आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"आप'मध्ये फूट अटळ, यादव-भूषण नव्या पक्षबांधणीच्या तयारीत, आजमावली मते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आम आदमी पक्षातील फूट आता अटळ मानली जात आहे. पक्षाचे बंडखोर नेते प्रशांत भूषण व योगेंद्र यादव यांनी भविष्यातील धोरण निश्चित करण्यासाठी सोमवारी गुडगावमध्ये "स्वराज संवाद' अर्थात बैठकीचे आयोजन केले होते. यात देशभरातून आलेल्या कार्यकर्त्यांची मते आजमावण्यात आली. ठोस निर्णय झाला नसला तरी स्वत:हून पक्ष सोडण्यापेक्षा पक्षाने कारवाई केली, तर दिशा ठरवू, असे मत नेत्यांनी मांडले.

दरम्यान, या बैठकीत सहभागी झालेले कार्यकर्ते व नेत्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक केजरीवाल समर्थक नेत्यांनी दिले आहेत. याचाच अर्थ आता यादव-भूषण यांच्यासह कार्यकर्त्यांची हकालपट्टी होणार, हे निश्चित मानले जात आहे.

या कार्यक्रमात प्रशांत भूषण म्हणाले, नवा पक्ष स्थापन करण्याची इतक्यात घाई नाही. मात्र, आपण जो पक्ष स्थापन करून तो पारदर्शकपणे चालवण्याची क्षमता आपल्यात आहे हे सिद्ध करून दाखवण्याची अगोदर गरज आहे.

अनेक बड्या नेत्यांची दांडी
मूळ आप पक्षातील अनेक बड्या नेत्यांनी यादव-भूषण यांनी आयोजित केलेल्या या बैठकीला दांडी मारली. मात्र, पत्राद्वारे आपण पाठीशी असल्याची हमी दिली. यात पतियाळाचे खासदार धर्मवीर गांधी, राष्ट्रीय कार्यकारिणीची बडतर्फ सदस्या क्रिस्टिना सामी, अरुणा रॉय, मेधा पाटकर, पत्रकार कुलदीप नायर यांचा समावेश आहे. यादव-भूषण यांच्यासारख्यांचा अपमान ही घोडचूक असल्याचे नायर यांनी म्हटले आहे.

राज्यातही फुटीचे वारे
मुंबई | योगेंद्र यादव, प्रशांत भूषण या दोन नेत्यांनी आयोजिलेल्या बैठकीस उपस्थित राहणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल हा पक्षाचा इशारा डावलून महाराष्ट्रातील तीनशेपेक्षा अधिक नेते-कार्यकर्ते या बैठकीस उपस्थित राहिले. त्यामुळे महाराष्ट्रातही फुटीची स्थिती निर्माण झाली आहेे.

परिषदेत संजीव साने, मानव कांबळे, मारुती भापकर, ललीत बाबर, इब्राहीम शेख, शकील अहमद, अण्णासाहेब खंदारे हे सहभागी झाली होते. शेख व भापकर हे राष्ट्रीय कार्यकारणीचे सदस्य आहेत. बाबर, संजीव साने लोकसभा िनवडणुकीस आपकडून उभे होते. महाराष्ट्र आपचे संयोजक सुभाष वारे या बैठकीस उपस्थित नव्हते. मात्र, येत्या चार िदवसात ते निर्णय सांगणार आहेत.

कारवाई अशक्य
यादव, भूषण, आनंदकुमार आजसुद्धा पक्षाचे सदस्य आहेत. पक्ष घटनेनुसार कोणत्याही सदस्यास बैठक बोलवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे दिल्लीच्या बैठकीस हजर राहिलो म्हणून पक्ष आमच्यावर कारवाई करुच शकत नाही, असा खुलासा बैठकीस हजर असलेल्या एका नेत्याने ‘दिव्य मराठी’कडे केला.