आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतींवर खटला चालवण्यास दिल्ली राज्यपालांची परवानगी, आफ्रिकी महिलांशी गैरवर्तन प्रकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आम आदमी पार्टीचे (आप) नेते व दिल्लीचे माजी कायदा मंत्री सोमनाथ भारती यांच्या अडचणीत मंगळवारी आणखी भर पडली. आफ्रिकी महिलांशी गैरवर्तन केल्याच्या प्रकरणी भारती यांच्याविरुद्ध खटला चालवण्यास नायब राज्यपाल नजीब जंग यांनी परवानगी दिली आहे.
जानेवारी २०१४ मध्ये भारती यांच्यावर हा आरोप झाला होता. हे प्रकरण तापल्यानंतर आप सरकारचे गृहमंत्री सत्येंद्र जैन यांनी भारतींवर खटला चालवण्याची परवानगी नाकारली होती. मात्र, हा निर्णय बाजूला ठेवत जंग यांनी आप सरकारला चांगलाच हादरा दिला आहे.
सक्षम अधिकाऱ्याकडून भारतींच्या विरुद्ध खटला चालवण्याची परवानगी घ्यावी, असे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले होते. नायब राज्यापालांचा हा निर्णय मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांशी अगोदरच बिघडलेल्या संबंधांत आणखी कटूता आणणार हे निश्चित आहे. सप्टेंबर २०१४ मध्ये भारतींविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. भारतींच्या नेतृत्वाखाली जमलेल्या जमावाने खिडकी एक्स्टेंशन परिसरात ९ आफ्रिकन महिलांशी दुर्वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्या वेळी भारती आप सरकारमध्ये मंत्री होते. दरम्यान आरोप खोटे असल्याचे
त्यांनी म्हटले आहे. नायब राज्यपालांचे आदेश अद्याप आपण पाहिले नसून त्यावर प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला.
‘सुंदर महिलांवर’ टिप्पणी
सोमनाथ भारती यांनी सोमवारी दिल्ली विधानसभेत महिला सुरक्षा आयोग स्थापन करण्याच्या प्रस्तावावर आक्षेपार्ह टिप्पणी केली. या
चर्चेदरम्यान त्यांनी केलेल्या टिप्पणीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. दिल्ली सरकारला सुरक्षा उपायांबाबत निर्णयाचे पूर्ण स्वातंत्र्य दिले, तर सुंदर महिलाही मध्यरात्री निर्भयपणे दिल्लीच्या रस्त्यांवर संचार करू शकतील, असे सोमनाथ म्हणाले. भाजप व काँग्रेस या पक्षाच्या
सदस्यांनी केलेल्या कठोर टीकेनंतर सभागृहाच्या कामकाजातून हे वक्तव्य वगळण्यात आले आहे.

भारतींना केवळ सुंदर महिलांची काळजी
सोमनाथ भारती केवळ सुंदर महिलांची काळजी घेतात. मी अगदी सामान्य दिसणारी असल्याने त्यांनी कायम मला वाईट वागणूक दिली, अशा शब्दांत भारती यांची पत्नी लिपिका मित्रा यांनी आरोप केले आहेत. सुंदर महिलांना मध्यरात्रीही दिल्लीतील रस्त्यावरून कोणत्याही
अडचणीविना सुरक्षित जाता यावे यासाठी आम आदमी पक्षाचे सरकार प्रयत्नशील असल्याचे भारती यांनी म्हटले होते. याबाबत बोलताना मित्रा म्हणाल्या, भारती केवळ सुंदर महिलांची काळजी करतात. सभागृहातही ते सुंदर महिलांच्या सुरक्षेबाबत बोलत असतील तर आमच्यासारख्या महिलांचे काय? सन २०१० पासून भारती यांच्या अत्याचारांना आपण सामोरे गेलो असल्याचा आरोपही त्यांनी केला. लिपिका यांनी भारतींविरुद्ध महिला आयोगात तक्रार दिली होती.

वादग्रस्त वक्तव्यांमुळे अडचणी
आम आदमी पार्टीचे अनेक नेते वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेकदा अडचणीत आले अाहेत. त्यात आता भारती यांचीही भर पडली आहे. विशेष म्हणजे अगदी संवेदनशील मुद्द्यांवरही थेट विधानसभेत भाष्य केल्याने सोमनाथ भारती यांची मोठी अडचण झाली. आता कोर्टातही त्यांना
याचा जाब विचारला जाईल.