आहे. गंभीर आर्थिक घोटाळा तपास कार्यालयाने (एसएफआयओ) ३१ बँकांना चौकशीचे समन्स बजावले आहेत. सूत्रांनुसार, अॅक्सिस बँकेच्या सीईओ शिखा शर्मा आणि आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांना मंगळवारसाठी समन्स पाठवण्यात आले होते. यानंतर अॅक्सिस बँकेचे उपव्यवस्थापकीय संचालक व्ही. श्रीनिवासन यांच्या नेतृत्वात एक चमू एसएफआयओ कार्यालयात हजर झाला. हिरे व्यावसायिक नीरव मोदी व मेहुल चोकसी यांच्या कंपन्यांना कर्ज देण्याच्या प्रकरणात त्यांची दोन तास चौकशी झाली. एसएफआयओ कार्यालय कंपनी प्रकरणांच्या मंत्रालयाअंतर्गत काम करते. 


सूत्रांनुसार, चौकशीचा अर्थ सर्वच बँकांचा घोटाळ्यात सहभाग अाहे, असा नाही. तपास अधिकाऱ्यांना घोटाळ्याची पाळेमुळे खणून काढायची आहेत. यामुळे त्यांना कोणतेही कच्चे दुवे सोडायचे नाहीत. स्टॉक एक्स्चेंजनेही आयसीआयसीआय आणि अॅक्सिस बँकेकडे खुलासा मागितलेला आहे. 


विशेष म्हणजे, गीतांजली जेम्स कंपनीला ३१ बँकांच्या समूहाने सुमारे ६,८०० कोटी रुपयांचे कर्ज दिलेले आहे. समूहाचे नेतृत्व आयसीआयसीआय बँकेकडे आहे. बँकेनुसार, त्यांनी गीतांजली समूहाला कर्ज दिलेले असले तरी नीरव मोदीच्या कंपन्यांवर त्याची काहीही देणी नाहीत. त्यांनी पीएनबीच्या एलआेयूवरच कर्ज दिलेले आहे. अॅक्सिस बँकेचे म्हणणे आहे की, थेट गीतांजली समूहाच्या नावाने कर्ज दिलेले नाही. त्यांनीही पीएनबीच्याच एलओयूनुसार कर्ज दिले आहे. 


घोटाळ्याची व्याप्ती वाढू शकते : सीबीआय
सीबीआयने सोमवारी मुंबई कोर्टात दाखल केलेल्या दस्तऐवजांनुसार घोटाळ्याच्या रकमेचा आकडा अाणखी वाढू शकतो. पीएनबीकडे सर्व एलआेयू नाहीत. काही एलओयू नीरव-मेहुलच्या कंपन्यांना परत करण्यात आले होेते. त्यांची माहिती मिळाल्यानंतर घोटाळ्याची व्याप्ती वाढू शकते. 


नीरवच्या कंपनीची ईडीविरुद्ध याचिका 
नीरव मोदीच्या फायरस्टार डायमंड कंपनीने ईडीविरुद्ध दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यात सर्च वॉरंटची प्रत देण्याचे निर्देश वित्त मंत्रालय व ईडीला द्यावे, असे म्हटले आहे. सीबीआयच्या एफआयआरच्या आधारे ईडीने नीरव मोदीविरुद्ध मनी लाँडरिंग कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे.

 

आतापर्यंतची कारवाई 
पीएनबी घोटाळ्यात ईडीने आतापर्यंत १९८ ठिकाणी छापे मारले आहेत. तसेच सुमारे ६ हजार कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. सीबीआयने २० जणांना अटक केली आहे. 


शेअर बाजार ३ महिन्यांच्या नीचांकावर
पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळा प्रकरणात चौकशीची व्याप्ती वाढत असल्याने शेअर बाजार तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेला आहे. यादरम्यान सर्वाधिक घसरण बँकिंग क्षेत्रातील शेअरमध्ये झाली आहे. एसबीआयच्या शेअरमध्ये २.७७ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. दरम्यान, सेन्सेक्स ४२९.५८ अंकांच्या घसरणीसह ३३,३१७.२० या पातळीवर बंद झाला. १४ डिसेंबर २०१७ नंतरची ही नीचांकी पातळी आहे. त्या वेळी सेन्सेक्स ३३,२४७ या पातळीवर बंद झाला होता.

 

सोमवारी चौघांना अटक 
- सोमवारी सीबीआयने बँकेचे जनरल मॅनेजर (ट्रेझरी) एसके चंद यांची चौकशी केली. 
- फायरस्टारचे प्रेसिडेंट (फायनान्स) विपुल अंबानींसह 6 आरोपींना सीबीआयच्या स्पेशल कोर्टात सादर करण्यात आले. कोर्टाने त्यांना 19 मार्च पर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवले. विपुल अंबानी रिलायन्स ग्रुपचे प्रमुख मुकेश अंबानींचा चुलत भाऊ आहे. 

बातम्या आणखी आहेत...