आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेता आमिर खानवर चौफेर टीका; देश सोडून जाणार कुठे- भाजप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/ मुंबई - मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेला अभिनेता आमिर खान देशातील असहिष्णुतेबद्दलच्या विधानामुळे भाजप आणि काही चित्रपट कलावंतांच्या टीकेचे लक्ष्य ठरला. आमिर खानचे विधान हा देशाला बदनाम करण्याच्या काँग्रेसच्या मोठ्या राजकीय षड‌्यंत्राचा भाग असल्याचे भाजपने म्हटले आहे. परंतु काँग्रेस आणि अन्य चित्रपट कलावंत आमिर खानच्या समर्थनार्थही उतरले आहेत. खरे बोलणाऱ्या टीकाकारांना सरकार देशद्रोही ठरवू शकत नाही, धमकावू शकत नाही, असे आमिरच्या समर्थनार्थ उतरलेल्यांनी म्हटले आहे.
पर्यटनाला चालना देण्यासाठी सुरू केलेल्या केंद्र सरकारच्या ‘अतुल्य भारत’ मोहिमेचे ब्रँड अॅम्बेसेडर असलेल्या आमिरने सोमवारी गेल्या सात-आठ महिन्यांत देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या घटनांबाबत चिंता व निराशा व्यक्त केली होती. त्यामुळे आमिर चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. ‘माझी पत्नी किरण आणि मी संपूर्ण जीवन भारतात घालवले आहे.
आपण भारत सोडून जायला हवे, असे तिने पहिल्यांदा म्हटले होते... तिला आपल्या मुलांची चिंता आहे, आपल्या अवतीभोवतीच्या वातावरणामुळे ती धास्तावलेली आहे,’ असे रामनाथ गोएंका पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळ्यात आमिर म्हणाला होता. त्यावरून देशभरात असहिष्णुतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून मोदी समर्थक आणि विरोधक आमने-सामने आले आहेत.
आमिरच्या घराबाहेर निदर्शने, सुरक्षेत वाढ
असहिष्णुतेच्या मुद्द्यावर टीकेचे लक्ष्य बनलेल्या अभिनेता आमिर खानच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी आमिरच्या वांद्रेतील घराबाहेर निदर्शने केली. पोलिसांनी पाच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. आमिर खानला पुरेशी सुरक्षा देण्यात आली आहे, असे मुंबईचे पोलिस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.
हिवाळी अधिवेशनात गाजणार असहिष्णुताच
गुरुवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात असहिष्णुतेच्या मुद्द्यावर घेरण्याची जोरकस तयारी विरोधी पक्षांनी केली आहे. असहिष्णुता व घर वापसीचा मुद्दा उचलून धरून सरकारची कोंडी करण्याबाबत काँग्रेस, जदयू आणि अन्य विरोधी नेत्यांमध्ये चर्चाही झाली आहे.या अधिवेशनात असहिष्णुतेच्या मुद्द्यावर चर्चेची नोटीसही काँग्रेसने दिली आहे.
आमिरवर टीका
आमिर तर दुसऱ्यांना घाबरवत आहेत : भाजप
देशात असहिष्णू वातावरण असल्याची आवई उठवून देशाला बदनाम केले जात आहे आमिर खान स्वत: घाबरलेले नाहीत तर ते दुसऱ्यांना घाबरवत आहेत. भारत सोडून आमिर व त्यांचे कुटुंबीय कुठे जाणार? भारतासारखा दुसरा चांगला देश नाही आणि एका भारतीय मुसलमानासाठी एका हिंदूसारखा दुसरा चांगला शेजारीही नाही.
- शाहनवाज हुसेन, भाजप प्रवक्ते
स्मृती इराणी, केंद्रीय मंत्री - आमिर ‘अतुल्य भारत’चे ब्रँड अॅम्बेसेडर असूनही मंत्र्यांसमोर मंचावर येऊ शकतात व ‘मन की बात’ बोलू शकतात, हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य व सहिष्णुतेचाच पुरावा आहे.
नलिन कोहली, भाजप प्रवक्ते - ‘पीके’हा आमिर खानचा शेवटचा चित्रपट दक्षिणपंथीय समूहांकडून प्रचंड विरोध होऊनही बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला होता. हा सहिष्णुतेचाच पुरावा आहे.
आमिरला पाठिंबा
आता तरी लोकांचे म्हणणे ऐकून घ्या : काँग्रेस
स्वत:वर किंवा पंतप्रधानांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या सर्वच्या सर्व लोकांना सरसकट देशद्रोही, राष्ट्रविरोधी ठरवण्याऐवजी आपण लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे आणि त्यांची नेमकी अडचण समजून घेतली पाहिजे. भारतात समस्या सोडवण्याचा हाच मार्ग आहे. धमकावणे, दरडावणे किंवा गैरवर्तन करणे हा योग्य मार्ग नव्हे.
- राहुल गांधी, काँग्रेस उपाध्यक्ष
अभिषेक मनु सिंघवी, काँग्रेस प्रवक्ते - आमिर खानने भाजपच्या अनेक नेत्यांसमोर जे म्हटले आहे, तेच अख्खे जग म्हणू लागले आहे, संपूर्ण भारत आणि विवेकाने विचार करणारे सर्वच लोकही म्हणू लागले आहेत.

सीताराम येचुरी, माकप नेते- एक अभिनेताच बेडरपणे बोलला आहे. बिहार निवडणुकीमुळे असहिष्णुतेचा मुद्दा उकरून काढला गेला हा आरोप काल्पनिक होता हे आता तरी भाजप मान्य करणार का?
आमिरला सल्‍ला
ऋषी कपूर, अभिनेता- श्रीमान व श्रीमती आमिर खान, जेव्हा काही चुकीचे घडत असते आणि व्यवस्थेत सुधारणा करण्याची गरज असते, तेव्हा तिची डागडुजी करा, तिला सुधारा. त्यापासून दूर पळू नका. हाच खरा पराक्रम आहे.
परेश रावल, अभिनेता- ही आपली मातृभूमी आहे असे आमिरला वाटत असेल तर ते तिला कधीच सोडून जाण्याविषयी बोलणार नाहीत. आमिर एक योद्धा आहे. अशा वेळी त्यांनी पळ काढण्याऐवजी देशातील स्थिती सुधारायला हवी.