आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aam Adami Party Government Assended On Road, But Comman Man Disturbed From That

पोलिस अधिका-यांच्या बदलीसाठी रस्त्यावर उतरलेल्या ‘आप’मुळे आम आदमी बेहाल!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आपल्या मंत्र्यांशी गैरवर्तन करणा-या चार पोलिस अधिका-यांना निलंबित करावे, नाहीतर त्यांची बदली तरी करावी या मागणीसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल इरेला पेटले आहेत. ‘आप’ सरकारचे अख्खे मंत्रिमंडळ घेऊन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याविरोधात त्यांनी रस्त्यावरच धरणे सुरू केले आहे. दिल्लीत प्रथमच असे घडत असून यामुळे आम जनतेचे प्रचंड हाल होत आहेत.
दिल्लीचे पोलिस खाते केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत आहे. गृहमंत्री शिंदे यांनी शुक्रवारीच केजरीवालांची मागणी फेटाळून लावली. केजरीवालांची कृती मर्यादा ओलांडणारी असल्याचे ते सोमवारी म्हणाले. उपराज्यपालांनी पोलिसांच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. या अहवालाची वाट पाहावी लागेल, असे शिंदे म्हणाले. परंतु केजरीवाल यांनी हट्ट सोडला नाही. रस्त्यावरच मंत्र्यांनी फायली मागवून घेऊन कामकाज केले. दहा दिवस रस्त्यावर बसण्याची तयारी असल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले. दरम्यान, रात्री मुख्यमंत्री केजरीवाल आंदोलनस्थळी रस्त्याच्या कडेलाच झोपले.
या काळात रस्त्यावरूनच सरकार चालवले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. चुकीचे काही घडले तर केंद्र जबाबदार असेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
* मुख्यमंत्री केजरीवाल रस्त्यावरच झोपले
* केजरीवाल यांची वादग्रस्त वक्तव्ये
1. प्रामाणिक पोलिस अधिका-यांनी नोकरी सोडून आपला पाठिंबा देण्यासाठी यावे, असे केजरीवाल भाषणात म्हणाले.
2. होय मी अराजकतावादी आहे. संपूर्ण देशच अराजकतावादी झाला असेल तर मी कसा काय वेगळा राहू शकतो?
शिंदे लाचखोर : आरोप
माजी गृह सचिव आर.के. सिंह यांचा हवाला देऊन केजरीवाल यांनी शिंदेंवर लाचखोरीचा आरोप केला. पोलिसांच्या बदल्यांसाठी शिंदे पैसे घेतात, असे सिंह यांनी म्हटले होते. त्यांच्या वर्तनावरून हेच सिद्ध होते, असे केजरीवाल म्हणाले. सिंह यांनी म्हणणे सिद्ध करावे, असे शिंदे म्हणाले.
सिंह सध्या भाजपमध्ये आहेत.
जनतेची मात्र तारांबळ
1. केजरीवाल यांच्या आंदोलनामुळे केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री मनीष तिवारी यांनाही गाडी सोडून चालतच आपल्या कार्यालयात जावे लागले.
2. लोकांची गर्दी थोपवण्यासाठी सेंट्रल दिल्लीतील चार मेट्रो स्टेशन बंद करण्यात आले. लोकांना ये-जा करण्यात अडचणी आल्या.
3. आंदोलनस्थळी 4 हजारांवर पोालिस फौजफाटा. पोलिसांच्या सुट्या रद्द.
यापुढेही अडचणी वाढणार
1. आंदोलनाचा परिसर सोमवारी मध्यरात्रीपासून प्रजासत्ताक दिनासाठी लष्कराकडे दिला जाईल. यात आंदोलकांवर कारवाई होऊ शकते.
2. चारही मेट्रो स्टेशन मंगळवारीही बंद राहतील. लोकांना अडचणींचा सामना करावा लागेल. विरोधी पक्ष लोकांना निदर्शनांसाठी चिथावणी देऊ शकतात.
अंजली दमानिया यांची शांतीगिरींशी चर्चा
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीच्या राज्य समन्वयक अंजली दमानिया यांनी रविवारी शांतीगिरी बाबांची भेट घेऊन 40 मिनिटे गुप्त चर्चा केली. योग्य उमेदवारास पाठिंबा देऊ, असे बाबांनी स्पष्ट केले. दमानिया यांनी भक्तांच्या पंक्तीत भाजी-पोळीचे जेवणही घेतले. बाबांनी आशीर्वाद दिल्याचे त्या म्हणाल्या. गेल्या लोकसभा निवडणुकीत बाबांनी औरंगाबादेत दीड लाख मते घेतली होती.