नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या एक दिवस आधी जामा मशिदीचे इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी ‘
आप’ला पाठिंबा देण्याची घोषणा केली. मात्र, ‘आप’ने पाठिंब्याचा प्रस्ताव फेटाळून लावला. ‘मुस्लिम जातीय पक्षांच्या निशाण्यावर असल्याने आम्ही धर्मनिरपेक्ष पक्षांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
दिल्लीवासीयांनी, विशेषत: मुस्लिमांनी आपला मतदान करावे,’ असे आवाहन बुखारी यांनी शुक्रवारी केले. त्यावर प्रतिक्रिया देताना आपचे नेते संजय सिंह म्हणाले, ‘आम्ही धर्म अथवा जातीचे राजकारण करत नाही. जी व्यक्ती आपल्या मुलाच्या दस्तारबंदी कार्यक्रमासाठी देशाच्या पंतप्रधानांना बोलावत नाही आणि पाकच्या पंतप्रधानांना निमंत्रण देते अशा व्यक्तीचा पाठिंबा आम्हाला नको.’भाजपने मात्र बुखारींवर पलटवार केला आहे. ‘जे अशा फतव्यांच्या विरोधात आहेत त्यांनी १०० % मतदान करून उत्तर द्यावे,’ अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी दिली.
बेदींची गुरुद्वारात सेवा,
केजरीवालांची प्रार्थना : भाजप नेत्या किरण बेदी यांनी कृष्णानगर मतदारसंघातील गुरुद्वारात लंगरसाठी पोळ्या लाटल्या. आपचे नेते
अरविंद केजरीवाल यांनीही रकाबगंज गुरुद्वारात तसेच बिर्ला मंदिरात प्रार्थना केली.
जाहिरातींवर आपचा आक्षेप
दिल्लीच्या जवळपास सर्व वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर शुक्रवारी भाजपची जाहिरात प्रसिद्ध झाली. तीत पंतप्रधान मोदींच्या छायाचित्रासह केंद्राच्या आठ महिन्यांच्या कामगिरीचा उल्लेख आहे. त्यावर ‘भाजपकडे एवढा पैसा कुठून आला?’ असा प्रश्न आपचे नेते आशुतोष यांनी विचारला. भाजपनेही आतील पानांवरील आपच्या जाहिरातींकडे बोट दाखवले.