नवी दिल्ली - एम्सच्या संरक्षक भिंतीच्या काही भागाचे नुकसान करण्यास उद्युक्त केल्याच्या आणि सुरक्षा अधिकाऱ्यांशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून आम आदमी पक्षाचे (
आप) आमदार सोमनाथ भारती यांना गुरुवारी अटक करण्यात आली. गेल्या २४ तासांत अटक होणारे ते पक्षाचे दुसरे आमदार ठरले आहेत.
मालवीयनगर पोलिस ठाण्याच्या पथकाने भारती यांना दुपारी अटक केली आणि त्यांना हौज खास पोलिस ठाण्यात आणले. या ठाण्यात त्यांच्यावर ११ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल झाला होता. एम्सचे मुख्य सुरक्षा अधिकारी आर. एस. रावत यांच्या तक्रारीवरून भारती यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अनधिकृत लोकांना एम्सच्या मालमत्तेत दाखल करण्यासाठी भारती यांनी जमावाला गौतमनगर नाला रस्त्यावर बुलडोझरद्वारे संरक्षक भिंत पाडण्यास उद्युक्त केल्याचा तसेच सुरक्षा रक्षकांशी गैरवर्तन केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. भारती यांनी त्या वेळी आपल्या कृतीचे समर्थन करत एम्सवर खोटे बोलत असल्याचा आरोप केला होता. ‘एम्स खोटे बोलत आहे. एम्स गौतमनगरच्या नागरिकांना कायदेशीर प्रवेशाचा हक्क नाकारत आहे. जेथे सामान्य माणसाला त्रास होत असेल तेथे मी जाईन. नागरिकांनी भिंत पाडल्याचा आरोप खोटा आहे. मी न्यायालयात लढा देईन,’ असे ट्विट भारती यांनी त्यावेळी केले होते.
आमदार खान यांना जामीन
महिला नातेवाइकाचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेले आपचे आमदार अमानतुल्लाह खान यांना गुरुवारी दिल्ली न्यायालयाने जामीन मंजूर केला. चौकशीसाठी त्यांच्या कोठडीची गरज नाही, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर न्यायालयाने जामीन मंजूर केला.