नवी दिल्ली - आम आदमी पार्टीचे माजी नेते तसेच स्वराज मोहिमेत सक्रिय असलेले प्रशांत भूषण यांनी दिल्ली सरकारच्या जनलोकपाल विधेयकाची खिल्ली उडवली आहे. जनलोकपालचे विधेयक म्हणजे जोकपाल आहे, असे सांगून त्यांनी मुख्यमंत्री अरविंद
केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दुसरीकडे ‘
आप’ने हा आरोप फेटाळून लावला.
केजरीवाल मंत्रिमंडळाने अलीकडेच लोकपाल विधेयकाला मंजुरी दिली होती. सोमवारी विधेयक विधानसभेत मांडले जाऊ शकते. लोकपाल विधेयकाचा मसुदा तयार करणाऱ्या समितीत सामील असलेले ज्येष्ठ वकील भूषण म्हणाले, आम्ही तयार केलेल्या मसुद्याच्या पातळीवर पाहिल्यास दिल्ली लोकपाल विधेयक त्या तत्त्वांना हरताळ फासणारे आहे. म्हणूनच मंत्रिमंडळाने मंजूर केलेले विधेयक केवळ जोकपाल म्हणून उरले आहे. केजरीवाल यांनी देश आणि दिल्लीतील लोकांसोबत विश्वासघात केला आहे. एवढा मोठा विश्वासघात आजवर कोणीही केला नव्हता. दरम्यान, अरविंद सरकारच्या मंत्र्यांचा भ्रष्टाचार लपवणारे विधेयक असेच या विधेयकाचे खरे नाव असले पाहिजे. दरम्यान,आपचे नेते कुमार विश्वास यांनी ट्विटरवरून भूषण यांच्या आरोपांचे उत्तर दिले. ते म्हणाले, रामलीला मैदानात तयार करण्यात आलेल्या मसुद्याला समर्पित हे लोकपाल विधेयक आहे. स्वल्पविराम, पूर्णविरामातही बदल करण्यात आलेला नाही.
पिता-पुत्रांनी भाजपमध्ये जावे
भूषण यांनी महाजोकपाल अशी खिल्ली उडवली असली तरी त्याला प्रतिहल्ला करून उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर भूषण पिता-पुत्रांनी भाजपमध्ये सामील व्हायला हवे, असा सल्लाही दिला आहे.
तेव्हा शांत का?
आपचे दिल्लीत ४९ दिवसांचे सरकार होते. त्या वेळी केजरीवाल सरकारने विधेयकाचा हाच मसुदा मांडला होता. त्या वेळी प्रशांतजींना काहीही अडचण नव्हती. त्याच वेळी त्यांनी हा मुद्दा उपस्थित का केला नव्हता? त्या वेळी ते शांत का होते ? खरे तर पहिल्यांदा त्यांनी त्यांच्या पक्षाला (भाजप) लोकपाल नियुक्ती करावी, अशी सूचना द्यायला हवी, असे चढ्ढा यांनी म्हटले आहे.