आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘स्वत:ला सहआरोपी करा’; आपचा नजीब जंग यांना टोला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राजधानीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाने (आप) उपराज्यपाल नजीब जंग यांच्यावर पुन्हा हल्ला चढवला आहे. शीला दीक्षित सरकारच्या कार्यकाळादरम्यान झालेल्या घोटाळ्यातील चार प्रकरणांत तुम्ही स्वत: आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) प्रमुख एम. के. मीणा यांना सहआरोपी करावे, अशी टोला लगावणारी मागणी आपने जंग यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. त्यातील एक प्रकरण केजी बेसिनमधील नैसर्गिक वायूच्या दराशी संबंधित आहे.

आम आदमी पक्षाचे १२ आमदार सकाळी ११.३० वाजता जंग यांच्या निवासस्थानी ही मागणी घेऊन पोहोचले होते. जंग यांनी भेटण्यास नकार दिला, असा दावा त्यांनी नंतर केला; पण जंग यांचे दिवसभराचे कार्यक्रम आधीच ठरले होते. त्यांची भेट घेण्यासाठी एक प्रक्रिया आहे, असे जंग यांच्या सचिवालयाने सांगितले. दिल्लीतील टँकर घोटाळ्यात एफआयआर दाखल झाल्यानंतर या प्रकरणात शीला दीक्षित तसेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही चौकशी होऊ शकते, असे वक्तव्य एसीबी प्रमुख मीणा यांनी केले होते. त्यामुळे केजरीवाल आणि आम आदमी पक्षाच्या संतापाचा भडका उडाला आहे. त्या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली आहे.

या घोटाळ्यातील कथित आरोपींना जंग हे संरक्षण देत आहेत, असा आरोप करताना आपचे आमदार सोमनाथ भारती म्हणाले की, ही प्रकरणे सभागृहाच्या याचिका समितीकडे सोपवावी, अशी मागणी आम्ही विधानसभा अध्यक्ष रामनिवास गोयल यांच्याकडे केली आहे. या समितीला उपराज्यपालांनाही बोलावण्याचे अधिकार आहेत.

आपचे आमदार राजेंद्र पाल यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘या चार प्रकरणांत कारवाई न करून तुम्ही श्रीमती दीक्षित यांना संरक्षण देत आहात. या गुन्हेगारी कटात केंद्र सरकारने लादलेले एसीबीचे प्रमुख मीणा हेही तुमच्यासोबत सहभागी आहेत. या चार प्रकरणांत मीणा आणि तुम्हाला स्वत:ला सहआरोपी करावे, असे निर्देश देऊन माझे पत्र कृपया एसीबीकडे पाठवावे.’ दिल्लीत राष्ट्रपती राजवट असताना जंग यांनी ही चारही प्रकरणे दाबली, त्यावर काहीही कारवाई करण्यात आली नाही, असा आरोपही गौतम यांनी केला आहे. उपराज्यपालांच्या सचिवालयातील एका अधिकाऱ्याने हे पत्र स्वीकारले.

नजीब जंग आणि आप सरकारमध्ये नियुक्त्या आणि पोलिसांची भूमिका यावरून संघर्ष सुरूच आहे. केजरीवाल यांनी टँकर घोटाळ्यातील एफआयआरवरून मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही हल्ला चढवला होता.

दहशतवाद्यासारखी वागणूक : भारती
राज निवास येथे आमदारांना ‘दहशतवाद्यासारखी’ वागणूक देण्यात आली. जंग हे राज निवास परिसरात होते, तरीही त्यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली नाही, असा आरोप सोमनाथ भारती यांनी केला.

सत्तेवर आल्यापासून वादंग सुरूच
आम आदमी पार्टीचे सरकार दिल्लीत स्थापन झाल्यापासून सत्ताधारी पक्ष व नायब राज्यपाल यांच्यातील राजकीय जुगलबंदी पाहायला मिळत आहे. हा संघर्ष अनेकदा वैधानिक अधिकारापासून राजकारणापर्यंत दिसून आला.
बातम्या आणखी आहेत...