नवी दिल्ली - आम आदमी पार्टीला दिल्लीत मिळालेल्या यशानंतर सगळीकडे केजरीवाल यांची हवा सुरू आहे. एक सर्वसामान्य व्यक्ती दिल्लीच्या तख्तावर बसल्यामुळे सर्वसामान्यांना आश्चर्य आणि आनंद आहे. ही बदलत्या राजकारणेची झलक असल्याचे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. मात्र, निवडणूक लढविण्यासाठी पैशांची गरज असते. देशातील प्रत्येक राजकीय पक्ष देणगी घेतो. अशाच पद्धतीने आम आदमी पार्टीनेही देणगी गोळा केली होती. दिल्लीच्या निवडणूकीसाठी त्यांनी दिल्लीसह देशभरातून आणि विदेशातूनही देणगी मिळविली आहे. हा ओघ अजूनही सुरुच आहे. विशेषम्हणजे, दिल्ली विधानसभा निवडणूकीसाठी आपला दिल्लीबाहेरून 80 टक्के देणगी मिळाली आहे. यावरून आगामी लोकसभा निवडणूकीत ते प्रभावी पक्ष ठरण्याची शक्यता आहे.
'आप'ने दिल्ली विधानसभेसाठी ऐकूण 22.3 कोटी रुपये गोळा केले होते. त्यातील केवळ 4.5 कोटी रुपये दिल्लीच्या जनतेने दिलेले आहेत. म्हणजेच 80 टक्के रक्कम त्यांना दिल्ली बाहेरुन मिळाली आहे. यात परदेशातील एनआरआयकडून 30 टक्के (6.7 कोटी रुपये) देणगी मिळाली. उर्वरित रक्कम देशाच्या कानाकोप-यातून मिळाली आहे. यात महाराष्ट्रानेही 'आप'ला भरघोस मदत केली आहे. अण्णा हजारेंच्या जनलोकपाल आंदोलनातून पुढे आलेले अरविंद केजरीवाल आणि त्यांचा पक्ष 'आप'ला महाराष्ट्राने 2.8 कोटी रुपये दिले आहेत.
आम आदमी पार्टीला देणगी देणारे 83 हजार लोक किंवा संस्था आहेत. शुक्रवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार देशाच्या विविध राज्यातील महानगरांमधून मोठ्या प्रमाणात देणगी मिळाली आहे. ऐकूण देणगीच्या 73 टक्के वाटा हा देशातील टॉप 11 महानगरातून मिळालेला आहे. यात दिल्लीनंतर महाराष्ट्राच्या मुंबईचा क्रमांक लागतो. त्यानंतर बंगळुरूने 1.3 कोटी रुपये दिले आहेत. नोएडा मधून 'आप'ला 1.1 कोटी तर, राष्ट्रवादीचा गड पुण्यातून 70 लाखांची देणगी मिळाली आहे.
परदेशातून मिळालेल्या देणगीचा विचार केला तर, अमेरिकेतून 'आप'ला 2.4 कोटी रुपये मिळाले आहेत. अनिवासी भारतीयांकडून मिळालेल्या देणगी पैकी एक तृतीयंश वाटा अमेरिकेत राहाणा-या भारतीयांकडून मिळाला आहे. त्यानंतर युएईमधून 61 लाख आणि युके मधून 49 लाख रुपये मिळाले आहेत.