आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरन्यायाधीशांचा पीएमआेच्या सचिवांना भेटण्यास नकार;प्रवेशद्वाराहूनच परतले मिश्रा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच चार न्यायमूर्तींच्या पत्रकार परिषदेनंतर न्यायपालिकेतील सर्व काही आलबेल नाही, यावरून नव्या वादाला सुरुवात झाली. या प्रकरणाला राजकीय रंग देण्यात येत अाहे. त्यादरम्यान पंतप्रधानांचे मुख्य सचिव नृपेंद्र मिश्रा शनिवारी सकाळी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. परंतु तेथून त्यांना सरन्यायाधीशांची भेट न घेताच परतावे लागले. सरन्यायाधीशांच्या बाबतीतही असेच घडले. त्यांनी न्यायमूर्ती जे. चेलमेश्वर यांना भेटीसाठी बोलावले. परंतु न्यायमूर्ती चेलमेश्वर यांनी भेटीस नकार दिला.


पंतप्रधानांचे सचिव सरन्यायाधीशांना भेटण्यासाठी गेल्यावरून काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, पंतप्रधानांनी देशाच्या सरन्यायाधीशांच्या निवासस्थानावर आपला विशेष दूत पाठवण्याचे कारण काय, याचे उत्तर दिले पाहिजे. काँग्रेसच्या या प्रश्नाला भाजपने उत्तर दिले. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले, विरोधी पक्ष या मुद्द्याचे राजकारण करत आहे. हे अंतर्गत प्रकरण आहे. त्यात राजकारण आणले जाऊ नये. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे. चेलमेश्वर, न्या. रंजन गोगोई, न्या. मदन बी. लोकूर, न्या. कुरियन जोसेफ यांनी शुक्रवारी सरन्यायाधीशांच्या कामकाजाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

 

प्रवेशद्वाराहूनच नृपेंद्र मिश्रा परतले

सरन्यायाधीशांची भेट न घेताच नृपेंद्र मिश्रा यांना त्यांच्या निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरून माघारी परतावे लागले. त्यावर मुख्य सचिव म्हणाले, मी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी गेलाे होतो. तेव्हा सरन्यायाधीश पूजेत होते. त्यामुळे भेट होऊ शकली नाही. सरन्यायाधीशांचे निवासस्थान ५-कृष्णा मेनन मार्गावर आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्य सचिवांना सरन्यायाधीश यांची भेट घेऊन मतभेद दूर करण्यासाठी चर्चेचे संकेत दिले होते. मिश्रा परतल्याचे फुटेजही झळकले होते. 

 

सर्वकाही ठीक होईल 

न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घ्यायला नको होती. रविवारपर्यंत हे प्रकरण सोडवले जाईल, अशी मला अपेक्षा आहे.

- के.के. वेणुगोपाल, अॅटर्नी जनरल

 

न्यायपालिकेच्या हितासाठीच केले : जोसेफ

हे प्रकरण अंतर्गत आहे. त्याची निश्चितपणे सोडवणूक होईल, असा विश्वास कोेची येथे दाखल झालेले न्यायमूर्ती कुरियन जोसेफ यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे हे काही संकट नाही, अशा शब्दांत न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी पत्रकारांना उत्तर दिले. ते शनिवारी कोलाकात्यामधील एका कार्यक्रमात सहभागी झाले होते.

 

बार कौन्सिल आज न्यायमूर्तींना भेटणार
न्यायमूर्तींचे मतभेद दूर करण्यासाठी शनिवारी सायंकाळी बार कौन्सिल ऑफ इंडिया व सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनने बैठक आयोजित केली होती. त्यासाठी सातसदस्यीय प्रतिनिधी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. हे प्रतिनिधी मंडळ रविवारी सर्व न्यायमूर्तींची भेट घेऊन चर्चा करणार आहे. शनिवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत बार कौन्सिलचे अध्यक्ष मननकुमार मिश्रा म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायमूर्तींकडून भेटीची वेळ मागून घेतली जात आहे. त्यापैकी ५० टक्के न्यायमूर्तींनी भेटीसाठी सहमती दर्शवली आहे. दुसरीकडे मतभेद दूर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्ण पीठासमोर विचार केला जायला हवा, असा ठराव असोसिएशनने मंजूर केला आहे.

बातम्या आणखी आहेत...