नवी दिल्ली - राजधानीतील राजकीय पेच सोमवारी सुटला. आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसच्या 8 आमदारांच्या बळावर सत्तास्थापनेचा दावा उपराज्यपाल नजीब जंग यांच्याकडे केला. उपराज्यपालांकडून लगेच तो मंजूरही झाला. गुरुवारी रामलीला मैदानावर केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.
रामलीलावरच दोन वर्षांपूर्वी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनातून आम आदमी पार्टीचा उदय झाला होता. 2 ऑक्टोबर 2012 रोजी केजरीवाल यांनी अण्णांचा विरोध डावलून राजकीय पक्षाचा पाया रचला आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीचे मैदान लढवले. 28 जागा जिंकून त्यांनी इतिहास घडवला. सत्ताधारी काँग्रेसचे फक्त 8 आमदार निवडून आले.
2.55 % मतदारांच्या सल्ल्याने सरकार
4 डिसेंबरला दिल्ली विधानसभा निवडणुकीत 77 लाख मतदारांनी मतदान केले. ‘आप’च्या दाव्यानुसार सर्वेक्षणात 1.97 लाख लोकांनी सरकार स्थापन करण्याचा सल्ला दिला. म्हणजेच एकूण मतदानाच्या केवळ 2.55 टक्के मतदारांनी हा कौल दिला.
257 जाहीर सभांतून सकारात्मक मत
‘आप’ने दिल्लीत 280 जाहीर सभा घेतल्या. यातील 257 सभांतील लोकांनी सरकार स्थापन करण्याचा सल्ला दिला. 23 सभांत लोकांनी याउलट कौल दिला.
पोलिसांची कार केजरीवाल यांनी नाकारली
केजरीवाल यांना मुख्यमंत्र्यांसाठी असते तशी सुरक्षा देण्यासाठी तातडीने हालचाली सुरू केल्या. मात्र, ही सुरक्षा केजरीवाल यांनी नाकारली. देव आपला तारणहार असल्याचे ते म्हणाले. दुसरीकडे गुप्तचर विभागाने गृह मंत्रालयाला केजरीवाल यांची मनधरणी करावी, अशी विनंती केली आहे.
असा घेतला निर्णय
आपने दिल्लीतील लोकांच्या सल्ल्याने सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी वेबसाइट, फोन कॉल आणि एसएमएस या माध्यमांचा वापर करण्यात आला. त्यातून साध्य झाले ते असे -
6,97,310 लोकांनी मत नोंदवले. यातून डुप्लिकेट आयडी व नंबर वगळले.
5,23,183 लोकांनी योग्य नंबर व खरा पत्ता टाकून मत नोंदवले होते.
2,65,966 लोक दिल्लीतील रहिवासी
1,97,086 लोकांनी सरकार स्थापण्याचा सल्ला दिला
म्हणजेच दिल्लीतून 74% लोकांनी सत्ता स्थापन करण्यासाठी कौल दिला