नवी दिल्ली - दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद
केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीकडून पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर (भाजप) घोडेबाजारीचा आरोप करण्यात आला आहे. एवढेच नाही तर, पक्षाच्या एका आमदाराचे म्हणणे आहे, की भाजपमध्ये प्रवेश करण्यास नकार दिल्यानंतर धमकी देखील देण्यात आली. केजरीवाल यांनी यासंदर्भात भाजपाध्यक्ष राजनाथसिंह यांना पत्र लिहिले आहे. केजरीवाल यांच्या नेतृत्वात आज (गुरुवार) सायंकाळी 6.30 वाजता त्यांच्या पक्षाचे 27 आमदार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेणार आहेत. ते राष्ट्रपतींना दिल्ली विधानसभा भंग करुन निवडणूक घेण्याची मागणी करणार आहेत. तसेच भाजपच्या कथित घोडेबाजारीबद्दलही सांगणार आहेत.
केजरीवालांचे राजनाथसिंहाना पत्र
अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाध्यक्ष राजनाथसिंह यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले, 'भाजपचे कार्यकर्ते आपच्या आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे लोकशाहीला घातक आहे. जर तुम्हाला निवडणूका हव्या असतील तर, माझी मागणी आहे, की तुम्ही नायब राज्यपाल नजीब जंग यांना लवकर प्रक्रिया सुरु करण्यास सांगावे. 4 जुलैला भाजपने सुप्रीम कोर्टात आपली बाजू स्पष्ट करावी.'
राष्ट्रपतींची घेणार भेट
आपच्या आमदारांचे शिष्टमंडळ गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता राष्ट्ररपतींच्या भेटीला जाणार आहे. आप आमदारांना भाजपचे सदस्य फोडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपांच्या पार्श्वभूमीवर ही भेट होत असल्यामुळे या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातच या भेटीच्या एक दिवस आधी शालीमार बाग येथील आमदार वंदना कुमारी यांनी भाजप कार्यकर्त्याने कुटुंबियांना मारण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे. त्याआधी आपच्या काही आमदारांनी आरोप केला होता, की भाजपचे काही लोक आमच्या संपर्कात आहेत. आपच्या आमदारांना भाजप प्रवेशासाठी पैशांची आणि मंत्रीपदाची ऑफर देत आहेत.
आपचे नेते मनीष सिसोदिया म्हणाले, राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांना दिल्लीतील राजकीय परिस्थितीची माहिती करुन दिली जाईल आणि त्याचे योग्य मुल्यांकन करण्यासाठी अर्ज सादर करु. तसेच, भाजपकडून आपच्या आमदारांना विकत घेण्याचा आणि धमकावले जात असल्याचीही माहिती राष्ट्रपतींना देण्यात येईल.
(संग्रहित छायाचित्र - आप नेते अरविंद केजरीवाल )