आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीकरांनी अनुभवला ‘अभंगवाणी’चा गोडवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव, मुक्ताई, चोखामेळा या संतांचे महाराष्ट्राचे आराध्यदैवत असणार्‍या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या गुणांचे वर्णन करणारे अभंग.. सुप्रसिद्ध गायिका देवकी पंडित, राहुल देशपांडे, जयतीर्थ मेवुंडी यांचा स्वर.. कार्यक्रमास लाभलेले अच्युत पालव यांचे नेपथ्य व त्यातून साकारलेले पंढरपूरच्या वारीचे चित्र, प्रेक्षकांच्या टाळ्यांचा प्रतिसाद.. असे भक्तिपूर्ण वातावरण राजधानी दिल्लीत शुक्रवारी सायंकाळी सिरीफोर्ट सभागृहात पाहायला मिळाले. औचित्य होते महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ‘बोलावा विठ्ठल’ अभंगवाणी कार्यक्रमाचे.

आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्रातील विठ्ठल भक्तीचा गोडवा आणि महिमा दिल्लीत राहणार्‍या मराठी माणसांपर्यंत पोचवण्यासाठी पंढरपूरच्या वारीचे चित्र उभे करणार्‍या वारकरी संतांच्या अभंगवाणीच्या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात देवकी पंडित, राहुल देशपांडे, जयतीर्थ मेवुंडी या गायक त्रयींनी सादर केलेल्या ‘अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र..’ आणि ‘रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी’ या वारकरी संप्रदायातील मंगलचरणाने झाली.

राहुल देशपांडे यांनी ‘कानडा राजा पंढरीचा’, ‘जत्था पंढरीस जातो कानी नाद येतो मृदंगाचा’, ‘मी तव बैसलो धरुनिया ध्यास.’ आणि ‘लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा’ हे संत तुकाराम व नामदेवांचे अभंग शास्त्रीय गायकीच्या अंगाने सादर करून भक्तिमय वातावरणाची निर्मिती केली. तर देवकी पंडित यांनी संत तुकाराम महाराजांचा शीर्षक अभंग ‘बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जिवेभावे’ सादर केला. तसेच मारवा रागातील, संत मुक्ताबाई रचित प्रसिद्ध अभंग ‘मजवरी कृपा करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा’, संत चोखामेळा रचित ‘अबीर गुलाल उधळीत रंग’ आणि ‘या पंढरीचे सुख पाहता डोळा’ हा संत तुकाराम महाराज रचित अभंग सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

या कार्यक्रमाला भक्तिमय करीत कळस रचणारे गायक जयतीर्थ मेवुंडी यांनी तुकारामांचा प्रसिद्ध अभंग ‘राजस सुकुमार मदनाचा पुतळा’, संत नामदेव रचित ‘विसावा विठ्ठल सुखाची साऊली, प्रेम पान्हा घाली भक्तांवरी’, ‘अकार उकार मकार करिती हा विचार, परि विठ्ठल अपरंपार’ हा कूट अभंग सादर केला. मेवुंडी यांनी कानडी भाषेतील विठ्ठलाचे वर्णन करणारा ‘सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा.’ सादर केला.

मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमास प्रसिद्ध शास्त्रीय गायक साजन मिश्रा यांच्यासह कॉम्पिटेटिव्ह अपिलेटेड ट्रायब्युनलचे अध्यक्ष न्या. व्ही.एस. शिरपूरकर, महाराष्ट्र शासनाच्या राजशिष्टाचार विभागाचे सचिव अजय अंबेकर, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सहसंचालक विश्वनाथ साळवी, या कार्यक्रमास स्थानिक साहाय्य करणारे पंचम निषादचे शशी व्यास तथा दिल्लीत वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्यरत मराठी श्रोते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
(फोटो - ‘अभंगवाणी’ कार्यक्रम सादर करताना गायक जयतीर्थ मेवुंडी, देवकी पंडित व राहुल देशपांडे.)