नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला (भाजप) आम आदमी पार्टी (
आप) कडवी झुंज देताना दिसत आहे. ABP-Nielsen द्वारा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात केलेल्या सर्व्हेक्षणात भाजपचा विजयाचा मार्ग अवघड आहे. सर्व्हेनुसार, भाजपला स्वबळावर सत्ता मिळताना दिसत नाही.
भाजपला 34, आपला 28 आणि काँग्रेसला 8 जागा मिळण्याचा अंदाज आहे. हे आकडे भाजपची डोकेदुखी वाढविणारे ठरू शकतात. कारण ABP-Nielsen नेच नोव्हेंबरमध्ये केलेल्या सर्व्हेक्षणानुसार जानेवारीत भाजपच्या 12 जागा कमी झाल्या आहेत. नोव्हेंबरमध्ये भाजपला 46, आपला 18 आणि काँग्रेसला 5 जागांचा तर, एक अपक्ष विजयी होण्याचा अंदाज वर्तवला होता. याचाच अर्थ गेल्या दोन महिन्यांमध्ये
केजरीवालांच्या आपने दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजयाच्या स्पर्धेत पुनरागमन केले आहे. दोन महिन्यांत त्यांच्या जागेत 10 ने वाढ झाली आहे.
ABP-Nielsenने ताजा सर्व्हेक्षण 7 ते 12 जानेवारी दरम्यान केला आहे. या सर्व्हेत 6414 मतदार सहभागी झाले होते. दरम्यान, आपला टक्कर देण्यासाठी आता भाजप तयारीला लागले आहे.
केजरीवाल यांच्या लोकपाल आंदोलनातील सहकारी माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी आणि आपच्या संस्थापक सदस्यांपैकी एक शाजिया इल्मी यांना भाजपने प्रवेश दिला आहे. या दोन्ही महिला नेत्यांचा आपला किती फटका बसेल हे आताच सांगणे अवघड आहे.