आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aam Aadami Party News In Marathi, Anna Hazare, Ashutish, Arvind Kejriwal

भाजप मुख्‍यालयावर हल्ला चढवल्याप्रकरणी ‘आप’ नेत्यांची चौकशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राजधानीतील अहिंसक आंदोलनातून जन्माला आलेल्या आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते अल्पावधीतच सराईत कार्यकर्त्यांपेक्षाही हिंसक बनल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आपचे प्रवक्ते आशुतोष आणि शाझिया इल्मी यांची गुरुवारी चौकशी केली. बुधवारी आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना गुजरातमधील रोड शोदरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर आप कार्यकर्त्यांनी येथील भाजप मुख्यालयावर हल्ला चढवला होता. केजरीवाल यांनी याप्रकरणी नंतर माफीही मागितली होती.


आपचे नेते आशुतोष आणि शाझिया इल्मी यांची अटक टळली. दिल्ली पोलिसांनी दोघांना त्यांच्या निवासस्थान आणि कार्यालयातून मंदिर मार्ग ठाण्यात नेले. तिथे त्यांची जवळपास पाच तास चौकशी करून सोडून देण्यात आले. दोघांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाकडूनच जामीन मिळू शकेल अशी कलमे एफआयआरमध्ये आहेत.
भाजप नेत्यांनी आशुतोष, शाझिया यांच्यासह आपचे नेते आणि कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. बुधवारी भाजप मुख्यालयावर दगडफेक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पोलिसांनी आशुतोष आणि शाझिया यांच्याविरुद्ध कलम 161 अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. याप्रकरणी 14 अन्य लोकांना जामीन मिळाला आहे. दरम्यान, पोलिस भाजपच्या इशा-यावर काम करत असल्याचा आरोप आशुतोष यांनी केला आहे. भाजप कार्यकर्त्यांनी आमच्या लोकांना मारहाण केली. मात्र, त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी का कारवाई केली नाही, असा सवाल शाझिया यांनी केला आहे.


मोदी विरोधकांना विकत घेतात,धमकावतात किंवा मारतात
आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी आपला गुजरातचा दौरा सुरूच ठेवला. कच्छ आणि भूज भागाला त्यांनी भेट दिली. तेथील एका सभेत बोलताना केजरीवाल म्हणाले, नरेंद्र मोदी विरोधकांना खरेदीच करत नाही, तर धमकावतात, अन्यथा ते मारून टाकतात. ही माझी नव्हे, तर राज्यातील लोकांची धारणा आहे. मोदी सलग कसे निवडून येतात, अशी विचारणा मी येथील लोकांकडे केली. त्यावर मोदी विरोधकांना वाढू देत नसल्याचे त्यांनी सांगितले. केजरीवाल यांनी मोदी यांच्या विकासाचा दावाही पोकळ ठरवला. गुजरातमध्ये केवळ अंबानी आणि अदानीचा विकास झाला आहे. गाव आणि गरिबांची अवस्था जैसे थे आहे, अशी टीका त्यांनी केली.


केजरीवालांकडून आचारसंहिता भंग
अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमध्ये रोड शोदरम्यान निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. निवडणूक आयुक्त एच. एस. ब्रह्मा म्हणाले, कायदेशीर बाबी पाहता केजरीवाल यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. आपल्या परवानगीशिवाय रोड शो करणे योग्य नव्हते. बुधवारी सायंकाळी त्यांना रोड शो करण्यापासून रोखले होते. भाजप मुख्यालयाबाहेर हिंसक निदर्शने केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने आपविरुद्ध कडक भूमिका घेतली आहे. याप्रकरणी आपची मान्यता रद्द का करू नये, अशी विचारणा आयोगाने केली आहे.