आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉंग्रेसचा पाठींबा घेऊन केजरीवालांनी सरकार स्‍थापन करावेः अनुपम खेर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- दिल्‍लीची सत्ता सध्‍या सर्वांसाठी नकोशी झाली आहे. निवडणुकीचे निकाल हाती येऊनही कोणीच सत्ता स्‍थापनेसाठी दावा केलेला नाही. राजकारणात असे चित्र क्‍वचितच दिसून येते. सध्‍या ते दिल्‍लीच्‍या नशीबी आले आहे. सत्तेचा पेच कायम असतानाच अभिनेते अनुपम खेर यांनी आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांना कॉंग्रेससोबत सरकार स्‍थापन करण्‍याचा सल्‍ला ट्विटरवरुन दिला आहे.

आम आदमी पार्टी आणि भारतीय जनता पक्षानेही कोणाचा पाठींबा न घेण्‍याचा व कोणालाही पाठींबा न देण्‍याचा निर्णय घेतला आहे. त्‍यामुळे पुन्‍हा निवडणूक किंवा राष्‍ट्रपती राजवटीची शक्‍यता आहे. दोन्‍ही पक्षांमध्‍ये सहमतीची एक शक्‍यता निर्माण झाली होती. तीदेखील मावळली. आता भाजपनेही पुन्‍हा निवडणुकीची तयारी केली आहे. आम्‍ही पुन्‍हा निवडणुकीसाठी सज्‍ज आहोत, असे भाजपचे मुख्‍यमंत्रीपदाचे उमेदवार डॉ. हर्षवर्धन यांनी म्‍हटले आहे.

हर्षवर्धन म्‍हणाले, की दिल्‍लीत अतिशय दुर्दैवी स्थिती निर्माण झाली आहे. आम्‍हाला सर्वाधिक जागा मिळाल्‍या असल्‍या तरीही बहुमत नाही. त्‍यामुळे आम्‍ही सरकार स्‍थापन करु शकत नाही. कोणतेही घाणेरडे आणि मोडतोडीचे राजकारण आम्‍हाला करायचे नाही. पुन्‍हा निवडणूक हाच पर्याय असल्‍यास आमची तयारी आहे. आम्‍ही सज्‍ज आहोत.

'आप'चे नेते अरविंद केजरीवाल यांच्‍या जवळचे प्रशांत भूषण यांनी भाजपला सशर्त पाठींबा देण्‍याची तयारी दर्शविली होती. भाजपने जनलोकपाल विधेयक मंजूर करण्‍याचे आश्‍वासन दिल्‍यास पाठींबा देऊ, असे प्रशांत भूषण म्‍हणाले होते. परंतु, त्‍यांनी आता घुमजाव केले. या मुद्यावरुन वाद निर्माण झाल्‍यानंतर त्‍यांनी असे वक्तव्‍य केल्‍याचे फेटाळले. भाजप आणि कॉंग्रेस आमच्‍या पक्षासारखे असूच शकत नाही. त्‍यामुळे पाठींबा देण्‍याचा किंवा घेण्‍याचा प्रश्‍नच निर्माण होत नाही, असे भूषण म्‍हणाले.

प्रशांत भूषण यांनी एका वृत्तवाहिनीवर बोलताना भाजपला सशर्त पाठींबा देण्‍याचा मुद्दा माडला होता. त्‍यानंतर मोठा वाद सुरु झाला. पक्षानेही भूषण यांची भूमिका फेटाळली. हे त्‍यांच वैयक्तीक मत असू शकते. पक्षाने नाही, अशी प्रतिक्रीया 'आप'तर्फे देण्‍यात आली.

किरण बेदी यांनी भाजपशी युती करून ‘आप’ने सरकार स्थापन करावे, असा सल्ला दिला असला तरी केजरीवाल यांनी हा प्रस्ताव नाकारला आहे. कुणाचाही पाठिंबा घेणार नाही, देणारही नाही, अशी कठोर भूमिका ‘आप’ने घेतली आहे. दरम्यान, सोमवारी सायंकाळी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. यात केजरीवाल यांची सर्वानुमते नेतेपदी निवड करण्यात आली. दुसरीकडे भाजप नेते नितीन गडकरी यांनी पक्षाची भूमिका मांडताना कुणाला पाठिंबा देणार नाही आणि कुणाचा पाठिंबा घेणारही नाही, असे सांगून पक्षाची भूमिका कशी स्पष्ट आहे, हे दाखवून दिले. यामुळे दिल्लीकरांना पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागण्याची शक्यता मात्र बळावली.

अरविंद केजरीवाल पुन्‍हा निवडणुकीची तयारी करु असे सांगत आहेत. परंतु, पुन्‍हा निवडणूक झाल्‍यास 75 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. परंतु, भाजप आणि 'आप' यात राजकीय फायदा दिसत आहे. त्‍यामुळे पुन्‍हा सत्तेची समीकरणे बदलू शकतात.