आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम आदमी पार्टीच्या आमदार अलका लांबा यांच्यावर हल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- राजधानीत सत्ताधारी आम आदमी पार्टी आणि भाजप यांच्यात विस्तवही आडवा जाताना दिसत नाही. सोमवारी अंमली पदार्थ विरोधी अभियानाच्या कार्यक्रमात आपच्या आमदार अलका लांबा यांच्यावर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर आपने लगोलग पत्रकार परिषद घेऊन हल्ल्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप केला.
उत्तर दिल्लीतील काश्मीर गेट जवळ पहाटे पाचच्या सुमारास लांबा यांनी अंमली पदार्थ विरोधी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने लांबा शिव मिष्टान्न भांडारसमोर उभ्या होत्या. हे भांडार भाजप आमदाराच्या मालकीचे आहे. त्याच भागातून लांबा यांच्यावर दगडफेक झाली. एक दगड त्यांच्या माथ्यावर येऊन लागला आणि भळभळा रक्त वाहू लागले, असा दावा आम आदमी पार्टीचे प्रवक्ते संजय सिंह यांनी पत्रकार परिषदेतून केला. अल्का लांबा या चांदनी चौक मतदारसंघाच्या आमदार आहेत. हल्ल्यात लांबा यांच्या डोक्याला जखम झाली आहे. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले व नंतर त्यांना घरी जाण्याची परवानगी मिळाली. हल्ल्यामागे भाजपचे आमदार आे.पी. शर्मा यांचा हात असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. परंतु भाजपने हा दावा फेटाळून लावला आहे.

पोलिसांसमोर हल्ला : माझ्या सुरक्षेसाठी चार पोलिस तैनात असतात. कार्यक्रमाच्या ठिकाणी पोलिस साडे सहाच्या सुमारास पोहाेचले होते. पोलिस अधिकाऱ्यांच्या समोर माझ्यावर हल्ला झाला, असा आरोप लांबा यांनी केला.
भाजप आमदाराच्या मालकीच्या हॉटेलमधून दगड भिरकावल्याचा आरोप

मोहीम सुरूच ठेवणार
आपल्यावर हल्ला झाला असला तरी अंमली पदार्थविरोधी मोहीम
ऑगस्टपर्यंत चालूच राहणार आहे,

पूर्वाश्रमीच्या काँग्रेस नेत्या : अल्का लांबा २० वर्षे काँग्रेसमध्ये विविध पदांवर कार्यरत होत्या. त्यानंतर अखेर त्यांनी २०१३ मध्ये काँग्रेसला रामराम ठोकून आम आदमी पार्टीत प्रवेश केला. ‘गो इंडिया फाउंंडेशन’ ही एनजीआेदेखील त्या चालवतात.

ड्रग्जमाफियांशी राजकीय नेत्यांचेच संबंध

एखाद्या दुकानात काम करणारा माणूस असा हल्ला का करेल ? भाजप आमदाराच्या मालकीचे हे दुकान असून त्याचा तपास पोलिसांनी केला पाहिजे. अंमली पदार्थाच्या व्यवसायाशी राजकीय नेत्यांचा संबंध असल्याच्या अनेक घटना दिल्लीत समोर आल्या आहेत. स्थानिक नेत्यांशी संबंध असल्याशिवाय अंमली पदार्थाचा काळा धंदा चालू शकत नाही. म्हणूनच पोलिसांनी कसून तपास केला पाहिजे, असी मागणी आपचे सिंह यांनी केली आहे.

धुसफूस सुरूच
आप आणि भाजप यांच्यात विधानसभा निवडणुकीपासूनच धुसफूस सुरू होती. त्यात आपच्या अनेक नेत्यांच्या पदव्यांचे प्रकरण असो किंवा भ्रष्टाचाराचे मुद्दे, यावर भाजपसह काँग्रेसने जोरदार टीका केली होती. त्यानंतर आपने जाहिरात माेहिमेद्वारे भाजपला लक्ष्य केले हाेते. एकूणच दोन्ही पक्षांतील वैर वाढत चालल्याचे दिसते.