आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aam Aadmi Party Suspends National Executive Member Rakesh Sinha

यादव-भूषण यांच्या हकालपट्टीच्या निर्णयाला विरोध केल्याने "आप' कार्यकारिणी सदस्य सिन्हा निलंबित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आम आदमी पार्टीचे (आप) कार्यकारिणी सदस्य राकेश सिन्हा यांना पक्षाने निलंबित केले आहे. पक्षात सध्या सुरू असलेल्या वादात सिन्हा यांनी काही निर्णयांवर तीव्र विरोध दर्शवला होता. विशेषत: योगेंद्र यादव व प्रशांत भूषण यांच्यावर पक्षाने केलेल्या कारवाईवर ते प्रचंड नाराज होते.
दरम्यान, आपचे तामिळनाडूतील नेते क्रिस्टिना सामी यांनीही याच मुद्द्यांवर राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, सिन्हा यांना निलंबित करण्याचा निर्णय रविवारीच घेण्यात आला असल्याचे पक्षसूत्रांनी सांगितले.
पक्षाची राजकीय निर्णयविषयक समिती व राष्ट्रीय कार्यकारिणीतून योगेंद्र यादव व प्रशांत भूषण यांची हकालपट्टी करण्यात आली होती. याच वेळी त्यांचे समर्थक अजित झा व आनंदकुमार यांच्यावरही कारवाई करण्यात आली. उत्तर प्रदेशातील आपचे नेते सिन्हा यांनी यादव व भूषण यांच्यावर केलेल्या कारवाईवरून जाब विचारला होता. हा निर्णय घेण्यापूर्वी पक्षाच्या लोकपालकडे तसा प्रस्ताव पाठवणे आवश्यक होते, असे सिन्हा यांनी पक्षाचे सचिव पंकज गुप्ता यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले होते. नंतर २८ मार्च रोजी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत जेव्हा यादव व भूषण यांना पक्षाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याचा विषय झाला तेव्हा सिन्हा यांनी या निर्णयाच्या निषेधार्थ बैठकीतून काढता पाय घेतला होता.

बैठकीबद्दल कसे माहीत नाही?

सिन्हा यांनी पंकज गुप्ता यांना लिहिलेल्या ज्या पत्रावरून त्यांना निलंबित करण्यात आले त्या पत्रात त्यांनी १८ मार्च रोजी यादव-भूषण यांच्यावर कारवाई करण्यासाठी बोलावलेल्या पक्ष कार्यकारिणी बैठकीविषयी विचारणा केली होती. पत्रात त्यांनी म्हटले होते की, ‘मी बैठकीला उपस्थित राहणार की नाही, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला तेव्हा मला बैठकीविषयी कळाले. मला तुमच्याकडून बैठकीची सूचना तर मिळाली नाहीच, उलट या बैठकीनंतर दुसरी कोणतीही बैठक होणार नाही, असे एसएमएसवर कळवण्यात आले होते. मला अजूनही कळत नाही की मला कार्यकारिणी बैठकीपासून का दूर ठेवण्यात आले?’
राहिले १६ सदस्य

सिन्हा यांचे निलंबन व क्रिस्टिना यांच्या राजीनाम्यामुळे आपच्या निर्णयाधिकारी असलेल्या सर्वोच्च समितीची सदस्यसंख्या आता केवळ १६ राहिली आहे. सिन्हा यांच्या व्यतिरिक्त उत्तर प्रदेशातील अन्य एक नेते विशाल लाठे यांनाही निलंबित करण्यात आले आहे. केजरीवाल समर्थक नेत्यांनी कारवाई केल्यानंतर यादव व भूषण यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला क्रिस्टिना व लाठे उपस्थित होते.